मुलाखत – अशोक सराफ
नाशिकच्या कलाकारांची मराठी इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर चालती आहे. प्रथमच एकाचवेळेस असंख्य कलाकार विविध मालिकांमधून झळकताना दिसत आहेत. मृणाल दुसानीस, चिन्मय उदगीरकर, स्नेहा कुलकर्णी, कल्याणी मुळे यासारखे अनेक चेहरे आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत. ही नाशिककरांसाठी खरोखरच अभिमांची गोष्ट आहे. त्यातील एक चेहरा, तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘चॉकलेट बॉय’ अभिजित खांडेकर….! त्याच्या याच प्रवासाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा –
अभिनयाची आवड कशी निर्माण झाली?
– मी बालवाडीपासून कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. नकला करून दाखवायचो. शाळेत असतांना मोजकाच चान्स मिळाला. वडील नाटकात काम करायचे. मी त्यांची नाटक बघायला आवर्जून जायचो.
प्रथम कोणत्या स्पर्धेत भाग घेतला?
– कॉलेजला गेल्यावार ‘स्वप्नगंध’ संस्थेत पहिली संधी मिळाली, नाटकाचे नाव होते ‘उदाहरणार्थ’. त्यात मी सूत्रधाराचा छोटासा रोल केला होता. ते नाटक राज्य नाटक स्पर्धेत पहिले आले. त्यानंतर मी ब-याच स्पर्धांमधून नाटकं आणि एकांकिका केल्या. त्यामुळे माझा आत्मविश्वास चांगलाच वाढला.
रेडिओ मिरची मध्ये आरजे म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता?
– नाशिक मध्ये नाटकात काम करत असताना पुण्यात रडिओ मिरची आरजे हंट या स्पर्धेत भाग घेतला. त्यात निवड होऊन मग पुण्यात आरजेचा जॉब करण्यास सुरुवात केली. त्या काळात आशा भोसले, जॅकी श्रॉफ यांच्या सारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. तो अनुभव खूप शिकवणारा होता. पण त्यामुळे काही काळ नाटकापासून लांब राहिलो. परंतु माझ्यातला कलाकार मला शांत बसू देत नव्हता. मग मनाचा दृढ निश्चय करून पूर्ण वेळ या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेस महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत निवड होऊन अंतिम चार मध्ये पोहचलो. आणि माझा ह्या क्षेत्रातला प्रवास सुरु झाला.
‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेत अंतिम चार मधील अनुभव कसा होता?
– तो टीम स्पीरिटचा उत्तम अनुभव होता. आम्हा सगळ्यांची आपसात खूप मस्त केमिस्ट्री जमली होती. आम्ही एकमेकांकडे कधी स्पर्धक म्हणून बघितलेच नाही. नेहमी एकमेकांना मदत केली. आमच्या दृष्टीने अंतिम टप्यात पोहोचलेलो आम्ही सर्वच विजेते होतो.
“माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता?
– खूपच छान होता. वाटलं नव्हतं कि मालिका एवढी लोकप्रिय होईल. कारण मराठीत फारच कमी प्रेमकथा लोकप्रिय होतात. या मालिकेमुळे मराठी मालिकांमध्ये प्रेमकथेची लाटच आली.
या मालिकेची निर्मिती एकता कपूरची होती. त्यामुळे सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या बॅनर बरोबर काम करतांना दडपण आले का?
– एकता कपूरची मराठीतील निर्मिती असलेली पहिलीच मालिका होती. बालाजी मध्ये काम करताना खूप मस्त अनुभव आला. सगळ्याच लोकांनी खूप कष्ट घेतले. ज्या लोकांना मी ओळखत नव्हतो त्यांना आता मी ओळखायला लागलो आहे. मला चान्स दिल्याबद्दल मी खरोखरच बालाजी आणि एकता कपूरचा आभारी आहे.
आगामी प्रोजेक्ट्स कुठले आहेत?
– झी टॉकीज आणि झी मराठीच्या दोन शोच सूत्रसंचालन करणार आहे. तसेच नाटकांची बोलणी सुरु आहे. एका मोठ्या बॅनर बरोबर चित्रपटाविषयी बोलणी सुरु आहे. जर सगळा सुरळीत झाले तर डिसेंबर अखेरीपर्यंत त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.
या क्षेत्रात येणा-या तरुणांना तू काय संदेश देशील?
– या क्षेत्रात येण्याआधी प्रत्येकाने होमवर्क करायला हवा की खरोखरच मी या क्षेत्रात जाण्यासाठी तयार झालो आहे का ? कारण शेवटी आपल्याला काम करण्याचे पैसे मिळतात. त्यामुळे नुस्त पाटया टाकून चालणार नाही. फक्त ग्लॅमरच आकर्षण न ठेवता जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळेल.
मुलाखत – कपिल देशपांडे