ईशान्य संगीतातली ‘रागिणी’

आपल्या देशात प्रत्येक राज्याचे एक असे वैशिष्टय दिसते. वेशभूषा, लोकगीते, लोकनृत्य, सण, परंपरा अनेक ठिकाणी हे वैविध्य दिसून येते. अर्थात लोकसंगीताचा गोडवा अवीट असतो कारण मुख्यत्वे ते मातीतून झालेले असते. अशाच प्रकारचे एक संगीत म्हणजे ईशान्य संगीत. बिहू हे आनंद व्यक्त करण्यासाठी सादर होणारे लोकगीत आहे. ढोल घेऊन गावाबद्दल, खाण्यापिण्याबद्दल आनंदोत्सवाचे वर्णन या गाण्यात असते. ‘भटियाली’ हा लोकसंगीताचा आणखी एक खूप लोकप्रिय प्रकार आहे. कधी एकतारा घेऊन रस्त्यात, मंदिरातही भटियाली सादर करतात. बंगाल, आसाममध्ये भटियाली लोकप्रिय आहे.

आसाममध्ये गुहाटीजवळच्या नागाव इथे राहणा-या रागिणी चक्रवर्ती अगदी लहान वयापासून बिहू भटियालीसारखे गाणे गात होत्या. त्यांचे पहिले गुरू, त्यांचे वडील पंडित विवेकानंद भट्टाचार्य हे आसामचे प्रसिध्द तबलावादक. घरी सतत मोठया कलाकारांचा राबता असायचा. परविन सुलतानासारख्या कलाकाराचा सहवासही नेहमीच मिळायचा. लहानपणापासून लोकगीत आपोआपच गुणगुणली जायची, पण खरी आवड शास्त्रीय संगीताचीच होती. त्यामुळे आसामचे हिंदुस्थानी गायक बी.के.फुकन यांच्याकडे त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. गोहाटी रेडिओ, गोहाटी दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमही केले.

ही गीत गातानाच रागिणी आसामीही खूप छान गातात. ईशान्य हा शब्दही त्यांना आधी माहित नव्हता. लग्न झाल्यावर त्या मुंबईत आल्या आणि प्रभा अत्रे याचे शिष्यत्व स्वीकारले. किराणा घराण्याचे गाणे त्या करतात. आसामी भीमपलासीमध्ये जास्त गातात असे त्यांना वाटते. मध्यंतरी कर्नाटक संघात त्यांनी शास्त्रीय संगीत ते ईशान्य संगीत सादरकेले. जाणकारांकडून वाहवा मिळवली.

‘रवींद्र संगीत’ ही तर रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली गीत- संगीताला दिलेली महान देणगी आहे. रवींद्रनाथ जिथे जिथे जातील तिथल्या वातावरणाशी समसरून जात व गाणी लिहीत. अशा प्रकारची जवळ जवळ २५०० गीते लिहिली व त्याला संगीतही त्यांनीच दिले. त्यांची नोटेशन्सही त्यांनी काढली. शास्त्रीय संगीतावर आधारित ही गाणी बंगाली भाषेसारखीच गोड, मधूर आहेत. इथे भावात सूर धावतात. कविता सुरांचे वळण घेते. ‘रवींद्र संगीत’ ही रागिणी सादर करतात. त्यांच्या मते भाषेच्या अडचणीमुळे रवींद्र संगीत इथे तितकेसे लोकप्रिय नाही. ज्याला इच्छा असेल त्यांनाही गाणी शिकविण्याचीही रागिणीची इच्छा आहे.

रवींद्र संगीत म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय, पाश्चिमात्य संगीत व प्रादेशीक संगीताचे ‘संगीत तीर्थ’ आहे असे रवींद्र संगीतप्रेमी मानतात. पण रागिणीचे खरे प्रेम शास्त्रीय संगीतावरच आहे. कारण तेच तर सर्व संगीताचा पाया आहे.

– शिबानी जोशी, नाशिक

संगीत अपर्णा

Aparnagurav संगीत अपर्णा शास्त्रीय संगीतामध्ये वेगळा ठसा उमटवणा-या एक हरहुन्नरी कलाकार, आपल्या जादुई आवाजाने रसिकांची मने जिंकून आपल्या गुरुचा विश्वास सार्थ ठरवण्यात यशस्वी झालेल्या शास्त्रीय गायिका अपर्णा गुरव. अपर्णा गुरव यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून पुढची १५ वर्षे डॉ. सुधा पटवर्धनांकडे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यांच्यामधील क्षमतेची जाण डॉ. पटवर्धनांना झाली आणि त्यानी या मुलीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या जगताची ओळख आणि अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत अपर्णाने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही सन्माननीय पदवी संपादन केली. यानंतर अपर्णा गुरव यांनी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडून परिपूर्ण संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. स्वतःचे कौशल्य रसिकांसमोर पेश करण्याची संधी त्यांना डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या बरोबर असताना मिळाली. त्यांनी अनेक मोठया कार्यक्रमांतून वीणाताईंना साथ दिली आहे. ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर यांनीही अपर्णा गुरव यांना संगीताचे धडे दिले आहेत. अपर्णा गुरव यांना मिळालेली पारितोषिके –

 • भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती.
 • एन. सी. पी. ए. मुंबई कडून सन्मानाची सुरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती.
 • पुण्याच्या नामांकित “गानवर्धन” कडून ताम्हणकर स्मृती शिष्यवृत्ती.

अपर्णा गुरव यांचा सहभाग असलेल्या अविस्मरणीय संगीत सभा-संमेलने

 • एन. सी. पी. ए., मुंबई
 • यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
 • दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई
 • देवल क्लब, कोल्हापूर
 • युवा संगीत महोत्सव, म्हैसूर व हैदराबाद
 • सवाई गंधर्व महोत्सव, कुंडगोळ
 • चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई आयोजित “चैत्र पालवी”
 • गानवर्धन, पुणे
 • मैफल, नागपूर
 • पलुस्कर समारोह, नाशिक
 • अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी
 • गांधर्व महाविद्यालय, पुणे
 • केसरीवाडा गणेशोत्सव, पुणे
 • गांधर्व महाविद्यालय आणि संगीत कलामंच आयोजित १७ वी संगीत शिक्षक परिषद, बेळगांव
 • उस्ताद अब्दुल करीम खाँ संगीत समारोह, मिरज

अपर्णाची ‘गुरुवंदना’ नावाची ध्वनीमुद्रिका निघाली आहे. त्यात त्यांनी हेमंत पेंडसेंच्या रचना त्यांच्याच बरोबर सादर केल्या आहेत. ही ध्वनीमुद्रिका गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांना वाहिलेली आहे. अनेक रसिक आणि नामवंत वृत्तपत्राची वाहवा मिळवणा-या अपर्णाचा संगीत प्रवास अधिक सृजनशील होत जाओ हीच सदिच्छा.