‘नाम’च्या कार्यासाठी पुरस्कार स्वीकारणार नाही!

मुलाखत – मकरंद अनासपुरे
makarand-anaspur नाना पाटेकर यांच्या साथीने राज्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे सरसावणारे प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी साधलेला हा संवाद…

‘नाम’ सुरू केले तेव्हा एवढ्या प्रतिसादाची अपेक्षा होती?

समाजात काही सकारात्मक घडावे, एवढ्याच अपेक्षेने आमचे काम सुरू झाले. ‘आपल्याला शेतकरी कुटुंबांना मदत द्यायची आहे’ असा मला नाना पाटेकर यांचा फोन आला. मलाही मदत करायचीच होती. मी त्यांना म्हटले, ‘आपण दोघे गुपचूप मदत देऊ’; पण आणखीही काही जण पुढे आले. मी नानांना म्हटले, ‘तुम्ही बरोबर येणार असाल तर काम करू.’ त्यावर नाना बीड, नागपूरला आले. समाजात चांगले लोक असतातच. त्यामुळे काम विस्तारत गेले आणि ‘नाम’ची स्थापना झाली. आपल्याला लंडनची खडान्खडा माहिती असते; पण शे-दोनशे किलोमीटरवरच्या ग्रामीण भागांतल्या समस्यांची जाणीव नसते. हे आत्ममग्नतेचे लक्षण आहे. त्यातून लोकांना बाहेर काढण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न होता, इतकेच.

गांधींनी ‘खेड्याकडे चला’ म्हटले, शरद जोशींनी शेतकºयांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. ‘नाम’च्या कार्यामागे अशी कोणती वैचारिक बैठक आहे?

आमची चळवळ पूर्वनियोजित नव्हे, तर उत्स्फूर्त आहे. त्यामुळे चळवळीला सध्या अशी वैचारिक बैठक नसली, तरी अनेक चांगली माणसे जोडली जात असल्याने ती येत जाईल, विचारधारा तयार होत जाईल. लोक चांगल्या सूचना देत आहेत. लोकांच्या संवेदना जिवंत होणे अपेक्षित आहे. शेतकºयांची मुलेही आपल्या मुलांसारखीच असतात. त्यांनाही इच्छा, आकांक्षा असतात. आपण शहरात असलो, तरी त्यांच्याकडे वळून पाहता आले पाहिजे. वैयक्तिकरीत्या मी स्वत: डोळस आहे. मी कोणापासून प्रभावित नाही. मी खूप वाचतो; पण जे प्रत्यक्ष पाहतो ती वस्तुस्थिती असते. एखाद्या कवितेपासून प्रेरणा घेऊन सुरू केलेले हे काम नाही. समोरच्या परिस्थितीला दिलेली ही प्रतिक्रिया आहे.

‘नाम’चा आवाका राज्याबाहेरही वाढवण्याचा विचार आहे का?

आता आमच्यासोबत चांगली मंडळी जोडली जात आहे. समर्पित वृत्तीने काम करणारी माणसे मिळणे तसे दिवसेंदिवस मुश्कील होत आहे. आमच्याकडे हार-तुºयांना स्थान नाही. ही राजकीय पक्षाची वा सवंग प्रसिद्धीसाठी सुरू केलेली चळवळ नाही. परवा आम्ही राज्यात एक कोटी झाडे लावण्याची घोषणा केली. हे फक्त ‘नाम’ करू शकणार नाही. त्यासाठी लोकचळवळ घडावी लागेल. म्हणून शाळा-महाविद्यालयांना आवाहन करीत आहोत. त्यामुळे जसजशी माणसे जोडली जातील, तसतसा आवाका वाढवण्याचा प्रयत्न राहणारच आहे.

‘नाम’च्या नावाने शेतकºयांची फसवणूक झाल्याचे ऐकून काय वाटले?

ही सामाजिक विकृती आहे. समाजात सकारात्मकता, सुसंवाद कमी आणि विकृतीचे प्रमाण अधिक आहे, हे खरे. समाजात असे काही लोक असतात की ज्यांना का आणि किती पैसे कमवावे, हेच कळत नाही. त्यांना आयुष्याचा आवाकाच माहीत नसतो. आयुष्यात कामासाठी मिळणाºया उण्यापुºया १५-२० वर्षांत तुम्ही काय आलेख मांडता, हे महत्त्वाचे. लोकांना हा हिशेब कळत नाही. पण जशी ही माणसे आहेत तशीच समाजात असंख्य चांगली माणसेही आहेत. समाज म्हणून आपण सगळे सारखे आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्याकडे २८ हजार कोटींची संपत्ती असेल; पण प्यायला पाणीच नसेल, तर तोसुद्धा तडफडून मरेल. म्हणून सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करायला हवा. आपल्याला समाजानेच मोठे केले, ही गोष्ट सेलिब्रिटींनीही लक्षात घ्यायला हवी.

‘नाम’च्या कार्याची सरकारने काही दखल घेतली का?

बहुधा घेतली असावी. अनेक राजकारणी या चळवळीबद्दल चांगले बोलत आहेत. त्यांना वाटले तर मोठे काम होऊ शकते, व्याप्ती वाढू शकते; पण मला वाटते, आपण सगळे सरकारमध्ये असतोच की! आम्हाला अनेक आयएएस अधिकारी मदत करताहेत.. अश्विन मुद्गल, नवलकिशोर राम, व्ही. श्रीकांत यांच्यासारख्या तरुण अधिकाºयांकडून खूप चांगला अनुभव आला.

शेतमालाला भाव मिळावा म्हणून आजवर अनेक आंदोलने झाली, तेव्हा नाना-मकरंद कोठे होते, अशी टीका लेखक संजय पवार यांनी केली…

अशा गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. मुळात संजय पवार यांनी शेतकºयांसाठी काय केले? एखाद्याला चांगले बोलता, लिहिता येते म्हणून तुम्ही सवंगच बोलायला पाहिजे, असे नाही. पवार हे लेखक आहेत. त्यांनी का नाही लिहिले यापूर्वी शेतकºयांविषयी? बोलणे सोपे असते. काठावर राहून इतरांना पोहायला शिकवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही उतरा की पाण्यात! मला पवार यांच्याबद्दल आदरच आहे; पण त्यांनी त्यांची ऊर्जा सकारात्मकतेसाठी खर्च करायला हवी. काम करीत असताना त्याबद्दल बरे-वाईट बोलले जाणारच आहे. आम्ही हे काम सुरू केले नसते आणि आमच्या व्यवसायात मग्न राहिलो असतो, तर पवार आनंदी झाले असते का? पाटेकरांना मी नागपूरपासून मुंबईपर्यंत रस्त्याने प्रवास करायला लावला, हे पवारांना माहीत आहे का? तेव्हा या सगळ्याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. आम्ही यापूर्वीही शेतकºयांना मदत केलीच होती; पण सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. राहिला प्रश्न हमीभावाचा. त्यावर सरकारने काम करावे. हवे तर पवारांनी लिहावे. आम्ही काही नेते वा धुरिण नव्हे. तसे होण्याची आमची इच्छाही नाही. आम्ही माणसे आहोत आणि जीवनाच्या अंगाने काम करीत आहोत. आंदोलने, भांडणे यात आम्हाला रस नाही. ही चळवळ प्रसिद्धीसाठी सुरू केलेली नाही. कारण आम्ही आमच्या स्तरावर प्रसिद्ध आहोतच. या कामासाठी आम्ही कोणताही पुरस्कारही स्वीकारणार नाही. आणखी दोन-तीन वर्षे काम करू आणि ही चळवळ कोणा चांगल्या माणसाच्या हातात सुपूर्द करू. त्यामुळे या चळवळीकडे माणूस म्हणून व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे.

मुलाखत- सुदीप गुजराथी, नाशिक