मराठी कोश वाड्मय

मराठी अक्षर वाङ्मयाचा विचार करू लागल्यावर मराठी कोश-साहित्याचा विचार करणे अत्यंत अगत्याचे आहे. कोणत्याही भाषेतील कोश साहित्य हे समाजाचे विचार आणि संस्कृती यांचे संचित धन मानले जाते. ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशांची निर्मिती होते ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. जिज्ञासू अभ्यासकांना , संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणा-यांना जरूर ते संदर्भ अल्प वेळात आणि अल्प प्रयासाने शोधण्याचे विश्वासार्ह साधन म्हणजे कोश होत.

कोश निर्मितीचा अल्पसा इतिहास

अठराव्या शतकानंतर इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत ज्ञानकोश संपादन करण्याची नवी परंपरा सुरू झाली. त्या शतकात सामाजिक क्रांतीच्या विचाराने प्रेरित होऊन फ्रेंच भाषेत दिदरो आणि त्याचे सहकारी यांनी पहिला ज्ञानकोश संपादन केला व त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या महान घटनेला वैचारिक प्रेरणा दिली. हा कोश इ. स. १७५१ ते १७७६ या काळात तयार झाला. त्याचे ३५ खंड होते. त्या काळातील मानवी ज्ञानाचे व्यापक संकलन त्या कोशात होते. त्याची विचाराची बैठक बुध्दीप्रामाण्य वादावर आधारित होती.

याच सुमारास (१७६८ ते १७७१) इंग्लंडमध्येही ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाची’ पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर या महान ज्ञानकोशाच्या अनेक आवृत्त्या प्रसिध्द झाल्या. अलीकडे (१९७५ मध्ये) ‘द न्यू एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’ प्रसिध्द झाला. ही या कोशाची पंधरावी आवृत्ती आहे.

यापासून स्फूर्ति घेऊन मराठीत आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे संदर्भ देणारे असे नवीन ज्ञानकोश तयार व्हायला हवेत अशी महत्त्वाकांक्षा डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना निर्माण झाली. वि. का. राजवाडे, य.रा.दाते, चिं.ग. कर्वे, म.म. सिध्देश्वरशास्त्री चित्राव अशा थोर मंडळींच्या संपादकीय सहाय्याने केतकरांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा मराठीतील पहिला ज्ञानकोश १९२० ते १९२७ या सात वर्षांत, एकूण २३ भागात प्रसिध्द केला.

त्या नंतर भारतीय संस्कृतीच्या ध्यासाने पं. महादेवशास्त्री जोशी यांनी ‘भारतीय संस्कृतीकोश’ दहा खंडात प्रसिध्द केला. त्याचा आरंभ १९६२ साली झाला होता. भारताच्या सांस्कृतिक जीवनाचे विस्तृत संदर्भ यात दिलेले आहेत. १९७४ साली तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दे.द. वाडेकर यांनी ‘मराठी तत्त्वज्ञान महाकोश’ तीन खंडात प्रकाशित केला. महामहोपाध्याय सिध्देश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘भारतीय चरित्रकोशा’चे तीन खंड प्रकाशित केले. प्राचीन चरित्रकोश (१९३२), मध्ययुगीन चरीत्रकोश (१९३७) व अर्वाचीन चरित्रकोश (१९४६) याक्रमाने ते प्रसिध्द झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करून त्या मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे १९६२ साली मराठी ‘विश्वकोश’ संपादन करण्याचे कार्य सोपविले. त्याचा पहिला खंड १९७६ साली प्रसिध्द झाला आणि १९९५ पर्यंत त्याचे पंधरा खंड प्रसिध्द झाले. सामाजिक शास्त्रांचा कोश ‘भारतीय समाजविज्ञान कोश’ या नावाने श्री स.मा. गर्गे यांनी संपादन केला. त्याचा पहिला खंड १९८६ साली तर सहावा खंड १९९३ साली प्रकाशित झाला.

यानंतर कोश वाङ्मयाच्या निर्मितीची प्रक्रिया महाराष्ट्रात चांगली रुजली. विविध विषयांवरील मराठी कोश तयार होऊ लागले. उदा. अमरेंद्र गाडगीळ यांचे रामकोश, गणेशकोश, देवीकोश, डॉ. प्र.न. जोशी यांचे शास्त्रज्ञांचा चरित्रकोश, आदर्श मराठी शब्दकोश, राज्य व्यवहार कोश, नृसिंहकोश तसेच इतरांनी तयार केलेले सुवचनांचे कोश, सुभाषितांचे कोश, उर्दू-मराठी कोश, स्थलकोश, उर्दू-मराठी शब्दकोश, कन्नड- मराठी शब्दकोश….विविध विषयांवरील ज्ञानाचे भांडार मराठीतून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कोशांसारखा महान् गुरू मिळणार नाही. शासकीय मदतीची अपेक्षा न धरता स्वयंप्रेरणेने अनेक प्रकाशकांनी त्यात मोलाची कामगिरी केली आहे व आजही करीत आहेत.

मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासकाला तसेच सर्वसामान्य मराठी माणसालाही मराठीतील इतक्या प्रकारच्या कोशांची एकत्रित माहिती कुठेही मिळणे अवघड असते. मुळात अशा प्रकारचे कोश अस्तित्वात आहेत याचीसुध्दा कल्पना सर्वसामान्य वाचकाला नसते. परंतु हे महत्त्वाचे वाङ्मय सर्वांना परिचित व्हावे असा विचार करून विविध कोशांची माहिती संकलित करून ती पुढे दिली आहे. कोशाचे नाव, संपादक व प्रकाशकाचे नाव, कोश कशाविषयी आहे, त्याची किंमत, ते कुठे मिळू शकतील अशा (शक्यतो सर्व) मुद्दयांवर आधारित अशी ही माहिती दिलेली आहे. यांपैकी काही कोश दुर्मिळ असून आपापल्या परिसरातील ग्रंथालयात ते संदर्भासाठी मिळू शकतात.

कोशांविषयी माहिती लिहिताना कोश कसा पहायचा हे लिहिणे आवश्यक वाटते. आपल्याला इंग्रजी वर्णमाला माहीत असल्यामुळे ॠ ते झ्र या क्रमाने आपण शब्द पाहू शकतो. बहुतेक मराठी कोश हे मराठी स्वरमाला व मराठी व्यंजनमाला यानुसार बनविलेले असतात. मराठी स्वरमाला व व्यंजनमाला खालीलप्रमाणे आहेत.

मराठी स्वरमाला – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं , अ: अशी आहे.

अं आणि अ: हे आपण जरी लिहीत असलो तरी ते प्रत्यक्षात तसे नसून फक्त (ह्वं) आणि (ह्वः) अनुस्वार आणि विसर्ग असे आहेत.

मराठी व्यंजनमाला

क,ख,ग,घ,ङ
च,छ,ज,झ,ञ
ट,ठ,ड,ढ,ण
त,थ,द,ध,न
प,फ,ब,भ,म
य,र,ल,व,श
ष,स,ह,ळ,क्ष,ज्ञ अशी आहे.

ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या अद्याक्षरांनी मिळून केलेला ‘कचटतप’ हा क्रम लक्षात ठेवावा व शेवटी ‘यरलवशषसहळक्षज्ञ’ असते हे ध्यानात ठेवावे. म्हणजे कोणताही संदर्भ पाहताना काम सोपे होई.