स्लमडॉग चमूतला मराठी माणूस

Rahul “आजकाल मराठी माणसं कुठेकुठे पोहचली आहेत?”, हे फक्त मराठी माणसाने कुणाला तरी उद्देशून म्हणायचे वाक्य राहिलेले नाही. तर ती वस्तुस्थिती आहे ! अगदी कालपरवाचीच गोष्ट ‘स्‍लमडॉग मिलेनिअर’ नाव आठवतंयं ? नक्कीच आठवत असणार. त्याला मिळालेला ऑस्करचा बहुमान तुमच्या लक्षात असेलच. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांना लागणारी ‘स्लम लोकेशन्स शोधणं’ ही एक कठीण कामगिरी होती. कारण तशी लोकेशन्स हा या चित्रपटाचा गाभा होता तसेच या कथेची गरज होती. या कामी त्यांना मदत केली एका मराठमोळया तरूणाने. त्या तरूणाचे नाव राहुल खंडारे. स्लम्समध्ये जन्माला आलेल्या आणि नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान प्राप्त झालेल्या या राहुल खंडारेचा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ पर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी मारलेल्या या गप्पा.

राहुल, तुझी कौटुबिंक पार्श्वभूमी, बालपण आणि शिक्षणाबद्दल थोडेसे सांग.
माझं मूळ गांव शेगांवजवळ आहे. वडील साधारण ३० वर्षांपूर्वी मुंबईत आले. परिस्थिती गरीब पण वडिलांचा दृष्टीकोन एकदम सकारात्मक. वडिलांनी VSNL (आताची MTNL) च्या केबलिंग वर्कसाठी खड्डा खणायचे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी गावाकडच्या तरूणांना मुंबईत आणले. त्यांची मदत घेतली. मुंबईत त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यांनी लग्न केलं, नंतर ते अंधेरीला एका झोपडीत रहायला आले. एका बाजूने अर्धवट भिंत आणि एका बाजूने झोपडी असा सगळा प्रकार होता. माझा जन्म १९८२ सालचा. माझं बालपणही त्याच झोपडपट्टीत गेलं. घरात खायला दोन वेळंच अन्न मिळतानाही मारामार. अशी अत्यंत हालाखीची परिस्थिती. पण वडिलांनी मात्र मला काहीही करून शिकवायचंच असं ठरवलं होतं. मला वडिलांनी लहानपणी विजयनगर सोसायटीतील इमारत क्र. १८ मधील बांदेकर बाईच्या बालवाडीत प्रवेश घेतला. नंतर आपसुकच माझा प्रवेश विजयनगरमधील परांजपे विद्यालयात झाला.

दहावीच्या परीक्षेनंतर मी कुरियरचा व्यवसाय चालू केला. लवकरच त्यामध्ये माझा जम बसला. अंधेरी आणि आजूबाजूच्या परिसरात मी आणि माझे काही सहकारी हे काम जोमाने करू लागलो. दहावीचा रिझल्ट लागला, फक्त ५५ टक्के मार्क मिळाले. नंतर पार्ला कॉलेजला (साठ्ये महाविद्यालय) प्रवेश घेतला. कुरिअरचा व्यवसाय सुरू होताच. चेन्नईला जाणारे एक पार्सल आमच्याकडून हरवले त्यामुळे त्याची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी लागली. नंतर मग मी अभ्यासावर लक्ष देण्याचे ठरविले आणि कुरिअरचा व्यवसाय माझ्या बरोबर काम करणार्‍या सलीमला सुपूर्त केला. नंतर अभ्यास करतांना अभ्यासेतर गोष्टींकडे साहजिकच ओढा लागला. मग कॉलेजमध्ये कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळताना माझी ओळख अश्विनी शेंडेशी (कळत नकळत मालिकेची गीतकार) झाली. आपसूकच मी कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळ, मराठी नाट्य मंडळ यांच्याकडे ओढला गेलो. नंतर आमच्या कॉलेजने आय. एन्. टी आणि मृगजळ या स्पर्धांमध्ये सादर केलेल्या आमच्या Y2K या एकांकिकेने बरीच पारितोषिके मिळविली. पुढे मी एकाच वर्षी नाटयमंडळ आणि क्रिडा मंडळ या दोन्हींचा सेक्रेटरी झालो. NSS च्या चळवळीत ओढला गेलो. वसईला NSS च्या माध्यमातून कुष्टरोग्यांची सेवा करण्यास गेलो. याकामी गोरेगावच्या डॉ. सांमत यांच्याबरोबर काम केले. वृक्षारोपणासारखे बरेच कार्यक्रम तसेच सामाजिक न्याय हक्क यांच्या जागृतीसाठी पथनाटये केली. या सगळया चळवळींमधून जाताना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजचा G.S. झालो. युथ फेस्टिवलचे काम केले. युथ फेस्टिवलच्या माध्यमातून हिंदी नाटय चळवळीशी ओळख झाली.

मग तू या क्षेत्राकडे कसा वळलास?
एकदा एका मालिकेच्या ऑडिशनसाठी अमित नावाच्या एका मित्राने मला विचारले. ती मालिका म्हणजे आभाळमाया-२. मला संवाद वाचायला सांगून लगेचच फ्लोअरवर उमेश कामत बरोबर उभे केले. दिग्दर्शक विनय आपटेना माझं काम आवडलं आणि जवळ जवळ फक्त एका भागापुरते (एपिसोड) असलेले माझे काम पुढच्या आठ भागांपर्यंत गेले. नंतर ‘कहानी जुर्म की’ नावाच्या एका हिंदी मालिकेत काम केले. नंतर त्याच प्रॉडक्शन हाऊसच्या स्टारप्लस वर लागणार्‍या ‘सारा आकाश’ नावाच्या मालिकेत ‘जय दिक्षित’ नावाचे पात्र रंगविले. साधारणपणे एका भागाचे २५०० रूपये मिळायचे जवळ जवळ ४५ भाग मी केले.

मग प्रॉडक्शनकडे कसा वळलास?
Rahul मी आधी सांगितल्याप्रमाणे NSS चा सेक्रेटरी होतो. त्यावेळी आमच्या कॉलेजमधील सारंगधर मॅडमच्या मदतीने ‘मॅन मॅनेजमेंट’ व्यवस्थित शिकलो होतो. सिरियल्समध्ये काम करताना रिकामा वेळ असायचा तेव्हा आजूबाजूचे स्पॉट बॉय, प्रॉडक्शनची इतर माणसं यांच्याशी माझी आपसूकच दोस्ती व्हायची. कॅमेरा कसा वापरतात, त्याचे काम कसे चालते, त्यात टेप कुठली असते. बिटा म्हणजे काय वगैरे गोष्टी शिकून घेतल्या. डीजी बिटा, डीव्ही, डीअस्आर याबद्दल माहिती करून घेतली. साहजिकच एक प्लॅटफॉर्म तयार झाला. नंतर माझी राजीव सिंग, के. के. सिंग (क्रांतीवीर, तिरंगा, वीरगती तसेच राम तेरी गंगा मैली फेम) यांचा मुलगा याच्याशी ओळख झाली. त्यांना भेटल्यावर मी त्यांना मला प्रॉडक्शन व त्या अनुषंगाने येणार्‍या इतर बाबींमध्ये रस आहे असे सांगितले. नंतर काही दिवसांनी त्याचाच एक भाऊ निर्माण करीत असलेल्या एका चित्रपटात प्रॉडक्शन सांभाळण्याची संधी मिळाली. काही दिवसांनी मला कळलं की मी भोजपुरी चित्रपट करणार आहे. त्या चित्रपटात ५ ते ६ गाणी होती. मग साहजिकच त्या कामांचा पण अनुभव मिळाला. या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिगच्या निमित्ताने माझी ओळख श्री. रवींद्र जैन, आरती अंकलीकर- टिकेकर, अलका याज्ञिक यांच्याशी झाली. पुढे त्या चित्रपटासंदर्भात काही वादविवाद होऊन सिंग साहेबांच्या भावाने त्यातून फारकत घेती. मग निर्मात्‍याने प्रॉडक्शनची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. अनेक समस्यांवर मात करून मी ती जबाबदारी पूर्ण केली. त्यानंतर मी ‘गंगा तोहरा पानी अमृत’ ही अरविंद चौधरी नावाच्या एका नावाजलेल्या निर्मात्याची फिल्म केली. पुढे ‘नदिया के पार’ नावाचा एक भोजपुरी चित्रपट केला. हे सर्व माझं कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत चालू होते. मला लहानपणापासून NCC ची आवड होतीच. मग मी शेवटचे वर्ष चालू असतांनाच MPSC ची परीक्षा दिली. मग पार्ल्यात योगेश जोशींची माझी ओळख झाली. त्यांना माहिती होते की हे मी भोजपूरी चित्रपट करीत आहे. पण भोजपूरी चित्रपट करण्यात मला रस वाटेना. नंतर ३-४ महिने कोरडे गेल्यावर गौतम जोगळेकरांच्या चित्रपटासाठी विचारणा झाली. मग तो चित्रपट करताना गौतम, संजय नार्वेकर, अशोक , मधुरा वेलणकर, श्वेता शिंदे या कलाकारांशी ओळख झाली. तो चित्रपट होता ‘ आई नं.१’. दुर्दैवाने चित्रपट पडला. नंतर सदाशिव अमररापूरकांचा – ‘आरं आरं आबा, आतातरी थांबा’ हा चित्रपट केला. त्याच दरम्यान निशिकांत कामतशी माझी ओळख झाली. त्यांच्याकडूनही खूप काही शिकता आले.

मग हे सगळं करीतअसताना ‘स्लमडॉग मिलेनिअर’चे काम कसे मिळाले?
माझा पार्ल्यातील मित्र निरंजन पत्की हा कॅमेरामन संतोष सिवन यांना सहाय्य करीत होता. त्याने माझी ओळख संतोष सिवनशी करून दिली. त्यावेळी ते ‘तहान’ नावाचा चित्रपट करीत होते. त्यांनी माझी सगळी माहिती ऐकल्यावर त्यांनी मला एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मुलखती चालू आहेत असे सांगितले. मी फोन केला तेव्हा एक वाजला होता. त्यांनी मला सांगितले तुमचे जे काही काम असेल ते घेऊन आम्हाला ४ वाजेपर्यंत भेटायला या. मी माझे सगळे काम घेऊन त्यांना भेटायला गेलो. तिथल्या इंडियन पॅनलने माझी मुलाखत घेतली आणि दुसर्‍या दिवशी १.३० वाजता भेटायला बोलावले. तिथे मी एका फिरंगी माणसाला भेटलो. ते चित्रपटाचे निर्माते ‘मि. कॉलसन’ होते. ७.३० ला आम्हाला आमची मुलाखत या चित्रपटांच्या दिग्दर्शकाशी होईल असे सांगण्यात आले. मुलाखतीत सांगण्यात आले की तुमची निवड झाली तर या चित्रपटाच्या लोकेशन्स शोधण्यासाठी तुम्हाला आमची मदत करावी लागेल. मी लगेचच हो म्हणून टाकले.

त्यावेळेस मानधनाचे वगैरे काही ठरले होते का?
नाही. तसे काहीच ठरले नव्हते. पण मी विचार केला की आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहे त्हणजे मानधनाची काही चिंता नसेल. त्यांनी माझी संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेतली असल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल खात्री वाटली असावी आणि म्हणूनच मला काम मिळाले. कालांतराने डॅनी बॉयल सरांशी भेट आणि चर्चा झाली. सुरूवातीला आम्हाला दुभाषकाची गरज भासे पण नंतर नंतर त्याची गरजही भासेनाशी झाली. मला सर्वप्रथम विकास स्वरूप यांचे Q&A हे पुस्तक वाचावयास देण्यात आले. माझ्या सर्व प्रश्नांची डॅनी बॉयल सरांनी अगदी योग्यप्रकारे उत्तरे दिली. नंतर काही दिवस मला चर्चगेट ते विरारपर्यत स्लम्स लोकेशन्सची माहिती मिळविण्याचे सांगण्यात आले. मी फोटो काढायचो, अपलोड करुन त्यांना पाठवायचो अशा प्रकारे काम सुरू झाले. जे लोकेशन्स सर्वांना आवडले उदा – नेहरू नगर, धारावी वगैरे ठिकाणांचा डॅनी बोयल सरांनी दौरा केला. शुटींगसाठी ठिकाणे नककी झाल्यावर त्या ठिकाणी शुटींग करावयास काही त्रास होईल का?, तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे, शासकीय परवानगी मिळेल का या सर्व बाबींची ते इत्यंभूत माहिती गोळा करत त्यांना कुठल्या प्रकारची दृश्ये याठिकाणी चित्रित करावयाची आहेत या बाबतीत ते संपूर्ण माहिती मला देत त्यामुळे मला लोकेशन्स शोधणे सोपे जात असे.

मग चित्रीकरणास कधी सुरूवात झाली?
मुंबईत होणार्‍या गणेश विसर्जनानंतर चित्रीकरणास प्रारंभ करायचा असे ठरले. पण दरम्यानच्या काळात मुंबईतील गणेशोत्सव बघून डॅनी बॉयल सरांना गणेशोत्सव चित्रित करायची इच्छा झाली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मला फोन आला की आज आपल्याला चित्रीकरण करावयाचे आहे. हे सर्वच माझी परीक्षा पाहणारं होतं. पण माझ्या ओळखीच्या जोरावर मी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर पुढचे साडेचार ते पाच तास आम्ही पार्ले जुहू चौपाटी पासून ते वांद्रेपर्यंत चित्रीकरण करीत फिरलो. या सगळया प्रकाराने मी भरपूर खूष झालो. माझी धार्मिक भावना त्याने ओळखी म्हणून असेल कदाचित…नंतर जुहूला तो ज्या हॉटेलमध्ये रहात होता तिथे जाऊन फ्रेश झालो. जुने कपडे तर घालायच्या लायकीचे राहिले नाहीत असा विचार करीत बाहेर आलो तर बाहेर नवा कोरा शर्ट डॅनीने माझ्यासाठी ठेवला होता. हे त्याने मला दिलेले मैत्रीतील गिफ्ट होते, यावरून डॅनी बॉयल काय प्रकारचा मनुष्य आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. त्या दिवसापासून डॅनी सरांचं आणि माझं अतिशय छान टयुनिंग जमलं आणि शुटींग दरम्यान ते वाढतच गेलं.

चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे काही प्रसंग सांगता येतील?
Rahul आम्ही ग्रँटरोड येथील दिल्ली दरबार हॉटेलच्या समोरील थिएटरमध्ये शुटींग करीत होतो. शुटींग दरम्यान महेश मांजरेकर दिसला आणि उगाचच मुन्नाभाई येणार आहे अशी अफवा सगळीकडे पसरली. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. शुटींगला त्रास होऊ लागला. डॅनीला मुन्नाभाई कोण असा प्रश्न पडला. नंतर मग मी त्याला संजय दत्त बद्दल सांगितले तेव्हा कुठे त्याला इतकी गर्दी का ते कळले. त्याच शुटींगच्या दरम्यान आमचे शुटींगचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. त्यांना दमटावल्यावर त्यांच्यातील एका माणसाने ब्लेडचे खूप तुकडे आमच्या कॅमेरामनच्या आणि माझ्या अंगावर फेकून मारले. त्यामुळे संपूर्ण युनिटमध्ये अस्वस्थता होती. परंतु पोलिसांच्या मदतीमुळे पुढचे शुटींग करणे सोपे गेले. पुढची गंमत सांगावीशी वाटते ती म्हणजे आयुष खेडेकरची. चित्रपटातील छोटा जमालची. चित्रपटातील एका प्रसंगात त्याला घाणीच्या एका टाकीत उडी मारायची होती. ती घाण दाखवण्यासाठी आइसक्रीम, बिस्कीट आणि कॅडबरीचा लगदा करण्यात आला होता. दिसायला ते अतिशय घाण दिसत असल्यामुळे आयुषने ‘मी त्यात उडी मारणार नाही’ असे ठणकावून सांगितले. शेवटी समजावून सांगितल्यावर त्याने सुप्रसिध्द उडी मारली.

आता चित्रपटातील सहकलाकारांविषयी सांगशील?
या चित्रपटात अनिल कपूर, इरफान खान, महेश मांजरेकर, देव पटेल, फ्रिडा या कलाकारांनी पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन आपापल्या भूमिका व्यवस्थित वठवल्या. कदाचित आपण एका विख्यात दिग्दर्शकाबरोबर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करतोय याची पूर्ण कल्पना होती त्यामुळे कुठेही स्टारडम त्यांच्या वागण्यात आला नाही. अनिलकपूरने तर ठरल्या दिवसांपेक्षा दोन दिवस जास्तीसुध्दा दिले. आता तुला एक प्रामाणिक प्रश्न विचारतो. या चित्रपटाला जेवढे पुरस्कार मिळाले तेवढा तो नक्कीच ग्रेट नव्हता असे एक सर्वसाधारण मत या चित्रपटाबद्दल मिडीयामध्ये आणि जनमानसात होतं. याबद्दल तुला काय वाटतं?

या चित्रपटात अभिनया व्यतिरिकत इतर तांत्रिक बाजू सांभाळणार्‍या तंत्रज्ञांना पुरस्कार मिळाले. या चित्रपटाला ‘बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले’ साठी सायमन डीफॉइलला सुध्दा पुरस्कार मिळाला. मला त्यामागची त्याची मेहनत माहिती आहे. ६ महिने ते चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी मुंबईत तळ ठोकून होते. मुंबईत येऊन स्लम्स मध्ये फिरून असे लिहिणे खूप कठिण आहे. मुळात हा चित्रपट इंग्रजी असल्यामुळे हॉलिवूडचा चित्रपट होता. त्यामुळे तुलना त्या पातळीवर झाली. आणि चित्रपटाच्या सर्व बाबी बघता हा चित्रपट इतर हॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत खचितच वेगळा ठरला. मुळातच त्याची कथा हाच चित्रपटाचा प्राण होता. आमच्या दुर्दैवामुळे (व्हिसा प्रॉब्लेम) आम्ही ५-६ जण ऑस्कर सोहळयाला जाऊ शकलो नाही पण नंतर डॅनी बॉयलने आम्हाला तिथे बोलावून आमचा उत्कृष्ट पाहुणचार केला. अजून विशेष सांगायचे म्हणजे स्लमडॉगच्या टिमने ५ लाख युरो डॉलर्स स्लममधील मुलांच्या विकास कार्यासाठी दिले आहेत. अझर आणि रुबिना या दोन कलाकारांचे भविष्य सुध्दा उज्वल करून ठेवले आहे.

मग राहुल आता पुढे काय?
मला स्वत:ला असं वाटतं की यशराज स्टुडिओचं जसे प्रस्थ आहे तसं मराठी चित्रपटांसाठी माझा स्टुडिओ हवा. त्याहीपुढे जाऊन हॉलिवूडच्या स्टिव्हन स्पिलबर्ग सारखं नाव व्हावं असे मला मनोमन वाटतं. पु.ल.देशपांडे, अरूण सरनाईक, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि या व्यक्ती मला खूप आवडतात. नवीन पिढीतील भरत जाधव मला खूप आवडतो. त्याच्याबरोबर काम केल्याने मी हे निश्चित सांगू शकतो की उत्कृष्ट नटाबरोबरच तो एक चांगला माणूस आहे. नवीन पिढीतील निशिकांत कामत एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे.

मुलाखत – मंदार माईणकर, मुंबई