सनईच्या सुरांनी नादावलेला

shehnai ३७ वर्ष शैलेश भागवत फक्त सनईच्या सूरात हरवले आहेत. सनई, तिचे सूर, तिचा ताल, तिची लय, गुरूंचा वारसा, आणि प्रचंड मेहनत. ह्याचा परिणाम म्हणजे दस्तुरखुद्द उस्तादांच्या वाणीतून मिळालेला आर्शिवाद, “दुसरा बिस्मिल्ला खॉ है यह तो !”

भागवतांची राहणी अत्यंत साधी , सगळया संकल्पना स्पष्ट आणि प्रामाणिक. सनईचे सुरुवातीचे शिक्षण पं. औरंगाबादकर आणि पं. मारूती पाटील यांच्याकडे घेतले. उस्ताद बिस्मिल्ला खॉ साहेबांकडे साधना सूरू करणे ही सुध्दा एक साधनाच ठरली. “मला तुमच्याकडे शिकायचंय”, हे सांगण्या इतकं ते सोपं नव्हतं. खॉसाहेबांबरोबर सतत राहणं, अनेक वेळा फे-या मारणं… अखेर ही साधना फळास आली. खॉसाहेबांनी आपल्या जवळची विद्या, कला या एकमेव शिष्याकडे सूपूर्द केली. खॉसाहेबांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं.

शैलेश भागवतांच्या प्रत्येक बोलण्यातून आपल्या गुरू विषयीची कृतज्ञता, प्रेम ओथंबत होते. जे करायचं ते सर्वोत्कृष्टच या ध्यासाने पुढे जात राहिलेल्या पथिकाला गुरूही तसाच तोलामोलाचा भेटावा लागतो. तसा तो भेटला आणि आत्म्यातली कला जणू फुंकर घालून फुलवली. मग मात्र या शिष्याने मागे वळून पाहिलेच नाही.

saileshb “या कलेत माझं स्वत:चं असं काहीच नाही. मी माझ्या गुरूकडून सगळं मिळवलंय आणि ते टिकवून ठेवण्याची धडपड आहे” गुरूचा विश्वास सार्थ ठरवणा-या शैलेश भागवतांच्या तोंडी ही नम्र भावना असणं साहजिकच. शैलेश भागवतांच्या मते, सनई हे असे वाद्य आहे, जे पंचेद्रियात प्राण फुंकूंन वाजवावे लागते. तुमचा घसा, नाक, गळा आणि तब्येत सगळ काही व्यवस्थित असावं लागतं.

त्याशिवाय तुम्ही या वाद्याला न्याय नाही देऊ शकत. हे वाद्य मोठयाने वाजवायचं आहे, तसंच ते अगदी खालच्या पट्टीतही वाजवता येतं. सनईचा आस्वाद घेणारा एक श्रोत्यांचा असा क्लास आहे. तसेच रस्त्यावरून जाणा-या वरातीचाही मान तिचाच आहे.

बोलता बोलता सहज उस्तादांबरोबरचे काही आठवणीतले क्षण त्यांनी व्हिसीडीच्या माध्यमातून जपलेले आहेत ते दाखवले. आजही ते क्षण ते कितीतरी वेळा तन्मयतेने पाहतात. गुरूचा आशिर्वाद सतत आपल्या बरोबर आहे हे समाधान त्यातून मिळत.

शैलेश भागवतांनी गाजवलेले काही प्रथितयश कार्यक्रम/ कॉन्सर्टस :
सवाई गंधर्व महोत्सव, पुणे
७७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, औरंगाबाद
विदेश यात्रा, दुबई
एम.टी.डी.सी- पुणे फेस्टीवल
के.टी.डी.सी. तर्फे आयोजित हंपी उत्सव,कदंब उत्सव

saileshb शैलेश भागवतांना मिळालेले काही सन्मान :
भारत सरकारकडून २००० मध्ये २ वर्षासाठी सिनियर फेलोशिप इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स कडून विदेशातील कार्यक्रमांसाठी देशाचा अधिकृत प्रतिनिधी

शैलेश भागवतांच्या मते आताचे होणारे टिव्हीवरचे रिऍलिटी शो बाबत वाद असले तरी एरवी प्रकाशात न येऊ शकणा-या कलाकारांना एक चांगल व्यासपीठ मिळालंय. तुम्ही काहीतरी करताय हे समजण्यासाठी तुम्हाला सतत ‘फ्लॅश’ मध्ये रहाणं गरजेचं आहे आणि हे शो ते काम चांगलच करत आहेत. नंतर टिकवून ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे, सगळयांनाच ते जमतं असं नाही.

त्यांच्या पत्नीचा यशातील वाटाही फार मोठा आहे. उस्तादसाहेबांचं आपल्या शिष्याइतकंच आपल्या या शिष्यपत्नीवरही प्रेम होतं. आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी कायम त्यांना मानलं. सौ. भागवत बी.एम.सी. मध्ये नोकरी करतात. शैलेश भागवतांच्या सगळया कार्यक्रमांच्या इतर आर्थिक बाजू, व्यवहार त्या तितक्याच जबाबदारीने पार पाडतात. आपल्या गुरूने दिलेला वारसा समर्थ हातांनी पुढे चालवण्यात आणि समाधानात हे कुटुंब अक्षरश: रंगून गेलंय.

– शरद कारखानीस