मुलाखत – प्रा. प्रवीण दवणे
प्रवीण दवणे… ‘ठकास महाठक’पासून ते ‘आम्ही सातपुते’, ‘सुखांत’, ‘आयडियाची कल्पना’, ‘प्रतिबिंब’पर्यंत अनेक चित्रपटांची गीते लिहिणारे प्रतिभावान कवी… माणसा-माणसातील दिवसेंदिवस घटत जाणारा संवाद, हरवत जाणारी जगण्यातील उत्स्फूर्तता दवणे यांना कायम अस्वस्थ करीत आली आहे. या विषयावर त्यांनी महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने दिली आहेत. ‘अथांग’, ‘मैत्रबन’, ‘सावर रे’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके, काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद…
गीतांमधील आशयघनता सध्या कमी झाली आहे?
कमी? आशयघनता राहिलीच कोठे? गाणी लिहिण्यासाठी सध्या कवी लागतोच असे नाही. संगीतकाराच्या ओळखीतील कोणा नवशिक्याने चार ओळी खरडल्या, तरी त्याला कर्कश चाल लावून संगीतकार मोकळा होतो. आता गाणी ‘हॅमर’ करण्याचे अनेक मार्ग निघाले आहेत. इंटरनेट, मोबाईल, शेकडो टीव्ही वाहिन्यांवरून गाणे अखंडपणे दाखवत राहिले म्हणजे ते लोकांच्या ओठांत रुळते. आम्हीही गमतीशीर, मिश्कील गाणी लिहिली; पण त्यात शिवराळपणा कधीच नव्हता. दुर्दैवाने आता तो वाढला. निरर्थक गीतांना महत्त्व आले. ‘कोलावरी डी’चेच उदाहरण घ्या. चार निरर्थक शब्द एकापुढे एक मांडले की गाणे तयार होते आणि ते लोकप्रियही होते. लोकप्रियता हा उत्कृष्टतेचा निकष नसतो, नसावा; पण गाण्यांमध्ये आता निकष उरलेत खरेदी-विक्रीचे. कवी म्हणवणाºया एखाद्याने ‘पाऊस येण्याची वेळ झाली, चल चहा पिऊ’ असे चार शब्द लिहून दिले, तरी संगीतकार त्याला चाल लावून, साच्यात बसवून त्याचे गाणे बनवतील! वाईट याचे वाटते, की अशी गाणी लोकांना आवडतात, लोकप्रियही होतात…खपते ते चांगले आणि खुपते त्याला कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती आहे; त्यामुळे गाणी लिहिण्यासाठी चित्रपट आला की पूर्वी आनंद व्हायचा. आता काय लिहावे लागेल, या विचाराने छातीत धस्स होते; पण तरीही लोकांना चांगल्या गोष्टी आपोआप कळतात आणि त्या हुडकून काढून लोक त्यांचा आस्वादही घेतात.
या पार्श्वभूमीवर गीतलेखनाबद्दल तुमचा एखादा अनुभव…
दत्ता डावजेकर, विश्वनाथ मोरे, यशवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके, अनिल मोहिले यांसारख्या महान संगीतकारांबरोबर काम केल्यामुळे असे असंख्य अनुभव गाठीशी आहेत. या लोकांना कवितेची उत्तम जाण होती. आम्हीही व्यावसायिक गाणी केली; पण कवितेचा आब राखून. पश्चात्ताप वाटेल असे काम कधी केले नाही. द्विअर्थी गाणी लिहिली नाहीत. विश्वनाथ मोरे यांनी ‘ठकास महाठक’ चित्रपटातील एक गाणे मला तब्बल साठ वेळा बदलायला सांगितले. ही माणसे पूर्ण कस लावून घेत. श्रीधर फडकेंसाठी मी सहा महिने गाणे लिहीत होतो, तेव्हा ‘तेजोमय नादब्रह्म’सारखी गाणी निर्माण होऊ शकली.
तुटत जाणा-या संवादाचा तुम्ही नेहमी उल्लेख करता. त्याविषयी…
माणूस हा समूहप्रधान प्राणी आहे. सुख-दु:खे तो वाटून घेतो. त्यासाठी संवाद हे महत्त्वाचे माध्यम आहे. संवादातून नवनिर्मिती होते. संवाद घटून माणसाची निर्मितीक्षमताच संपली तर? सध्या संवेदना कोरड्या होत चालल्या आहेत. टीव्ही, मोबाईलमुळे माणसाचे ठोकळे होत चालले आहे. मुलीने आईचा खून पाडण्याच्या घटना पूर्वी कधी ऐकल्या? हा संवाद तुटल्याचा परिणाम आहे. हा विषय मांडत राहिल्यामुळे माझ्या व्याख्यानांत तोच-तोचपणा येतो, असा आक्षेप अनेकदा घेतला जातो; पण जे मांडतो, ते वास्तव आहे आणि म्हणूनच ते वारंवार मांडावे लागते. माझ्याकडेही अनेक प्रेमकविता आहेत, रंजक कथा आहेत; पण त्या सोडून मला हीच व्यथा मांडाविशी का वाटते? समोर विद्यार्थी, शिक्षक दिसले की, हेच ओठांवर येते. कारण त्याची गरज आहे. घरात आलेल्या व्यक्तीची ओळख करून घेण्यासाठी आजच्या मुलांना कॉम्प्युटरवरून उठावेसे वाटत नाही? ही मुले अशी ठोकळ्यासारखी का वागतात? आपल्याला ठोकळे हवेत की हिरे? हिºयांना पैलू पाडण्याचे काम संवाद करतो. संवाद फक्त बोलण्यातून होत नाही. नि:शब्दतेतही संवाद असतो. डोळ्यांतून ओघळलेले अश्रूही बोलत असतात. हे या पिढीला कसे कळणार? आता कॉलेजमध्ये मुलाबरोबर आई येते. मुलाला चौºयाण्णव पॉइंट अमूक टक्के पडल्याचे सांगते; पण त्या मुलाच्या चेहºयावर नूर नसतो. त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नाही. ही पिढी अशी मलूल का झाली?
धकाधकीच्या आयुष्यात जगणे कसे शोधता येईल?
माणसाने आयुष्यात अल्पसंतुष्ट असू नयेच; पण अगदी वखवखलेलेही नसावे. समाधानाची, ‘शेअर’ करण्याची वृत्ती हवी. पूर्वी घरात कोणी आल्यानंतर ‘या पाव्हणे’ म्हणत हात धरून जेवायला बसविले जात असे. आता ताटे घरात लपविली जातात. आनंद दिल्याने वाढतो, हे लोकांना समजतच नाही. फक्त पैशांचाच भ्रष्टाचार असतो, असे नाही. मुलांना चांगले ऐकण्याची सवय न लावता, कुठल्या तरी भिकार गाण्याची सीडी आणून देणे हासुद्धा भ्रष्टाचारच. तो सोडला, तर जगणे आनंददायी होईल.
सोशल नेटवर्किंग साईट्समुळे संवाद वाढतोय?
उत्तमोत्तम पदार्थांचे नुसते फोटो पाहून ढेकर येतो का? प्रत्यक्ष खाणे वेगळे आणि आभास वेगळा. सोशल नेटवर्किंगचे जग आभासी आहे. यातून पुढे साºया भावनाच कृत्रिमरीत्या अनुभवण्याची सवय लागते की काय, अशी भीती आहे. प्रियकर-प्रेयसी यांच्यातील खºयाखुºया भेटीत असणारी हुरहूर, तो हळूवार स्पर्श फेसबुकवर कसा अनुभवता येणार? मुलाने आईला मारलेल्या मिठीतली भावना सोशल नेटवर्किंगमध्ये कशी येणार? या तंत्रज्ञानाचा वापर कसा फोनसारखा असावा. फोनवरून आपण भेटीचे आमंत्रण देतो; पण खरी भेट होतेच ना? एसएमएस, सोशल नेटवर्किंगमुळे भावनांचे विरेचन होऊन महाविकृती जन्माला येण्याची दाट भीती भेडसावते आहे. हे आजच्या पिढीला कळत नाही. या पोरांना सावरायला हवे.
कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त तुम्ही राबविलेल्या उपक्रमाबद्दल…
माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणजे हे वर्ष. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ही माझी आराध्य दैवते. कुसुमाग्रजांच्या कविता रसिकांपर्यंत पोहोचल्या. त्या सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे ठरवले. त्यांच्या काही कविता निवडल्या आणि त्यावर निरूपणात्मक ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ हा कार्यक्रम तयार केला. वर्षभरात शंभर व्याख्याने देण्याचे जाहीर केले. आश्चर्य वाटेल, पण निमंत्रणांचा पाऊस पडला. कोणत्याही अटी न घालता, निकष न लावता व्याख्याने दिली. मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाºयांसमोरसुद्धा बोललो. वर्षभरात १०३ कार्यक्रम झाले. डोंबिवलीच्या चतुरंग हॉलमध्ये शंभरावे व्याख्यान झाले. सोलापूरमध्ये दहावीच्या मुलांसमोर बोललो. काही मुले भेटायला आली आणि बोलली, ‘सर, आम्ही आत्महत्त्येचा विचार करणार नाहीच; शिवाय दुसरा कोणी असा वेडा विचार करणारा असेल, तर त्याला जीवनाकडे ओढून नेऊ…’ मला नंतर सांगण्यात आले की, ती मुले त्या शाळेतली सर्वांत टारगट होती! हे तात्यासाहेबांचे सामर्थ्य आहे. ही त्यांच्या कवितांतील शक्ती आहे.
मुलाखत- सुदीप गुजराथी, नाशिक