‘वैदेही’ अर्थात गौरी नलावडे

मुलाखत – अशोक सराफ
gauri-nalavade स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली सर्वांची लाडकी ‘वैदेही’ अर्थात गौरी नलावडे. यापूर्वी झी मराठी वरील ‘अवघाची संसार’ मालिकेतून तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. जाहिरात क्षेत्रातही तिने काम केले आहे. महाविद्यालयीन एकांकिकापासून अभिनयाची सुरुवात करणा-या गौरीचा ‘स्वप्नांच्या पलिकडले’ पर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटांची प्रचंड आवड असणारी गौरी कुठल्याही एक्टिंग स्कूल मध्ये न जाता, तिथे न शिकता चित्रपट बघत-बघत अभिनय शिकत गेली. ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर अनेक ऑडिशन्स, स्क्रीन टेस्ट देत तिला पहिला ब्रेक मिळाला. मिळालेल्या संधीच सोन करत तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची कारकीर्द घडवायला सुरुवात केली.

‘स्वप्नांच्या पलीकडले’ मधली वैदेही अत्यंत सालस, गुणी व नेहमी खरे बोलणारी वैदेही पण प्रत्यक्षात गौरी स्वभावाने खूप चंचल आणि खेळकर आहे. खूप बडबडणारी, सेटवर सतत धमाल करणारी गौरी ही तिच्या कामाच्या बाबतीत खूपच सक्रीय आहे. तिच्या कारकीर्दीबद्दल आपण तिच्याकडूनचं जाणून घेऊयात….

अभिनयाची आवड कशी निर्माण झाली?
मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण आधी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील वाटचाल करायची असे ठरवले असल्याने मेहनतही घेतली.

अभिनय क्षेत्राला घरून पाठींबा होता?
हो. प्रचंड पाठींबा होता. मुळतः माझ्या घरी सकारात्मक दृष्टीकोन असणारेच सर्वजण आहेत. हे कर किंवा ते करू नको अशी बंधने नव्हती. अभिनयक्षेत्रात चांगले होणार असेल तर आपण ट्राय करून बघूयात असे मला सांगितले होते पण ताकीदही होती की यात जर यश नाही मिळाले तर सरळ जॉब करायचा.

पहिला ब्रेक तुला कधी मिळाला?
‘अवघाची संसार’ सिरिअलमधून मला पहिला ब्रेक मिळाला. त्याआधी सचिन पिळगांवकरजींसोबत एक जाहिरात केली होती.

‘स्वप्नांच्या पलीकडले’पर्यंतचा तुझा आतापर्यंतचा प्रवास कसा वाटला?
अतिशय सुखकर आणि चांगला. खूप शिकायला मिळाले. इथे मी ज्या सीनियर कलाकारांसोबत काम करते आहे त्यांच्याकडून प्रचंड शिकायला मिळते. अजूनही मी त्यांच्याकडून रोजच्या रोज शिकत असते.

यापूर्वी नाटकांत कधी काम केले आहे?
हो केले आहे पण कॉलेजतर्फे केले आहे. प्रोफेशनल नाटके कधी केली नाहीत. त्यामुळे मला नाटकांचा फारसा अनुभव नाहीये.

स्वप्नांच्या पलीकडले टीम बद्दल काय सांगाल?
टीम अप्रतीम आहे. खूप सपोर्ट करतात. चुकले तर सांभाळून घेतात किंवा आजारी असेल तर सगळे काळजी करतात. सगळे लाडही करतात. त्यामुळे मला खूप मज्जा येते. हे दुसरे कुटुंब आहे माझे.

सेट वर धमाल होते?
सेटवर भरपूर धमाल होते. प्रचंड मस्ती करतो आम्ही.

तासनतास शूटिंग चालू असते तेव्हा वेळचे गणित कसे जुळवतेस? निवांत क्षणी तुझ्या आवडीनिवडी किंवा छंद कसे जोपासतेस?
मला म्युझिक आवडते. मला चित्रपट पहायला आवडतात. मी तासाभर शॉपिंग करते किंवा फोनवर बोलू शकते. इथे सेटवर ब-याचदा आमच्या गप्पा रंगत असतात त्यामुळे टाईमपास होतोच.

पुढच्या प्रोजेक्टबद्दल काय सांगशिल?
सध्या तरी माझी पहिली कमिटमेंट ‘स्वप्नांच्या पलीकडलेच’ असल्याने अजून मी पुढच्या प्रोजेक्टचा विचार नाही केला परंतु चांगल्या ऑफर्स येत आहेत. पण थोड्याच दिवसातच मी पुढची कामे सुरू करणार आहे.

अभिनेत्री नसतीस तर?
अभिनेत्री नसते तर मला माहित नाही मी काय असते. पण मी अभिनेत्रीच असते. मला अभिनेत्री व्हायचे होते त्यामुळे मी अभिनेत्रीच असते.

‘स्वप्नांच्या पलीकडले’ मुळे प्रेक्षकांचा जो आजवर तुला पाठींबा मिळाला त्यात तुझ्या चाहत्यांकडून मिळालेली आठवणीतली एखादी प्रतिक्रिया किवां अनुभव याबद्दल काय सांगशील?
पुण्याचा एक मुलगा माझा फॅन आहे. नुकतीच त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतलय. त्याला माहित आहे की मला चॉकलेटस् आणि टेडी बेअर्स फार आवडतात. त्याने माझ्या फोटोंचा अल्बम बनवला आणि टेडी बेअर व चॉकलेटसह मुंबईला येऊन मला गिफ्ट दिले. तो माझ्यासाठी खूप छान अनुभव होता.

अभिनयासाठी याआधी कुठे प्रशिक्षण घेतले होते?
नाही खर तर मी खूप चित्रपट पाहिलेत. खूप चित्रपट बघितल्यानंतर त्यातून आपल्याला काय करायचं आणि काय नाही याचा मी एक फॉलोअप ठेवला होता.

तुला या क्षेत्रात येताना स्ट्रगल करावा लागला का की तुला हळूहळू संधी मिळत गेल्या?
मी प्राथमिक परीक्षा दिल्या नंतरच संधी मिळत गेल्या. असे नाही की संधी लगेच मिळाली. थोडा स्ट्रगल, थोडी मेहनत वगैरे करावीच लागते ना.

मराठीमध्ये चित्रपट, सिरिअल्समध्ये जे नवीन कलाकार येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना या क्षेत्राबद्दल आवड आहे त्यांना तू काय सांगशील?
मला एवढेच म्हणायचे आहे की स्वतःची पात्रता ओळखा. स्वतःला किती अभिनय येतोय ते बघा आणि खरंच तुम्हाला असे वाटत असेल की मला याच क्षेत्रात करीअर करायचे आहे तर खूप मेहनत करायची तयारी ठेवा. नाही तर तुम्ही तग धरू शकणार नाही. आज ओडिशन दिली आणि उद्या सिलेक्शन झाले असे कधीच होत नाही.

मुलाखत- आशिष कोकरे