लोकजीवन

ग्रामीण

पार हद्दपार
gramin भारतात आजही शहरी आणि ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती आहेत. ग्रामीण संस्कृतीत गावचा ‘पार’ म्हणजेच सार्वजनिक ओटा अत्यंत महत्त्वाचा. पार म्हणजे जेथे गावकरी महत्त्वाच्या चर्चेसाठी, निर्णय घेण्यासाठी, रक्षणासाठी किंवा सहजच गप्पा मारण्यासाठी ज्या सार्वजनिक ओट्यावर एकत्र येतात त्याला पार असे म्हणतात. पार हे एक ग्रामीण संकृतीत माध्यम म्हणून महत्वाची भूमिका निभावते.

ग्रामीण भागात लोकजागृती घडवून आणण्यासाठी पार हे माध्यम महत्त्वचे ठिकाण आहे. ग्रामीण भागात गावाच्या केंद्रस्थानी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली गोल स्वरुपात ओटा बांधला जातो. पूर्वी पारावर गावातील महत्वाचे निर्णय घेतले जात. या निर्णय प्रक्रियेत गावाचे पाटील, सरपंच तसेच गावातील सर्व नागरिक सामिल असत. गावातील लोकांचे तंटे सोडविले जात. ग्रामपंचायातही तिचे निर्णय सुनावत असे. पूर्वी पारावरच गावातील शाळाही भरत असे. गावातील विदयार्थी येथे एकत्र येऊन शिक्षण घेत. गावाच्या विकासापासून ते राजकारणापर्यंत सर्व काही चर्चा याच ठिकाणी होत. गावाचा गावगाडा याच ठिकाणाहून चालविला जात असे. ग्रामपंचायतची निर्मिती झाल्यामुळे पारावर ग्रामपंचायत भरणे बंद झाले आहे. मात्र गावचर्चा काही प्रमाणात पारावर होताना आजही दिसते.

पार गावाच्या केंद्रस्थानी असल्यामूळे गावात नवीन पाहुणे आले तर त्यांना गावाची सर्व माहिती येथे बसलेल्या लोकांकडून मिळत असे. याठिकाणी गावातील वृद्ध लोकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच मंडळी बसत. आपला वेळ घालवण्यासाठी, गाव-गप्पा करण्यासाठी लोक येथे एकत्र येत. याठिकाणी बसून गावगाड्याविषयी चर्चा करीत. तसेच बाजार-गप्पा येथे करत. गावाचा पारावर एखादा विषय चर्चीला गेला की गावभर तो विषय पोहचत असे. आज माध्यमे जी भूमिका बजावत आहे तशीच भूमिका पूर्वी पार बजावत असे. गावातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पार हे संदेश महत्वाचे माध्यम होते. आजच्या युगात ज्याप्रमाणे फेसबुक, गुगल, ओर्कुट, याहू ही संकेतस्थळे तश्याच प्रकारे पार हे गावातील महत्त्वाचे संदेश वाहक स्थळ होते.

इतिहासाची साक्ष देणारे पार आजही ग्रामीण भागात दिसतात. मात्र बदललेल्या काळानुसार तेही आता ओस पडत आहे. आजच्या नवीन पिढीला पाराची ओळख मराठी चित्रपटातून होते. इंटरनेटच्या जगात फेसबुक, गुगल, ही संकेतस्थळे नव्या पिढीचे पार आहेत. मात्र जुन्या पारांचे अस्तित्व, आठवणी तेथील आनंद घेण्यासाठी आजच्या पिढीला पुन्हा पारावर जमावे लागेल हे नक्की.

आदिवासी

आदिवासींची रंगपंचमी
महाराष्ट्रात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. आदिवासींमध्ये रंगपंचमीला विशेष महत्त्व आहे. खासकरून भिल्ल, पावरा या जमाती रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. यादिवशी लोक एकमेकांना गुलाल तसेच रंग लाऊन गळाभेट घेतात. रंग उधळण्याच्या कार्यक्रमात अबाल वृद्ध सामील होतात. त्यानंतर गोट (बोकड कापणे) कार्यक्रमाला सुरुवात होते.

होळीची सांगता म्हणून प्रत्येक पावरा गावात गोट खाण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी त्याचे नियोजन ८-१० दिवस आधी केले जाते. गोट खाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी गावातील लोक नदीवर एकत्र जमतात.तेथे पुजारी विधिवत होळी मातेच्या नावाने व इतर देव-देवतांच्या नावाने पूजा करतात. नंतर मंत्र म्हणून तांब्यातील दारूचा एक-एक थेंब जमिनीवर टाकतात. गावाच्या भरभराटीसाठी आणि सुखशांतीसाठी देव-देवतांची प्रार्थना केली जाते. विधी झाल्यानंतर बोकडाचा बळी दिला जातो. कापलेल्या बोकडाचे रक्त एका भांड्यात जमा केले जाते. त्यामध्ये मीठ, मिरची टाकून ते शिजविले जाते. त्यानंतर त्यात शिजविलेल्या मटणाचे तुकडे एकत्र करून गोट तयार केला जातो. गावक-यांनी आपल्या सोबत आणलेल्या भाकरी अथवा पोळी यांचा काला (बारीक-बारीक तुकडे) करून त्यामध्ये गोट टाकून त्यांचे मिश्रण तयार करून लाडू केले जातात. ते उपस्थितांना वाटले जातात. उरलेला गोट समान वाटला जातो. त्या दिवशी रात्री प्रसाद म्हणून त्याचे जेवण केले जाते.

गोट खाण्याच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे होळीच्या नृत्यातील बुध्या, बाबा आणि काली हे आपल्या गावातील गोट खाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होतात. गावोगावी नाचगाणे करून मिळविलेल्या पैश्यातून बोकड आणला जातो. गावच्या समारंभासाठी बळी देण्यात येणा-या बोकडाबरोबर या बोकडाचाही बळी दिला जातो. त्यामुळे बुध्या, बाबा आणि काली यांना पण बरोबरीने हिस्सा दिला जातो. अशा प्रकारे आदिवासी जमातींमध्ये रंगपंचमी आणि गोट खाण्याचा कार्यक्रम यांना विशेष महत्त्व असून तो त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

संदर्भ – सातपुडयातील भिल्ल ल भिल्ल