स्कॉलर अभिनेत्री स्नेहा कुलकर्णी

sneha kulkarni झी मराठी वरील “महारास्टाचा सुपरस्टार” या कार्यक्रमात द्वितीय क्रमांक मिळविणारी नाशिकची उगवती नवतारका आणि विविध चित्रपट, मालिकांमध्ये सध्या आपल्या अभिनयाची झलक दाखविणारी नाशिकची गुणी अभिनेत्री स्नेहा कुलकर्णी हिच्याशी साधलेला सुसंवाद …

अभिनयाची आवड कशी निर्माण झाली?
घरात एखाद्याची नक्कल करता करता आवड निर्माण झाली. वयाच्या दुस-या वर्षापासून कथ्थकचे धडे सुरु केले. शाळेत असतांना वा. श्री. पुरोहित एकांकीका स्पर्धा तसेच अनेक स्पर्धांतून भाग घेत असे. घरी आई व पप्पांना अभिनयाची आवड होती. पप्पांनी पूर्वी नाटकात कामे केलेली असल्यामुळे अधिक प्रोत्साहन मिळाले.

प्रथम कोणत्या स्पर्धेत भाग घेतला?
वा.श्री. पुरोहित एकांकीका, जयेश क्लब, सानेगुरुजी एकांकीका अशा अनेक स्पर्धेत भाग घेतला. नक्की प्रथम कोणती स्पर्धा ते आता सांगता येत नाही.

शिक्षण किती झाले?
माझे बी.ई. कॉम्पुटर झाले. त्याच बरोबर हार्मोनियम, कथ्थक, वेस्टर्न डान्सही शिकलेले आहे .

कामाचा दिनक्रम कसा आहे?
सध्या माझा जास्त वेळ मुंबई मध्ये जातो. मी नाशकात वाढलेली त्यामुळे मुंबईतील धावपळीच्या जीवनाचा सराव होण्यास वेळ गेला. तेथे सेकंदावर माणसे चालतात. रात्री-अपरात्री, पहाटे ज्याप्रमाणे चित्रिकरण करायचे त्याप्रमाणे काम करावे लागते. मुंबईत कुणीही जवळचे नसतांना घरच्या माणसांची काही वेळेस खूप आठवण येते. सणवार येतात त्या वेळी घराकडे जाण्याची ओढ लागते. घरी गेल्यावर कितीही रात्र झाली तरी सर्व जागेच असतात, मग जेवणानंतर गप्पा चांगल्या रात्रभर रंगतात.

महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत सहभाग कसा घेतला?
महाराष्ट्रात एकूण सात ठिकाणी निवड प्रक्रीया चालू होत्या. त्यावेळी मी एम. टेकचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात होते. आईनेच मला त्याबद्दल सांगितले आणि मी भाग घेतला. या स्पर्धेत एकूण पाच हजार जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी फक्त चोवीस जणांची निवड झाली आणि नाशिकमधून तर मी एकटीच होते !

तुझा पहिला चित्रपट कोणता?
‘येडयांची जत्रा’ हा माझा पहिला चित्रपट आहे. यात भरत जाधव नायक आहे. त्या शिवाय मोहन जोशी, विनय आपटे, पंढरी कामळे, जयंत रावेरकर, आरती सोलंखी, विशाखा सुभेदार उत्तम कलाकार आहेत . चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे आहे.

भरत जाधव सोबत काम करण्याचा अनुभव कसा आला?
त्याच्या सारख्या अनुभवी कलावंता बरोबर काम करण्याचा खूप आनंद झाला. नवीन कलावंतांना त्याच्या सोबत काम करतांना दडपण येते, परंतू अतिशय चांगल्यारीतीने
नवीन कलाकारांना तो सांभाळून घेत असतो. मी सुद्धा ही फिल्म खूप सिरीयसली घेतली आहे.

तुझी भूमिका कशी आहे?
यात मी मोहन जोशींची मुलगी आहे. तिला शिक्षणात रस नाही, आठ वेळा दहावी नापास झालेली असून खूप बडबडी आणि चित्रपटवेडी आहे. दोन मोठ्या वेण्या, कानात झूमके आणि गावरान बोलीभाषा आणि सतत गाणे म्हणणारी असा भूमिकेचा गेटअप आहे.

तूझी पुढील वाटचाल कशी आहे?
माझा पुढील चित्रपट आहे `कुणी मुलगी देता का मुलगी` मात्र ह्यात मुख्य भूमिका नाही. आतापर्यंत एक तास भुताचा (मी मराठी), लेक लाडकी या घरची (इ टीव्ही ), गाणे तुमचे आमचे (इ टीव्ही ) मोर्निग शो असे कार्यक्रम आहेत.

एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी ते एक सिनेअभिनेत्री कसे वाटते?
नाशकात वाढले. घरात आम्ही एकूण पाच जण आहोत. पूर्वी मी कुठे ही गेले तर फक्त स्नेहा होते पण आज अभिनेत्री म्हणून ओळख आहे. आईवडिलांना माझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे!

आज या क्षेत्रात येऊ पाहणा-या तरुणांना काय संदेश देशील?
तरुणांना सांगेन की पहिले आपले शिक्षण पूर्ण करा, त्याच बरोबर कलेचीही साधना चालू ठेवा. या क्षेत्रात प्रसिध्दी, पैसा आहे मात्र प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवा.

मुलाखत – अशोक चांदुडे