आत्मिक प्रेमाचा सुगंध पसरवणारी चित्रकविता कवी मनोहर मंडवाले यांचा ‘तुझ्या पाऊलखुणा’ हा पहिलाच काव्यसंग्रह. ना. धो महानोरांनी आपल्या ओघवत्या शैलींत प्रस्तावना देऊन गौरविलेला.
कवी स्वत: चित्रकार असल्याने त्यांनी आपल्या कवितांना चित्रांच्या कोंदणात बसवून एक आगळा वेगळा व जम्बो साईज संग्रह काढण्याचे धाडस दाखविले आहे. कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्तीवर बऱ्याचदा मर्यादा येतात, परंतु मंडवाले यांनी कवितेत अबोल राहिलेल्या भावना चित्रांद्वारे हुबेहुब टिपल्या आहेत, चित्रांमुळेच त्यांच्या कविता जीवंत होऊन वाचकांशी संवाद साधतात. वाचण्याआधीच अंतरंगाला भिडतात, भिजवतात.
त्यांच्या बऱ्याच कविता म्हणजे विशुध्द प्रियकराने घेतलेला प्रेमाचा निजध्यास. त्यांनी बांधलेली प्रेमाची पुजाच! त्यांच्या कवितेत प्रेमाच्या नानाविध रंगांचं इंद्रधनुष्यच आपल्याला दिसतं. इथे वास्तवाचं भान सुटलेला स्वप्नील प्रियकरही भेटतो, तसेच प्रेमाचा उध्वस्त ताजमहाल नव्या उमेदीनं साधणारा आशावादी प्रियकरही भेटतो. हुरहुर लावणारी विरहातील व्याकुळता भेटते तर कधी मिलनातील अधीरता. या कवीला जरी प्रीतीची बाधा झाली असली तरी त्यांच्या प्रेमकवितांना वासनेचा कुठेही स्पर्श जाणवत नाही तर येतो फक्त आत्मिक प्रेमाचा सुगंध.
पुढील ओळी वाचल्यावर आपल्याला याची साक्ष पटते,
खऱ्या अर्थाने त्या दिवशी दोन मनं भेटली
अंतरंगाच्या मधुचंद्रात स्पर्शाशिवाय भिजली….
राधा कृष्णाच्या उत्कट, उदात्त प्रीतीची जबरदस्त मोहिनी या कवीवर आहे, किंबहुना त्यांची प्रीती हेच कवीचं श्रध्दास्थान आहे. त्यातूनच यमुनातीरी, परपुरूष, कोजागिरीचा चंद्र अशा कविता त्यांच्या मनाच्या कॅन्व्हासवर अलगद उतरतात अन् थेट वाचकांच्या काळजाचा ठाव घेतात. भावनेच्या सर्वोच्य शिखरावर विराजमान असलेल्या प्रेम भावनेचा कवीने आपल्या प्रतिभेच्या बाणाने घेतलेला वेध त्यांच्या नावाप्रमाणेच मनोहारी आहे. त्याच्या कवितेतील प्रियकर सर्वस्वाचा होम करून प्रियेची आराधना करताना म्हणतो,
तुझ्या वाटेवर घालून स्वत:चाच सडा
वाट तुझी पाहणारा मी तर गुलमोहोर वेडा!
अशी ही त्यांची कविती मनाच्या गाभाऱ्यातून आलेली अन् प्रेमाचे असंख्य विभ्रम चितारणारी असून ती नुसतीच प्रेमाच्या परीघातच फिरत नाही तर ती बहुआयामी आहे. त्यातून कधी स्त्री जातीचा हुंकार ऐकू येतो तर कधी पशुवृत्तीच्या पुरुषांमुळे समस्त पुरुषजातीलाच कलंक लागल्याची कैफियत. स्वत: पुरुषांच्या मानसिकतेकडे त्रयस्ताच्या भूमिकेतून पाहण्याची दृष्टी कवीला लाभली आहे. त्यामुळेच कवीने पुरुषांच्या पशुवृत्तीवर, कळणार कसं, पुरुष आहोत म्हणून?, कवच कुंडले अशा कवितातून निर्भयपणे शब्दांचे प्रहार केले आहेत. स्त्री-पुरुष मैत्रीकडे पाहणारी समाजाची दांभिक मानसिकताही त्यांना विषण्ण करते, त्यातूनच समाजाला आत्मपरिक्षण करायला लावणारी कविता त्यांच्या लेखणीतून साकारते,
संस्कृती, पाप-पुण्याच्या बेगडी कल्पनांच
ओझं का फक्त स्त्रियांचंच?
स्त्री-पुरूष मैत्रीकडे निकोप मनानं बघणारी
कधी येतील का जन्माला माणसं?
माणसातल्या माणूसकीला आव्हान देतांनाच त्यांची कविता समाजातील घातक रुढींविरुध्द आवाजही उठवते. सामाजिक बांधीलकीच्या तीव्र जाणिवेमुळेच त्यांच्या, दुर्योधन, एक असतंच पोटात,… षढांचे राजकारण अशासारख्या कवितेतून वाचकांना सुन्न करणारी वास्तवाची दाहक रुपं डोकावतात. कवी शहरी वातावरणाशी एकरूप झाले असूनही त्यांचे आपल्या गावाशी घट्ट ऋणानुबंध जुळले आहेत. त्यामुळेच सोनाबाय भाजीवाली सारख्या ग्रामीण जनतेच्या व्यथा वेदनेबरोबर आदिवासींची जीव पिळवटून टाकणारी वेदनाही त्याच्या शब्द कुंचल्यातून बोलकी होते आणि पुढील ओळी वाचताना ती वाचकांचही ह्रदय हेलावून टाकते.
भाकरीच्या तुकडयाविना पोट टेकले पाठीला
कापड नाही हातभर माणूसपण झाकायला
मनाच्या कृष्ण विवरांचा शोध घेतानाच निसर्गाची बदलणारी रुपही कवीने आपल्या आपल्या शब्द कुंचल्याने रेखाटली आहेत. श्रावण, गोष्ट वेडया पावसाची, येरे येरे पावसा या कवितेतून तर कवी स्वत:च पाऊस होऊन वर्षताना दिसतो आणि आपल्यालाही आज थेंब पावसाचा होऊन जगू या अशी मयूरी साद घालतो. एकूणच प्रेमाच्या तालावर जीवनाचं गाणं सुरेल करू पाहणारा हा कवी संसारालाही तेवढंच महत्व देताना दिसतो. यशाची पाऊलवाट समाधानी संसाराच्या दरवाजातूनच सुरू होते यावर कवीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच कवी वाचकांना संसाराचा मूलमंत्र द्यायलाही विसरत नाहीत ते म्हणतात, तू बोलावं, मी ऐकावं, मी हाक द्यावी, तू साद घालावी अन् ही वीण दोघांच्या मनाची, आणखी घट्ट व्हावी, घट्ट घट्ट व्हावी तुझ्या पाऊलखुणा बरोबरच ‘नभातील चंद्रमा’ हा त्यांचा पहिला वहिलाच चारोळी संग्रहही प्रकाशित झाला आहे. अतिशय देखणं मुखपृष्ठ असलेल्या या संग्रहातील चारोळया म्हणजे प्रतिभेचा उत्स्फूर्त अविष्कार विशेष म्हणजे या चारोळयांना समर्पक अशा चित्रांबरोबरच शिर्षकाचीही जोड आहे. यातील चारोळयांवर जास्त काही लिहिण्यापेक्षा त्यातील चारोळी येथे उदधृत करते,
माझ्या बेचैन उदास मनाला
क्षण आनंदाचे हवे असतात
तुझ्यापेक्षा ते आता
तुझ्या आठवणीतच मला भेटतात
साध्या, सोप्या भाषेतल्या त्यांच्या कविता व चारोळया म्हणजे त्यांच्या भावविभोर मनाचं प्रतिबिंबच, म्हणूनच त्या संवेदनशीलतेच्या पाऊलखुणा जपत जातात आणि वाचकांनाही एक तरल अनुभूती देतात. विधात्याने या कवीला देलेल्या अनोख्या सौंदर्यदृष्टीचा आपल्याला कवितेगणिक प्रत्यय येत राहतो. काही कवितांमध्ये मात्र विशेषणांचा अतिरेक आणि शब्दांच्या अवाजवी सौंदर्याला महत्व दिल्याचं जाणवतं. त्यांना लाभलेल्या सौंदर्यदृष्टीमुळेच त्यांचे दोन्ही संग्रह देखणे झाले आहेत, हे मात्र निसंशय! अगदी वाचकांनी संग्रही ठेवावे असेच!
– संगीता अरबुने, मुंबई (वसई)