जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना पारंपारिक गाणी गायच्या त्यांची गोडी अवीट होती म्हणूनच बहिणाबाईंची ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते. सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा पारंपारिक गाणी आहेत.
साष्टांग नमन माझे देवकीनंदना, वसुदेवसुता श्रीकृष्णा ।
अनन्यभक्तीने प्रतिदिनी स्मरता, सकल मनकामना साधती ॥
प्रथम वंदितो ऋषीकेशा दयाळा, गळा वैजयंतीमाळा ।
दुसरे नमन माझे शंखचक्रपद्मगदाधारी श्रीहरीलक्ष्मीनारायणा ॥
तिसरे पुंडरीकाक्ष केशवा चवथे मुरलीधरा माधवा ।
पाचवे गोविंद गुणातीत वासुदेवा, सहावे सर्वेश्वर संकर्षणा ॥
सातवे विश्वमूर्ती अनिरूध्दा, आठवे पुरूषोत्तम प्रद्युम्ना ।
नववे योगेश्वर श्रीकृष्णा, दहावे धन्वन्तरी जनार्दना ॥
अकरावे अक्षर श्रीविष्णु, द्वादश पितांबरधारी अच्युता ।
द्वादश ही श्रीकृष्णाची नावे, भक्तिभावे प्रतिदिनी जे स्मरती ।
द्वारकाधीश रूक्मिणीपती श्रीकृष्ण त्यास भवसागरातून तारती ॥
तूच कर्ता, तूच करविता, तूच सर्वांचा आधार ।
अनन्यशरणागत भक्तांचा योगक्षेम चालविण्याचा तुझा निर्धार ॥
‘सुदीप’ने श्रध्देने रचिलेले हे स्तोत्र संपूर्ण ।
सच्चिदानंद, भक्तवत्सल, तुलसीप्रिय श्रीकृष्ण माऊली
तव चरणी अर्पण ॥
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
चंदनाची उटी कुंकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥१॥
लंबोदर पितांबर फणीवर बंधना
सरळसोंड वक्रतुण्ड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी धावावे निर्वाणी
रक्षावे सुरवर वंदना ॥२॥
– संत रामदास
जय देव जय देव जय श्रीगुरूदत्ता ।
आरति ओवांळीता हरली भवचिंता ॥ध्रु॥
सबाह्य-अभ्यंतरीं तू एक दत्त ।
अभ्याग्यासी कैचीं कळेल ही मात ॥
पराहि परतलिं तेथे कैंचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥२॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥३॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ॥
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनीं श्रीदत्तध्यान ॥ जय ॥४॥
– संत एकनाथ