तुम्ही कधी घराच्या आवारामधे एखादं झाड लावलं आहे का? वाढणं, आनंदात डुलणं, मोहरणं, डवरून येणं हे झाडाचे किती सहज गुण आहेत नाही ? भुरभुर पाऊस, हिरवळ, त-हेत-हेची फुले, पक्षी, त्यांचे चित्रविचित्र आवाज, ओढाळलेला ओढा, खळखळ वाहणारी नदी, गरजणारा दर्या, उंचच उंच पर्वत… या सा-यांमधे असणारी सहजता आपल्याही जगण्यामधे उतरली पाहिजे नाही का ?
‘सृष्टीरंग’ या सदरात आम्ही निरनिराळे पक्षी, प्राणी, फुले, फळे, झाडे, तारे, ग्रहगोल, पर्यावरण यांची माहिती आपणास देणार आहेत. थोडक्यात सृष्टीचे विविध रंग आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही आमच्याबरोबर सृष्टीरंगात सामील व्हा.
श्रावण आणि भाद्रपद वर्षाऋतूचे आवडते महिने. या महिन्यात सगळ्या सृष्टीनेच हिरवा शालू ल्यायला सुरवात केलेली असते. अशा काळात निसर्गातल्या झाडांनाही नवीन बहर आलेला असतो. नव्या न्हव्हाळीची कोवळी पालवीही त्यांच्या अंगाखांद्यावर विराजमान झालेली असते. या महिन्यात असलेल्या धार्मिक सणांसाठी लागणार्या पूजासाहित्यातही काही वनस्पतींना मानाचे स्थान मिळाले आहे.
शंकराच्या पूजेतील मानाचे स्थान मिळवलेला हा वृक्ष आहे. याची पाने संयुक्त पध्दतीच्या मांडणीची असतात. याची त्रिदले असतात. देठाकडचा भाग जाड असल्याने तो तोडून शंकराला वाहिला जातो. बेलाचे झाड मध्यम उंचीचे असते. याचे महत्व पुराणात उपनिषदातही विषद केले आहेत. बेल वृक्षाच्या सालीचे काष्ठ बनवतात, हे काष्ठ विशिष्ट मंत्राने मंत्रून ताईतासारखे दंडात बांधतात.
उमामहेश्वराला प्रिय असणारा हा वृक्ष, पण गणेशचतुर्थीला गणपतीला बेलाची पानं अर्पण करायचाही प्रघात आहे. संपूर्ण बिल्ववृक्षात औषधी गुणधर्म आहेत. कमी पाण्याच्या जागी हा वृक्ष चांगला वाढतो. बेलाला काटे असतात. फांद्यावर तीन किंवा पाच दलांची संयुक्त पाने येतात. एप्रिल-मे महिन्यात बेलाला हिरवट-पांढरी, गोड वासाची फुलं येतात. बेलफळं गोल, टणक आणि हिरवट- राखट रंगाची असतात. फळाचा गर केशरी तंतुमय असून यात भरपूर बिया असतात. बियांची उगवण क्षमता कमी असते. बेलाला सरफळ, बेलपत्रं, शिवद्र त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावे आहेत. “एजल् मारमेलॉज” असे याचे शास्त्रीय नाव आहे. बेल वात, पित्त, कफ असे तिन्हीही दोष नाहीसे करत असल्याने याला विशेष महत्त्व आहे. जुलाबात बेलफळ हे उत्तम औषध आहे. आवेमुळे पोट दुखत असेल तर बेलफळाचा मुरंबा खातात. बेलाच्या पानाचे पाणी प्यायल्यास तरतरी येते. मेंदूज्वर, तापातील वाताने रोगी बडबडत असेल तर हे पाणी पिण्यास देतात. त्वचारोगावरही बेल उपयोगी आहे. पोटात जंत झाल्यास बेलाच्या पानांचा रस घेतात. उलटी थांबण्यासाठी आंब्याच्या कोयीसह बेलफळाचा काढा देतात. शौचावाटे रक्त पडत असेल तर याचे चाटण उपयोगी आहे. उष्णतेमुळे तोंड आल्यास बेलफळ फोडून पाण्यात कढवावे व त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. अंगात शक्ती येण्यासाठी बेलफळाचा अर्क काढून तो खावा आणि त्यावर गायीचे दूध प्यावे. बेल रक्तशुद्धी करणारा आहे. बेलफळाचे सरबत रुचकर लागते. ते भूक वाढवणारे आहे. बेलाच्या खोडातून उत्तम प्रतीचा डिंक मिळतो.
बेलाचे धार्मिक महत्व
बेलाच्या अंगी असणार्या महत्त्वाच्या गुणधर्मामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेच्या पत्रीत स्थान दिले आहे. शिवाय या वृक्षात अनेक देवदेवतांचे वास्तव्य असते अशीही धारणा आहे. म्हणूनच त्याचे संवर्धन, जतन केले पाहिजे. पानांचा रंग हिरवागार असून, हा रंग शंकराच्या साधेपणाचा व पवित्र्याचा द्योतक मानतात. बिल्वपत्रास शंकराचा त्रिशूल तर बेलाला साक्षात लक्ष्मी मानले आहे. स्कंद पुराणातही याचे महत्त्व वर्णिलेले आहे. त्रिदळातील डावे पान म्हणजे ब्रह्मदेव, उजवे विष्णू आणि मधले पान शिव-पार्वती आहेत. पाठीमागच्या बाजूला यक्ष असून, देठाच्या ठिकाणी इंद्र आणि इतर देव राहतात. काहींच्या मते त्रिदळ हे तीन वेदांचं प्रतीक आहे. बेलफळ हे श्रीफळ असून, ते लक्ष्मीला प्रिय आहे. माघ वद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीला बेलवृक्षाचं महत्त्व आहे. तेव्हा शंकराला बेल वाहण्याचा प्रघात आहे. श्रावणात अनेक सुवासिनी शंकराला लक्ष बेल वाटण्याचे व्रत करतात. बेल वृक्षाच्या मुळात गिरिजादेवी, शरीरात (खोडात) दाक्षायणी, फांद्यांमध्ये महेश्वरी, पानांत पार्वती आणि फळात कात्यायनी अशी देवीची रुपे वसतात. बेलाचे त्रिदळ हे त्रिकाल, त्रिशक्ती, ओंकाराच्या तीन मात्रा यांचे द्योतक आहेत.
संदर्भ : डॉ.कांचनगंगा गंधे यांचे लिखाण व मराठी विश्वकोश
संकलन : भाग्यश्री जोगळेकर-कुलकर्णी