तुम्हाला सारखी भूक लागलेली असते. ती सुध्दा तुमच्या आवडीच्या पदार्थांची. पण पदार्थाची. पण आई मात्र तुमच्या मनासारखे काही करू देत नाही. खरे आहे ना? मग आपण एक गंमत करू या. तुम्हीच स्वयंपाक घरात शिरून फारशी धडपड न करता काही पदार्थ स्वत:चे स्वत: बनवू शकालात तर? काय म्हटलात, जमणार नाही? छे छे अगदी सोपे पदार्थ तुम्हाला बनविता येतील त्यासाठी ते कसे बनवायचे याची साधी सोपी रीत पुढे दिलेली आहे.
यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची गॅस, मिक्सर काही वापरायचे नाही.सुरी, हात न कापता वापरता येत असेल तर ती वापरायची. थोडीशी पूर्वतयारी आई, ताई किंवा स्वयंपाकाच्या काकूंकडून करून घ्यायची. आणि बाकीचे आपण आपले करून घ्यायचे. मित्र मैत्रिणींना खाऊ घालायचे किंवा कधी मधी आई-बाबा दमले असले तर त्यांनाही हे पदार्थ तयार करून देऊन आश्चर्यचकित करायचे. ठरलं तर? चला मग. आपण स्वयंपाक घराकडे आपला मोर्चा वळवू या काहीतरी नवीन करण्यासाठी – आणि आवडीचे पदार्थ खाण्यासाठी !
साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे.
कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ करावे म्हणजे त्याचा रस काढणे सोप जाते. मग सुरीने त्याचे दोन तुकडे करून एका स्टीलच्या पातेलीत फोडींचा रस पिळावा. त्यातील बिया काढून टाकाव्यात, त्यात साखर, मीठ व जिरेपूड घालून आधी थोडेसे पाणी घालून ते ढवळावे साखर विरघळेपर्यंत हलवावे, ग्लासात ओतावे आणि वर बर्फाचे खडे टाकून हे सरबत द्यावे.
साहित्य : दोन मोठया उकडलेल्या कैर्या, अर्धा ते एक चमचा मीठ, एक मोठी वाटी चिरलेला गुळ, पाव चमचा वेलदोडयाची पुड, थंडगार पाणी ५ ग्लास, ७-८ बर्फाचे तुकडे.
कृती : कैर्यांची साले काढून त्या एका स्टीलच्या पातेलीत घाला. हाताने कुस्करून त्याचा सर्व गर काढून घ्या व आतील कोया काढून टाका. त्यात मीठ व चिरलेला गूळ घालून हाताने सर्व नीट मिसळून व कुस्करून घ्या. शक्यतो कैरीच्या गराचे तुकडे न रहाता सर्व नीट मिसळून आले पाहिजे. आता हात धुवून त्यात प्रथम दोन ग्लास पाणी घालून डावाने छान ढवळून घ्या. सगळा गुभ् पाण्यात नीट विरघळला पाहिजे. गूळ विरघळला की त्यात उरलेले दोन ग्लास पाणी घाला. पुन्हा सगळे नीट ढवळा, छोटया चमच्याने चव घेऊन पहा. मीठ हवे असल्यास थोडेसे मीठ घाला. आता एक मोठी गाळणी घेऊन पन्हे दुसर्या पातेलीत हळूहळू गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पन्ह्यात वेलदोडयाची पूड घाला. पन्हे ग्लासात ओतून त्यावर बर्फाचे एक-दोन तुकडे टाकून प्यायला द्या.
साहित्य : दोन मोठया हिरव्यागार करकरीत कैर्या, लोणच्याचा तयार मसाला ४ चमचे गच्च भरून, १ चहाचा चमचा भरून मीठ, तीन चमचे भरून तेलाची फोडणी.
कृती : कैर्या नळाच्या पाण्याने धुवून पुसून घ्याव्यात. तुम्हाला सुरी नीट वापरता येत असेल तर सुरीने त्याच्या अर्धा इंच x अर्धा इंच अशा फोडी करून घ्या नाहीतर आई किंवा ताई कडून त्या करून घ्या. त्यात मसाला घालून फोडींना नीट चोळा, चव घेऊन पहा. कैरी फार आंबट असेल तर थोडेसे मीठ लागेल, चव पाहून थोडे थोडे मीठ लागल्यास त्यात घाला की झाले तात्पुरते लोणचे तयार. आईकडून फोडणी करून घेऊन ती जर या लोणच्यात घातलीत तर ते फारच चांगले दिसेल आणि चविष्ट होईल.
टीप – हे लोणचे वर्षभर टिकविण्यासाठी नाही. लगेच फस्त करायचे आहे.
साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ
कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते हाताने छान कुस्करा, सुरी वापरता येत असेल तर मिरचीचे बारीक तुकडे करा नाहीतर आई किंवा ताईकडून ते करून घ्या. कुस्करलेल्या बटाटयात साखर, जिरेपूड, मिरच्यांचे तुकडे व अर्धा चमचा मीठ घालून सर्व नीट कालवून घ्या. आता त्यात दही घालून डावाने सर्व नीट ढवळून घ्या, चव घेऊन पहा. मिठाची जरूरी आहे का? असल्यास थोडे घालून, चव घेऊन पहा, झाली कोशिंबीर तयार. कोथिंबीर असेल तर तीही थोडी निवडून, धुवून, चिरून वर पेरलीत तर कोशिंबीर छान दिसेल.
टीप : ही कोशिंबीर २ मोठया माणसांना पुरेशी होईल.
साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर
कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत हलवावी. एका बशीत केळी सोलून ती हाताने खूप कुस्करावीत. कुस्करलेली केळी नंतर साखर घातलेल्या दूधात घालून नीट मिसळावीत व सर्वात शेवटी त्यात वेलदोडयाची पूड घालवून हलवावे. झाले शिकरण तयार.
टीप – हे शिकरण लगेच संपवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर काळे पडते. याबरोबर ३-४ पोळया सहज खाता येतात.