सर्जनशीलता शोधा, आनंद गवसेल!

मुलाखत – डॉ. अनिल अवचट
anil-awchat डॉ. अनिल अवचट … पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक… ज्येष्ठ लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार, शिल्पकार, बासरीवादक, ओरिगामीचे कलावंत… अशा किती ओळखी सांगाव्यात? दिवंगत पत्नी सुनंदा यांच्या साथीने डॉ. अवचट यांनी तीस वर्षांपूर्वी ‘मुक्तांगण’ची स्थापना करून व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली. समाजातल्या उपेक्षित वर्गाच्या व्यथा-वेदना लेखनातून मांडल्या. दिलखुलास जगणे म्हणजे काय, याचे उदाहरण असलेले डॉ. अवचट ऊर्फ बाबा यांच्याशी साधलेला संवाद…

‘मुक्तांगण’ला तीस वर्षे झाली… मागे वळून पाहताना काय वाटते?

समाधान वाटते. ‘मुक्तांगण’च्या आधी मी नुसता लेखक होतो. शरीराची गात्रे थकल्यानंतर मी निवांत जगलो असतो. सुनंदा गेल्यावर आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती; पण आज ‘मुक्तांगण’मुळे मला मोठा परिवार मिळाला आहे. कोठेही जा, ही माणसे नेहमी बरोबर असतात. बाया-बापड्या जेव्हा आपल्या व्यसन सुटलेल्या नवºयाबद्दल कौतुकाने सांगतात- ‘ते इतक्या वर्षांनंतरही चांगले आहेत, दारूला शिवले नाहीत…’ हे ऐकून बरे वाटते. त्यांच्या आयुष्यात दारूच्या रूपाने मोठी आपत्ती येऊन गेलेली असते. तिच्यातून त्यांची सुटका करून त्यांना शांततेकडे नेण्यात आपला थोडा का होईना वाटा आहे, ही बाब समाधान देऊन जाते.

‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत वापरली जाते, असे वारंवार ऐकू येते… नेमकी काय पद्धत आहे ही?

पद्धत अनोखी वगैरे काही नाही. आम्ही त्या माणसातल्या माणुसकीला साद घालतो एवढेच. व्यसनाधीन माणूस स्वत:च्या, कुटुंबाच्या नजरेतून पडलेला असतो. त्यामुळे आधी त्याच्यात स्वत:बद्दल आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मीसुद्धा कोणी तरी आहे, माझीही कोणाला तरी गरज आहे, ही भावना निर्माण करतो. आता या भावना निर्माण करायची म्हणजे त्यांची काही इंजेक्शन्स नसतात. पण आमच्या ‘मुक्तांगण’मध्ये वातावरणच असे आहे, की त्यातून चांगला माणूस होण्याची प्रेरणा मिळते. आम्ही ‘मुक्तांगण’मधल्या मित्रांना औषधे देऊन त्यांचे व्यसन सोडवत नाही. ‘मुक्तांगण’मध्ये अनेक व्यक्तींचा समूह एकत्र जगतो, सारे जण एकत्र कामे करतात… मायेने पारखे झालेल्यांना माया मिळते आणि त्यांच्यात बदल घडत जातात.

तुम्ही चित्रे काढता, ओरिगामी करता, लिहिता… एवढे मनसोक्त जगणे जमते कसे?

मी साधेसोपे जगतो. आणि खरे सांगू? प्रत्येक माणसात काही ना काही सर्जनशीलता असतेच; पण त्याच्यातली सर्जनशीलता त्याचे कुटुंब, शाळाच संपवून टाकते. स्वत:तली सहजप्रेरणा शोधण्याची संधी मिळाली तर प्रत्येक जण असा दिलखुलास जगू शकतो. अभ्यास, शाळा, नोकरी, धंदा या रामरगाड्यात माणसाचा आनंद हरवून जातो. रोजची कामे सांभाळूनही प्रत्येकाने जरा स्वत:ला शोधले, स्वत:ला आवडणाºया गोष्टी शोधल्या, तर प्रत्येकाला आनंदाची गुरुकिल्लीच सापडू शकते.

लहान मुलांविषयी तुम्ही नेहमी पोटतिडकीने बोलता… त्यांच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’बद्दल काय सांगाल?

एवढीशी मुले इतके छान गातात, नाचतात, हे पाहून कौतुक वाटते; पण त्यांच्यावर या वयात लादली जाणारी तीव्र स्पर्धा पाहून वाईटही वाटते. ही मुले या वयात ‘सेलिब्रिटी’ होऊन जातात. मग त्यांचे आई-वडील त्यांच्या पुढे-पुढे करतात. मुलांमुळेच त्यांना प्रसिद्धी मिळालेली असते. एकूणच हा सगळा विचित्र प्रकार सुरू होतो. शिवाय या प्रकारात पैसा, गैरप्रकारांनीही शिरकाव केला आहे. त्यामुळे छंद म्हणून या गोष्टी ठीक आहेत; पण त्यांचा व्यवसाय होणे टाळायला हवे…

तुम्ही तुमच्या मुलींना महापालिकेच्या शाळेत घातले… खूप शिकायचे होते; पण शाळा आड आली, हे प्रसिद्ध वाक्य नेहमी सांगता…

आम्ही आमच्या दोन्ही मुलींना त्यांच्या मर्जीनुसार शाळेत घातले. ‘तुम्हाला शाळेत जायचे असेल तर जा’ असे आमचे धोरण होते. आसपासची मुले-मुली शाळेत जाऊ लागली, मग आमच्या मुलींनाही शाळेत जावेसे वाटू लागले. मग जेथे गरिबांची मुले असतील, जी शाळा घराजवळ असेल अशा शाळेत घालावयाचे ठरले. शाळा कशी मुक्त असावी. या वेळेत हे करावे, अमूक वाजता हा विषय शिकावा, अशी बंधने मुलांवर नकोत. दडपण, दबाव तर नकोच नको. या दिवशी हाच सदरा घालावा, अमूक दिवशी गणवेश घालावा, असेसुद्धा नको. मुलांमध्ये स्वभावत:च वैविध्य असते. त्यांच्यात सारखेपणा आणण्याचा सोस कशासाठी? गरीब-श्रीमंतांच्या मुलांच्या वेशभूषेत समानता असावी यासाठी खरे तर गणवेशाची योजना करण्यात आली आहे; पण अशा किती शाळा असतील, ज्यात गरीब आणि श्रीमंतांची मुले एकत्र शिकत असतील? गरिबांच्या शाळा वेगळ्या, श्रीमंतांच्या शाळा वेगळ्या. असे नको होते व्हायला. घराच्या जवळ असलेल्या सोयीच्या शाळेत मुलांना घालावे. उगाच दूरच्या शाळेत घालून प्रवासात, रिक्षा-व्हॅनच्या कोंडवाड्यात त्यांचे तास-दोन तास वाया कशाला घालवायचे? कोणतीही शाळा चांगली किंवा वाईट कशी असू शकते? आमच्या मुलींना महापालिकेच्या शाळेत घातल्यावर त्यांचे कोठे वाईट झाले? लोक उगाच कथित चांगल्या शाळेचा सोस धरून मुलांच्या लहानपणाचे नुकसान करतात.

काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतो आहे… तुम्हाला काय वाटते?

समाजातली वखवख वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. लोकांना वस्तूंमध्येच सुख वाटू लागले आहे. मानवी जीवनात फक्त पैसाच महत्त्वाचा आहे, अशी समान विचारधारा सर्वत्र रुजताना दिसू लागली आहे. त्यामुळे माणसे आयुष्यभर वस्तूंचा संग्रह करीत राहतात. कोट्यवधी रुपये कमावतात, जमवतात; पण त्यांच्याकडे आनंद कोठे दिसतो? कबीरांनी एका दोह्यात खूप छान सांगून ठेवले आहे, आयुष्यभर धनाच्या पाठीमागे लागलेल्या व्यक्तींना जेव्हा संतोषाचे धन मिळते, तेव्हा जमवलेला पैसा त्याला तुच्छ वाटू लागतो, असे त्यांनी त्यात सांगितले आहे; पण याचे भान आहे कोणाला? नेत्यांनी घोटाळे करून कोट्यवधी कमावले असतील; पण त्यांच्याकडे सुख आहे का? उलट कधी पकडले जाईल, याचीच त्यांना भीती असते. त्यांच्याकडे सारे जण त्याच नजरेने पाहत असतात. मग काय मिळवले त्यांनी आयुष्यात? भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने होतील, कायदे होतील; पण माणसाला हे कळले, तर ही समस्या कमी होईल, असे वाटते.

मुलाखत- सुदीप गुजराथी, नाशिक