साहित्यिक लेख

 

राष्ट्रभाषा शिकूया ऑनलाईन !

हिंदी भारताची राष्ट्रभाषा असली तरी ती प्रत्येक प्रांतात आणि व्यक्तीगणिक बदलतांना दिसते. बहुतेक वेळा प्रत्येकजण हिंदी मध्ये आपल्या मातृभाषेची सरमिसळ करत बोलत असतो. त्यामुळे उर्दू मिश्रीत हिंदी तसेच पंजाबी, मराठी, बंगाली, दाक्षिणात्य भाषा मिश्रीत हिंदी असे हिंदी भाषेचे अनेक ‘व्हर्जन्स’ आपल्याला ऐकायला मिळतात. आदरयुक्त हिंदीची नजाकत वेगळी तर बम्बैया हिंदी चित्रपट आणि गाण्यांमुळे सर्वांच्या अधिक परिचयाची. हिंदी भाषेचा चांगला परिचय असणारा देशवासी ओळखायचा तर त्याच्या बोलण्यात ‘तुम’च्या ऐवजी ‘आप’, ‘पानी’च्या ऐवजी ‘जल’, ‘हॉंजी’, ‘धन्यवाद’ असे अनेक शब्द सातत्याने येत असतात. त्याच्या बोलण्यात गोडवा आणि आदर डोकावत असतो.

मराठीजनांबद्दल बोलायचे तर बहुतेक जणांचा असा समज असतो की मराठी आणि हिंदी दोन्ही देवनागरी लिपी असल्यामुळे मराठी आले की हिंदी येणारच. तो काही अंशी खराही आहे कारण काही अक्षरे वगळता दोन्ही लिपी एक असल्यामुळे वाचायला अडचण येत नाही. कानावर पडल्याने बोलायलाही अडचण येत नाही. परंतु हिंदीचा थोडा खोलात अभ्यास केल्यावर लक्षात येते की ही भाषा अत्यंत मधुर आणि संपन्न आहे.

हिंदी ही भारताच्या उत्तरेकडील प्रमुख भाषा आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार भारताच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडच्या प्रांतातून जसे पंजाब, सिंध, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा ह्या राज्यांना ‘हिंदी बेल्ट’ संबोधले गेले आहे. ह्या प्रदेशांमधून हिंदी भाषेबरोबरच प्रत्येक प्रदेशाच्या मातृभाषेची आणि बोलीभाषेची सरमिसळ झालेली दिसते. खरीबोली (उर्दू+हिंदी), हरियानवी, अवधी, राजस्थानी, रांगणी, मैथिली, भोजपूरी, गढवाली, पहारी अश्या अनेक भाषांमधून हिंदीची सरमिसळ झालेली आढळते. परंतु आजच्या घडीला हिंदी संपूर्ण भारतात सर्रास बोलली जाते. त्याच बरोबर परदेशात फिजी, गुयाना, मॉरिशियस, सुरीनाम, त्रिनीदाद, टोबागो ह्या देशांमधूनही हिंदी बोलली जाते. स्थलांतरामुळे अमेरिका, युरोप, इंग्लंड येथेही हिंदी भाषिक पोहोचले आहेत.

‘हिंदी’ हा मूळ पर्शियन शब्द आहे ज्याचा अर्थ ‘हिंद’ किंवा ‘भारतीय’ असा होतो. १७व्या शतकाचा इतिहास सांगतो की हिंदी दोन प्रकारे त्यावेळेला अस्तित्वात होती. एक म्हणजे मुसलमान लोक पर्शियन मिश्रीत हिंदी लिहायचे, बोलायचे तर हिंदू लोक संस्कृत मिश्रीत बोलायचे आणि देवनागरीत लिहायचे. काळानुसार ह्या दोन्ही प्रकारच्या भाषा आधुनिक उर्दू आणि आधुनिक हिंदी म्हणून उदयास आल्या. ह्या विषयीची रंजक माहिती आपल्याला http://en.wikipedia.org/wiki/Hindi, http://en.wikipedia.org/wiki/Hindi_dialects  येथे वाचाता येते.

आजकाल इंटरनॅशनल शाळांच्या सीबीएससी, आयसीएससी बोर्डाचे हिंदी जास्त सखोल असते. हिंदी व्याकरण आणि साहित्याचा अभ्यास मुलांना करावा लागत आहे. त्यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी इंटरनेटवर ह्या विषयी अनेक मार्गदर्शक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. www.hindilearner.com ही साईट नवशिक्यांना सांगते की देवनागरी लिपीत लिहील्या जाणा-या हिंदी भाषेत ५२ प्रकारचे ध्वनी आहेत. त्यामध्ये १० स्वर आणि ४० व्यंजन आहेत. हिंदी शिकायची सुरुवात करायची असल्यास हिंदी आधी कानावर पडली पाहिजे. त्यासाठी हिंदी चित्रपट, गाणी, टेलिव्हिजन, रेडियो अत्यंत उपयुक्त माध्यमे आहेत. त्यानुसार ऐकून बोलण्याची सवय करता येते. त्यानंतर वाचन आणि लिखाण ह्या पाय-या ओलांडता येतात.

हिंदी बोलण्यासाठी मुखाच्या सहा अवयवांचा वापर करावा लागतो. कंठ (अ, आ, क, ख, ग, घ, ङ), टाळू (इ, ई, च, छ, ज, झ, ञ), दंत (त, थ, द, ध, न), ओठ (उ, ऊ, प, फ, ब, भ, म), नाक (अं, ङ, ञ, ण, न, म), अग्रटाळू (ए, ऐ).

कुठलीही भाषा व्याकरणांशिवाय शुध्द बोलता, लिहीता येत नाही. व्याकरण शिकण्यासाठी www.hindilearner.com/hindi_basics/hindi_grammar.html ही लिंक अत्यंत उपयुक्त आहे. ह्याच साईटवर हिंदीसाठी छोटे स्वाध्याय दिलेले आहेत. त्यावरुन आपल्याला हिंदी शिकण्याची सुरुवात करता येते.

हिंदी शिकण्यासाठी आधी शब्द, रंग, आकार, प्राणी, पक्षी, फळे, फुले इत्यादींची ओळख होणे महत्त्वाचे आहे. त्याची सुरुवात करायची असल्यास www.hindikibindi.com ही साईट अगदी योग्य आहे. ह्या साईटवर तीन ते पाच वयासाठी ‘नन्हे-मुन्हे’, पाच ते सात वयासाठी ‘नटखट’ आणि आठ वर्षावरील मुलांसाठी ‘युवा’ असे वेगवेगळे विभाग आहेत. त्यानुसार हिंदी शिकण्यासाठी वेगवेगळे स्वाध्याय दिलेले आहे. त्याचबरोबर ‘दादी मॉं की कहानीयॉं’ ह्या विभागात गोष्टींचे रंगीत हिंदी व्हिडीओ दिलेले आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला रंजक गोष्टीतूनही हिंदी शिकता येते.

तुम्ही मराठी, गुजराती, काश्मिरी, मणीपुरी, नेपाळी असलात तरी तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून हिंदी शिकण्याची संधी ह्या भारत सरकारच्या राजभाषा विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हिंदी शिकणा-यांसाठी प्रबोध, प्रवीण आणि प्रज्ञा ह्या परीक्षांची माहिती ह्या साईटवर वाचता येते.

अनेक साईटसवर हिंदी शिकण्यासाठी ‘टयूटोरियल’ सीडीज ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी http://www.hindilanguage.org ह्या साईटसला भेट द्यायला हवी.

आपल्यावर अस्खलित हिंदी बोलायची वेळ आल्यास अनेकदा योग्य शब्दांची अडचण आपल्याला जाणवते. कधीतरी मातृभाषेतले पर्यायी शब्द वापरले जातात परंतु मग हिंदीचा ‘लहेजा’ मात्र पार बिघडून जातो. त्यासाठी अनेक साईटसवर ‘ऑनलाईन डिक्शनरीज’ उपलब्ध आहेत. ह्या बहुतेक डिक्शनरीज इंग्रजी ते हिंदी रुपांतर करणा-या आहेत. आपल्याला हव्या असलेल्या हिंदी शब्दासाठी पर्यायी इंग्रजी शब्द टाकायचा आणि ‘सर्च’ करायचे. ह्यामुळे अनेक हिंदी शब्द आपल्या परिचयाचे होतात. ‘ऑनलाईन डिक्शनरीज’ साठी www.shabdkosh.com, www.infobankofindia.com/newdic/englishtohindi, http://dict.hinkhoj.com, www.khandbahale.com, ह्या साईटस उपयुक्त आहेत.

भारतीय साहित्यात हिंदी भाषेचा अमूल्य ठेवा आहे. हिंदी साहित्य मुख्यता भक्तीरस, शृंगाररस, वीरगाथा आणि आधुनिक शैलीत उपलब्ध आहेत. भक्तीसाहित्यात मीराबाई, कबीर, तुलसीदास, सुरदास, नानक इत्यादींची नावे सर्वांना सुपरिचीत आहेतच. संत कबीराचे दोहे हिंदी आणि इंग्रजीत वाचायचे असल्यास www.boloji.com/kabir/dohas ह्या लिंकला भेट द्यायला हवी. अलिकडच्या काळातले कथा-कादंबरीकार मुनशी प्रेमचंद ह्यांचे हिंदी साहित्यातले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कथा ह्या सामान्यांच्या आयुष्याशी निगडीत असत. त्यांचे साहित्य वाचण्याचा आनंद घ्यायचा असल्यास www.munsipremchand.iitk.ac.in ह्या त्यांच्या वेबसाईटला भेट द्यायलाच हवी.
डॉ. हरिवंश राय हे आधुनिक हिंदी साहित्यातले कवी. त्यांचा मधुशाला हा काव्यग्रंथ संपूर्णपणे आपल्याला http://www.anubhuti-hindi.org/gauravgranth/madhushala/madhushala1.htm ह्या लिंकवर वाचायला मिळतो.

हल्ली इंग्रजी प्रमाणे अनेक भारतीय भाषांमधून वेबसाईट्स उपलब्ध आहेत. हिंदीही त्याला अपवाद नाही. बातम्या आणि घडमोडी हिंदीत देणा-या अनेक वेबसाईट्स आहेत. त्याच बरोबरीने कथा, कविता, पाककृती, वैचारिक लेख, महिलांसाठी खास विभाग, आरोग्य अश्या अनेक विषयांवर माहिती देणारी पोर्टल्स अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनिय आहेत. त्यासाठी http://www.hindinest.com, http://www.webduniya.com, www.prabhasakshi.com, http://in.jagran.yahoo.com ह्या ‘पोर्टल्स’ ना जरुर भेट द्या.

आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त इतर कुठल्याही भाषेचा अभ्यास केल्यास आपल्याला वेगळ्या संस्कृतीची ओळख होते, दृष्टी अधिक व्यापक होते ह्यात शंकाच नाही. हिंदी आपल्याला अधिक जवळची असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे अधिक सोपे आणि आनंददायी आहे. म्हणून एका वेबसाईटवर लिहीले आहे –

” निखरी गयी है सुभग गंगा जल सी,
हैं हिंदी के हम सब, हमारी है हिंदी,
कश्मिर से कन्याकुमारी की हिंदी,
है भारत के माथे की अच्छी सी बिंदी “

– भाग्यश्री केंगे