अभिनय हा शब्द ज्याच्या नावाशी पूर्णतः एकरूप आहे असा प्रतिभासंपन्न कलावंत कोण हा प्रश्न जर कुणी केला तर दिलीपकुमार शिवाय दुस-या अन्य कलावंताचे नाव रसिकांच्या ओठावर येणार नाही ;किंबहुना येवू नये अशी अतुलनीय कारकीर्द दिलीपची आहे. येत्या ११ डिसेंबर ला हा अभिनय सम्राट ‘नव्वदीत’ पदार्पण करतोय. पेशावर येथे १९२२ साली जन्मलेल्या दिलीपचं पाळण्यातल नाव होत युसुफ खान! ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये आल्यावर देविकारानीने त्याच फिल्मी बारस केलं. त्यावेळी बॉम्बे टॉकीज मध्ये पं.नरेंद्र शर्मा होते. त्यानी दिलीप करीता ‘जहांगीर’ ‘वासुदेव’ आणि ‘दिलीपकुमार’ ही नाव सुचवली. ‘दिलीपकुमार’ हे नाव फायनल करताना देखील देविकारानीच्या डोक्यात कुठेतरी ‘अशोककुमार’ या नावाशी साधर्म्य असावे असंच नाव हवे होते.
अप्रतिम अभिनय आणि आवाजाचे अचूक मर्म ओळखणारा कलावंत म्हणून त्याची रसिकाच्या दिलातील प्रतिमा आजही अबाधित आहे. ‘शोकात्म भूमिकांचा राजा’ ही बिरुदावली सार्थ करीत अंतर्मुख नायकाची रूपेरी प्रतिमा जोपासली जी ‘शिकस्त’, ‘फुटपाथ’, ‘मिलन’, ‘जोगन’ द्वारे पडद्यावर साकारली. याच ‘इमेज’ ला घेवून पुढे पन्नासच्या दशकात ‘दिदार’, ‘संगदिल’, ‘आरजू’ या सिनेमातून त्याने भग्न हृदयी प्रेमी बनून संवाद साधला. याचा कळसाध्याय गाठला गेला १९५५ सालच्या बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ मध्ये! पुढे सामान्य जनाकरीता न्याय मिळविण्यासाठी व्यवस्थे विरुद्ध बंड पुकारणारा, परिस्थितीचे भान राखून संतप्तता व्यक्त करणारा अशा युवा वर्गाला ‘अपील’ होणा-या भूमिका करीत त्या भूमिकांच देखील सोन करू लागला. अभिनयाचा हा वटवृक्ष जेव्हा वयाची ‘हाफ सेन्चुरी’ क्रॉस करून पुढे चालू लागला तेव्हा चरित्र भूमिका द्वारे ‘नेक्स्ट जनरेशन’ ला देखील आपल्या गहि-या अभिनयात रंगवू लागला. अतिशय संवेदनशील अभिनयातील बारकावे व्यक्त करतानाचा त्याचा फिकट गुलाबी चेहरा पडद्यावरील भूषण ठरला. हनुवटीवर हात ठेवून वैचारिक पोझ देत आणि अभिनयातील मोरपंखी अविष्कार घडविणारा तो ‘एकमेवाद्वितीय’ ठरला. त्याच्या पहिल्या ‘ज्वार भाटा ‘(१९४४) ते अलीकडच्या ‘सौदागर’ (१९९१) पर्यंतचा ४० वर्षाचा अभिनयाचा प्रवास दृष्ट लागावी इतका सुंदर आहे.
त्याच्या रूपेरी आगमनापूर्वी सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर ही बव्हंशी मंडळी रंगभूमीवरून सिनेमात आल्याने त्यांच्या आवाजाची ‘पीच’ मात्रा अधिक आणि अभिनयात नाटकी ढंग असण स्वाभाविक होत. पण दिलीपने ही संवाद शैली मोडून काढली. त्याने शब्दाच्या ओघातील ‘स्तब्धतेचे’ महत्त्व अधोरेखित केले. अलंकारित पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक, व्याकरण रहीत भाषा आणली. त्याने वाक्यातील प्रत्येक शब्दाला ‘भाव’ दिला ‘रंग’ दिला आणि चित्र प्रतिमेला ‘कलात्मक’ बनवलं. बिमल रॉयचा ‘देवदास’ हा दिलीपचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. शरश्चंद्र यांचा ‘देवदास’ म्हटलं की, नदी किना-यावरील ती हुरहूर लावणारी देवदास- पारोची भेट आठवते. नंतर पारोच्या आठवणीत हताशपणे किना-यावर फिरणारा देवदास… त्याचा हताश चेहरा, ऊरात सलणारा दुखः चा सल.. ‘इतनीसी भूल और इतनी बडी सजा’ …’वो शादी के रस्ते चली गई और मै बरबादी के ‘…भूमिकेत संपूर्णपणे विरघळणं म्हणजे काय याचा आदर्श आणि सर्वांसुंदर परिपाठ म्हणजे दिलीपची ही भूमिका ! दिलीपच्या ‘शोकात्म’ भूमिकातील ही सर्वात वरची पायरी होती. पण का कुणास ठाऊक सैगलचा ठसा त्या पिढीवर (१९५५) अधिक असल्याने दिलीपच्या देवदासला प्रदर्शना नंतर तुलनेच्या सामिक्षेतूनच जावे लागले. जीव ओतून केलेल्या भूमिकेला रसिकांचा सुरुवातीचा मिळालेला संमिश्र प्रतिसाद त्यालाही अनपेक्षित होता. याच मुळे त्याने गुरुदत्तच्या ‘प्यासा’तली ‘विजयची’ भूमिका नाकारली.
त्याच्या सुरुवातीच्या ‘मिलन’ची कथा गुरुदेव टागोरांची (नौका डुबी) होती. मिलन, आरजू, जुगनू, मेला या सिनेमातून त्याची प्रतिमा आणि प्रतिभा अधिकाधिक मोठी होत गेली. फिल्मिस्तानच्या ‘शहीद’ मध्ये त्याची भूमिका, त्यात शेवटी होणारा मृत्यू याने त्याला ‘ट्रॅजिडी किंग’ ही उपाधी मिळाली. तो कालखंड भारताच्याबाबतीत बोलायचं तर स्वतंत्र तेचा श्वास घेणारा होता. पं. नेहरू च्या स्वप्नांनी झपाटलेला होता. इंग्रजी साहित्य /सिनेमा यामुळे भारतात देखील रसिक प्रेक्षकांची ‘टेस्ट’ कलात्मक दृष्टीने बदलत होती. शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळत पणे येणा-या पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होवू लागला होता. उच्च श्रेणीची सांस्कृतिक भूक हवीहवीशी वाटत होती. नेमकं याच वेळी रूपेरी पडद्यावर सदाबहार ‘त्रिकुटाच’ आगमन झाल. मेहबूबचा ‘अंदाज’ (१९४९) हा भारतातला पहिला खरा ‘मल्टी स्टारर’ सिनेमा! दिलीप -राज-नर्गीस च्या अभिनयाची नवी झळाळी प्रेक्षकांना पहावयास मिळाली. दिलीपने आपल्या अभिनयाची चौकट निश्चित केली होती. नादियाके पार, शहीद, शबनम, दाग, जोगन, आरजू या सिनेमातून त्याची हळव्या प्रेमीची भूमिका रसिकांना आवडत गेली. नितीन बोसचा ‘दिदार’, रमेश सैगलचा ‘शिकस्त’, झिया सरहदी चा ‘फुटपाथ’ त्याच्या शोकात्म भूमिकांना आणखी गडद करणारे ठरले. देवदास नंतर मात्र त्याने या इमेजच्या बाहेर पडायचे ठरवले. नया दौर, मधुमती, यहुदी, मुघल -ए-आझम, गंगा जमुना, लीडर, कोहिनूर, दिल दिया दर्द लिया हे त्याचे सिनेमे व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी तर ठरले पण त्याच बरोबर हिंदी सिनेमाच्या ‘सुवर्णयुगाचेही’ साक्षीदार ठरले.
दिलीपच्या अभिनयासाठी, गीतासाठी, संवादासाठी नित्यनेमाने वारी करणारे भक्त मागच्या पिढीत ठायी ठायी सापडतील. कारदार यांच्या ‘दिल दिया’वर ‘Wuthering Heights’ ची स्पष्ट छाया होती (तसा तो दिलीपच्याच ‘आरजू’ चा रीमेक होता) यातील त्याचा अभिनय आठवा ‘धिक्कार है ऐसे नारी पर..’ म्हणतानाचा त्याचा अभिनय, आवाजातील उतार चढाव, चेह-यावरील भावनांची आंदोलन .. मशाल मधील वहिदा च्या इलाज साठी फोडलेला टाहो, ‘शक्ती’ मधील करारी पित्याचे ‘देखो विजय तुम्हे मेरे बरे मी जो भी शिकायत है, वो सही या गलत है’ हे सारे क्षण रसिकांना कायम रोमांचित करणारे होते. रफी /तलतचे स्वर आणि नौशाद अलीचे संगीत त्याच्या कारकिर्दीला ‘चार चांद’लावणारे ठरले. दिलीपच्या एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करायला हवा तो म्हणजे तपन सिन्हा दिग्दर्शित ‘सगीना महतो’ या बंगाली आणि नंतर हिंदीत आलेल्या सिनेमा बाबत. दुर्दैवाने हा सिनेमा चांगल्या पद्धतीने प्रेक्षका समोर येवू शकला नाही. विजय तेंडूलकर यांनी त्यांच्या ‘रातराणी’ या पुस्तकात या सिनेमाची खूप चांगली समीक्षा केली आहे. चरित्र भूमिका करताना देखील दिलीप त्याच्या खास ‘अंदाज’ मध्येच आला. (अपवाद ‘धरम अधिकारी’ ! ) अभिनयाची ज्या ज्या वेळी जुगलबंदी असे म्हणजे पृथ्वीराज सोबत ‘मुघल -ए-आझम’, अशोककुमार सोबत ‘दिदार’, संजीवकुमार सोबत ‘संघर्ष’, अमिताभ सोबत’ शक्ती’, राज कपूर सोबतचा ‘अंदाज’ आणि राजकुमार सोबतच ‘सौदागर’ त्या त्या वेळी दिलीपकुमार कायम जिंकण्याची जाणीव पूर्वक काळजी घेत असे! तसाही दिलीपला कायम चर्चेत रहावं अस वाटायचंच. मग निम्म्या वयाच्या सायरा सोबतच त्याच लग्न असो, हॉलिवूडच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया ‘ करीताच निमंत्रण असो, ऐंशीच्या दशकात ‘अस्मा’सोबत लावलेला आणि फसलेला ‘निकाह’ असो, अधिकृत रीत्या दिग्दर्शनाला घेतलेला आणि पूर्णत्वाला न पोचलेला ‘कलिंगा ‘असो, इतर सहकलाकारांवर केलेली कुरघोडी असो किंवा स्वतः ला ‘लार्जर दन लाईफ’ पेश करणं असो!
तब्बल आठ वेळा फिल्मफेयर पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, (वादग्रस्त ठरलेला) पाकिस्तान सरकारचा ‘निशाण -ए- पाकिस्तान’ पुरस्कार या सन्मानांनी सजलेलं दिलीपकुमारच आयुष्य समृद्ध ठरत आहे. भारतीय सिनेमा आता शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, हा अभिनय सम्राट नव्वदीत पदार्पण करतोय या निर्णायक क्षणी दिलीपकुमार यांचा ‘भारतरत्न’ पुरस्कार करीता विचार होईल?
धनंजय कुलकर्णी, पुणे