भारत देश हा उष्ण कटिबंधातला देश असल्यामुळे वर्षभर हवा गरमच असते. थंड प्रदेशापेक्षा उष्ण देशातील लोकांना शरीराला पेयांची गरज जास्त असते. त्यामुळे पाणी पिणे हा भारतीय जेवणाचा एक अविभाज्य भाग असतो.
मार्च महिना सुरू झाला की उन्हाळा चांगलाच जाणवू लागतो. हा उन्हाळा वाढत जाऊन अगदी असह्य होतो. त्यावेळी सर्वप्रथम आठवण होते ती गारेगार सरबतांचीच. उसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, कोकमचे सरबत अशी पेये साखरेची गोडी व पाण्याचा गारवा यामुळे थकलेल्या शरीराला उल्हासित करतात. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या तजेलदार, रसरशीत फळांपासून चांगल्या चवीची सरबते बनविता येतात. आजकालच्या नाना रंगाच्या व चवीच्या कृत्रिम सरबतांच्या जमान्यात ही नैसर्गिक सरबते कधीही उत्तम. त्यासाठी येथे दिल्या आहेत काही सरबतांच्या कृती.
साहित्य – अर्धी वाटी गाभुळलेली, चिंचोके काढलेली चिंच, २ वाटया चिरलेला गूळ, १ चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ (आवडत असल्यास काळे मीठ घ्यावे).
कृती – रात्री चिंच पाण्यात भिजत घालावी व सकाळी ती कोळून व गाळून घ्यावी. गाळलेल्या चिंचेच्या कोळात गूळ मिसळून तो विरघळू द्यावा व फ्रीजमध्ये ठेवावा. सरबत प्यायला देतांना ग्लासमध्ये थोडेसे कोळाचे मिश्रण घालून बाकी गार पाणी घालावे. चवीनुसार मीठ, जिरेपूड घालून, हलवून द्यावे.
टीप – हें सरबत पाचक व उष्णताशामक आहे. फक्त चिंच नवी असतानाच ते करावे त्यामुळे रंग व चव छान येते.
साहित्य – लिंबाचा रस, रसाच्या दुप्पट साखर, पाणी, मीठ चवीनुसार, वेललचीपूड.
कृती – लिंबाच्या रसात रसाच्या दुप्पट साखर घालून विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चवीनुसार मीठ व वेलचीपूड घालावी. अंदाजे पाणी घालून सरबत करावे. शक्यतो हे सरबत थंडच असावे. त्यामुळे फ्रीज किंवा माठातले पाणी सरबतासाठी घ्यावे.
टीप – लिंबाचा रस साखर घालून तयार करून ठेवल्यास हवे तेव्हा झटपट लिंबू सरबत तयार होते.
साहित्य – बेलफळातील गर १ वाटी, साखर १ वाटी, १ लिंबू, २ लवंगा, २ वेलदोडे, २-४ काळी मिरी, मीठ चवीनुसार.
कृती – पिवळी पिकलेली बेलफळे घेऊन, गर काढून, गर तीन-चार तास पाण्यात भिजत घालावा. गर बुडेपर्यंत पाणी घालावे. मग गर पाण्यात कुस्करून हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेल्या मिश्रणात नंतर साखर, मीठ व वेलचीची पूड घालावी व पुन्हा गाळून घ्यावे. सरबताचा गर आता तयार झाला. सरबत प्यायला देतेवेळी त्यात बेताचे पाणी व बर्फ घालून गार सरबत द्यावे.
साहित्य – पाव किलो जांभळे, एक ग्लास साखर.
कृती – जांभळे बुडतील इतक्या पाण्यात कुकरमध्ये उकडून घ्या . पाण्यासह जांभळे कुस्करून बिया काढा. मिक्सर मध्ये फिरवून (हवे असल्यास गाळून ) घ्या. एक ग्लास साखरेचा दोन तरी पाक करून घ्या. थंड झाल्यावर पाक आणि जांभूळ गर मिसळा. एक ग्लास सरबत बनवताना पाऊण ग्लास मिश्रण आणि पाव ग्लास पाणी घाला. आवडत असेल तर साखर घाला. ढवळा. हे जांभूळ सरबत अगदी नैसर्गिक असल्यामुळे चवदार लागते. तुम्ही आईसक्रीम मध्येही घालू शकता.
जांभूळ हे उत्तम फळ आहे सुश्रुतांच्या मते जांभूळ पित्त, रक्तदहनाशक, शरीराची कांती सुंदर बनवणारे आहे. जांभूळ खाल्ल्याने रक्त लाल बनते. जांभळे मीठ टाकून खाणे हितावह आहे जांभळा मध्ये लोह फॉस्फरस, फॉलिक एसिड असते. जांभळे किडकी खाऊ नयेत. जांभूळ पिकण्यासाठी ग्रीष्माचे ऊन आणि वर्षाऋतूतील पावसाचा शिडकावा लागतो. बुद्ध लोक या झाडाला पवित्र मानतात.