गान-हिरा : हिराबाई बडोदेकर

Hirabai Barodekar हिराबाईंना आपल्या गायनाचा प्रसार करण्यासाठी दोन प्रभावी साधने उपलब्ध झाली. ती म्हणजे ध्वनिमुद्रिका आणि आकाशवाणी. गावोगावी झालेल्या जलशांशिवाय या ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या.

नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. पण चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच ‘राधेकृष्ण बोल’, ‘गिरीधर गोपाला’, (खमाज), ‘पायोरे मैने’ (दुर्गा), ‘चाकर राखोजी’, यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, ‘किस कदर है’, ‘या आकर हुआ मेहमान’, या गझला आहेत. हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग असावा. त्या रागातील त्यांच्या सात ध्वनिमुद्रिका आहेत. त्या अशा
१. पिया मतवाले,
२. सुंदर स्वरूप जाके,
३. लागी मोरी बिंदिया,
४. साथ ही कही,
५. हरिनाम बिना (भजन),
६. ले गयो हार सपनेंमे दर्शन आणि
७. अकेले मत जैयो (ठुमरी).

१९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. १९७० नंतर त्यांच्या दोन लॉग प्लेईंग रेकॉर्डस् प्रकाशित झाल्या.

एका एल.पी.त मुलतानी व यमन राग समाविष्ठ आहेत, तर दुसरीत चंद्रकंस आणि वसंत बहार. ही एल.पी. मात्र हिराबाईं आणि सरस्वतीबाई राणे यांच्या युगलगानाची आहे. १९७० नंतर त्यांच्या दोन एक्सटेंड प्लेईंग रेकॉर्डसही बाहेर आल्या. एका एल.पी.त साध्वी मीराबाई या नाटकातील

१ . रूचिरचि हा त्याले
२. दाता प्रभू सकलांचा
३. ब्रिजलाल गडे आणि
४. असार पसारा

ही पदे आहेत. तर दुसरीत अहिरभैरवची, ‘रसिया म्हारा म्हारोजी ही चीज’ व ‘एक पल बतियाँ दे सैंया को’ ही पूर्वा कल्याणमधील चीज आहे.

आकाशवाणी
हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत. परंतु पुढे साखळी कार्यक्रमाची पध्दत रूढ झाल्यावर हिंदुस्थानातील बहुतेक सर्व आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम झाले. डॉ.बी.व्ही.केसकर यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी संगीताचे राष्ट्रीय कार्यक्रम सादर करण्याची प्रथा सुरू केल्यानंतर राष्ट्रीय कार्यक्रमातही गाण्याचा मान त्यांना अनेकदा मिळाला आहे. पंचेचाळीस वर्षात हिराबाई कोणत्या केंद्रावरून किती वेळा गायल्या असतील याची मोजदाद करणे कठीण आहे.

आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे २ ऑक्टोंबर १९५३ रोजी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री. मोरारजी देसाई यांच्या हस्ते, त्या काळचे नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर व मुंबई राज्याचे महसूलमंत्री श्री. भाऊसाहेब हिरे यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.

त्या दिवशी प्रेक्षपित झालेल्या पहिल्या कार्यक्रमात गाण्याचा मान हिराबाईंना मिळाला. त्या रात्री हिराबाईंखेरीज पं. विनायक पटवर्धन यांची भजने, शंकरराव गायकवाड आणि मंडळीचे शहनाईवादन, कवी यशवंत यांचे काव्यवाचन, खासदार पी.आर.कानवडे यांचे भजन आणि शाहीर नानिवडेकर यांचे पोवाडे असे कार्यक्रम झाले. आकाशवाणीला पन्नास वर्षे पुरी झाली म्हणून १९७७ मध्ये आकाशवाणीने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांच्या हस्ते दिनांक २७ जुलै १९७७ रोजी आकाशवाणीच्या जुन्या कलाकार म्हणून हिराबाईंचा सत्कार करण्यात आला. त्यांना एक मानचिन्हही देण्यात आले. ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात.

संदर्भ ग्रंथ
१) धन्य जन्म जाहला – राजाराम हुमणे.
२) गान-हिरा – डॉ.सौ.शैलजा पंडित/श्री. अरूण हळवे

चारुशीला दिवेकर
(स्वरसेतू-एप्रिल/जून २००५ या अंकातून)