करोगे याद तो हर बात याद आएगी…

khayyam प्रतिभावंत माणसं यशस्वी होतातच असे नाही अन् यशस्वी माणसं प्रतिभावंत असतातच असंही नाही. नियतीच्या या खेळाचा प्रत्यय आलेली अनेक माणसं हिंदी चित्रपटसृष्टीत आढळतात. गुणवत्ता असूनही पुरेशी संधी न मिळाल्यानं त्यांच्या प्रतिभेचं ख-या अर्थानं चीज होऊ शकलं नाही. संगीतकार सज्जाद हुसेन, सरदार मलिक (सध्याचा आघाडीचा संगीतकार अन्नू मलिकचे पिताश्री), जयदेव हे यशापासून वंचित राहिलेले गुणवान संगीतकार. याच श्रेणीतले आणखी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणजे खय्याम.

फेब्रुवारी १९४७ मध्ये खय्याम मुंबईत आले. हुस्नलाल, भगतराम यांच्यासोबत काम करू लागले. त्यांनी गायलेली एक चीज या संगीतकार जोडगोळीला खूप आवडली. त्यांच्या आवाजावर प्रभावित होऊन ‘रोमिओ ज्युलिएट’ या चित्रपटात खय्याम यांना जोहराबाई अंबालावालीसोबत “दोनो जहॉ तेरी मोहोब्बत मे हार के, वो जा रहा है कोई शब-ए-गम गुजार के” हे गाणे गाण्याची संधी दिली.

१९४७ मध्ये रहमान वर्मा सोबत एक चित्रपट खय्यामना मिळाला. या जोडीने १९५० पर्यंत ५ चित्रपटांना संगीत दिलं. पैकी खय्याम यांनी बांधलेलं “अकेले में वो घबराते होंगे, मिटा के मुझको पछताते होंगे” हे ‘बीवी’ चित्रपटातलं रफीने गायलेलं नि वलीसाहेब यांनी लिहिलेलं गाण खूप गाजलं. वलीसाहेब निर्मातेही होते. त्यांचा पुढचा चित्रपट खय्यामना मिळाला, पण वलीसाहेबांनी त्यांना गुलाम हैदर, नौशाद यांच्यासारखं संगीत देण्याचं सुचवल्यानं त्यांनी हा चित्रपट सोडला. पुढे ते खजीत आर्टमध्ये दाखल झाले. अभिनेत्री नर्गिसची आई जद्दनबाईमुळे खजीतच्या चंदूलाल शाह यांचा ‘फूटपाथ’ हा चित्रपट त्यांना मिळाला. वलीसाहेबांनी नाकारलेलं “शाम-ए-गम की कसम” हे तलत मेहमूदच्या मधाळ स्वरात भिजलेलं अजरामर गाणं याच चित्रपटातलं. ‘फूटपाथ’ चालला नाही, पण गाण्यानं मात्र इतिहास घडवला. संगीतकार म्हणून खय्याम यांना पहिलं मोठं यश लाभलं. याच वर्षी म्हणजे १९५३ मध्ये त्यांनी गायिका जगजीत कौर यांच्याशी प्रेमविवाह केला.

khayyam ‘फूटपाथ’ नंतर ‘लालारूख’ हा चित्रपट खय्यामना मिळाला. यात त्यांनी केवळ ४-५ वाद्यांवर गाणी तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यातलं ” हैं कली-कली के लब पर तेरे हुस्न का फसाना, मेरे गुलसिता का सबकुछ तेरा सिर्फ मुस्कुराना ” हे गाणं लोकप्रिय झालं. या चित्रपटाची गाणी कैफी आझमी यांनी लिहिली होती. यानंतर खय्याम यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे राज कपूरची भूमिका असलेला, रमेश सहगल यांचा ‘फिर सुबह होगी’. याची गाणी साहिर लुधीयानवींची होती. यात ” इन काली सर्दिओं के सर से, जब रात का ऑचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, वो सुबह कभी तो आएगी ” (मुकेश-आशा भोसले) या गाण्यासाठी त्यांनी ४ चाली तयार केल्या होत्या. त्या ऐकून दस्तुरखुद्द राजकपूरने गौरवोदृगार काढले होते. याच चित्रपटातील ” आसमॉ पर है खुदा और जमी पर हम, चीनो अरब हमारा ” या गाण्याचंही रसिकांनी कौतुक केलं.चित्रपट स्वीकारतांना त्यांच्या कथानकातल्या व्यक्तिरेखा, कथाकल्पनेचा उद्देश समजून घेतल्यावरच खय्याम होकार देत. म्हणूनच कथेला न्याय देऊ शकणारं संगीत देता येणार नाही असे वाटल्याने यश चोप्रांचा ‘सिलसिला’ त्यांनी नाकारला. परिणामी ‘कभी कभी’ नंतर खय्याम-यश चोप्रा एकत्र आले नाहीत हे रसिकांच दुदैव! त्यांचे कैफी आझमी याच्यांशी छान सूर जुळले होते. त्याच्या मते कैफी हे आधुनिक गालिबच होते.

खय्याम यांनी आपल्या संगीताद्वारे गझलचं पावित्र्य जपलं. त्यांनी गझलला एक नवा आयाम दिलाय. बाजार, उमरावजान, रजिया सुलतान यासारख्या चित्रपटात खय्याम यांनी आपल्या संगीतातील गझलगीतांचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. विशेषत: ‘बाजार’ मधल्या गझला त्यांच्या प्रतिभेचं मनोज्ञ दर्शन घडवतात. पूर्व शतकातला श्रेष्ठ कवी मीर नकी मीर (दिखाई दिए यूँ), स्वातंत्र्यपूर्व काळातला शायर मख्दूम मोहीउद्दीन (फिर छिडी रात बात फुलों की) आणि आधुनिक काळातला बशर नवाझ (करोगे याद तो हर बात याद आएगी) अशा तीन वेगवेगळया कालखंडातल्या शायरांच्या गझला एकाच चित्रपटात तेही ऐतिहासिक नव्हे तर सामाजिक कथानक असलेल्या चित्रपटात एकत्र गुंफण्याची अद्वितीय किमया खय्याम यांनी यशस्वीपणे साधली आहे. या सा-या रचना त्यांचं संगीतकलेवरील श्रेष्ठत्व ठळकपणे अधोरेखित करतात.

बीवी, फूटपाथ, धोबी डॉक्टर, फिर सुबह होगी, लालारूख, दर्द, दिल-ए-नादान, बावरी, मेहंदी, बेपनाह, जान-द-वफा वगैरे चित्रपटामध्ये त्यांनी आशा भोसलेंना संधी दिली. दिल चीज क्या है, ये क्या जगह है दोस्तो, इन ऑखो के मस्ती के, बस इकबार मेरा कहा, जुस्तजू जिसकी थी (उमरावजान), जिंदगी जब भी तेरी (बाजार), ऐ-दिल-ए-नादान, जलता है बदन, मेरा हिज (रजिया सुल्तान) यासारख्या गाण्यांमधून खय्याम नावाच्या संगीतकाराच्या सृजनक्षमतेनं चकीत व्हायला होतं. खय्याम याचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्यांच्या संगीतात गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांनी केलेलं गायन. ते इप्टाशीही निगडीत होते तेव्हा त्यांना प्रेमधवन, सज्जाद जहीर, कृष्णचंदर, सदाहअत हसन मंटो, मजरूह, कैफी आझमी भेटले. त्यांनी इप्टांच्या नाटकांनाही संगीत दिलं. शिवाय गझलांचे खासगी कार्यक्रमही केले. तेव्हा त्यांची तलत मेहमूदची गाजलेली गझल म्हणजे “आ गई फिर से बहार आ गई”. १९४८ मधल्या ‘हीर रांझा’ या इतरांसोबत केलेल्या चित्रपटातलं त्याचं “उडपुड जानिया” हे गाणं फार गाजलं होतं. चित्रपटात भांगडा सादर करणारं हे बहुधा पहिलं गाणं असावं. गझलेच्या प्रांतात स्वत:ची वेगळी ओळख असणा-या खय्याम याचा ‘शगुफ्तगी’ हा गझल अल्बम चार वर्षापूर्वी आला होता. गझलेच्या सौंदर्य नजाकतीनं खुलविणा-या या संगीतकाराने शाम से नेहा लगाए, प्रभुजी सुनियो अरज हमार, मॉखन नही चुरायो वगैरे भजनं स्वरबध्द करून त्यातही आपली छाप उमटवली आहे.

तुम अपना रंजो गम (शगुन), कभी किसीको मुक्कमल जहॉ नही मिलता (अहिस्ता अहिस्ता), हजार राहे मूड देखी (थोडीसी बेवफाई), गापूची गापूची गम गम, जाने मन तुम कमाल करती हो, मुहब्बत बडे काम की (त्रिशुल), ये हॅसी दर्द है, दर्द सिनेसे लगा लेते है (दर्द), अब कहॉ जाए के पासबॉ कोई नही (प्यार की बाते), मै तिहारी नजर भर देख लो (बंबई की बिल्ली), रंग रंगीला सॉवरा मोहे (बारूद), मेरे चंदा मेरे नन्हे (आखरी खत), अपने आप रातो में (शंकर हुसेन), चोरी चोरी कोई आए (नूरी), ये मुलाकात इक बहाना है (खानदान), यांसारखी हळूवार, श्रृतीमधुर गाणी देणारे खय्याम ५० वर्षापेक्षाही जास्त काळ चित्रपटसृष्टीत आहेत. मात्र त्यांच्या चित्रपटांची संख्या अतिशय अल्प आहेत. असामान्य प्रतिभा लाभूनही व्यावसायिक यश त्यांना फारसं लाभलं नाही. परिणामी खय्याम यांच्या संगीताच्या सौंदर्याची अन् सामर्थ्याची खरी ओळख होऊ शकली नाही. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल खय्याम साहेबाचं मन:पूर्वक अभिनंदन.

– प्रवीण घोडेस्वार