प्रत्येक वेळी केक बनवताना, पुढील सल्ले व सूचना ध्यानात घ्या.
१. अंडी फेसायची भांडी स्वच्छ असायला हवीत. ही भांडी हिंडालियम किंवा जर्मन धातुची असल्यास श्रेयस्कर. असे केल्याने केकमध्ये कचकच लागत नाही.
२. मैदा व बेकिंग पावडर एकजीव करावी. हे एकत्र केलेले मिश्रण ३ वेळा चाळल्यास केक मऊ व स्पंजप्रमाणे लुसलुशीत होतो.
३. अंडयाचा पांढरा व पिवळा बलक वेगवेगळा फेसावा. असे कल्याने केक अधिक मऊ होतो. व फेटायला वेळ कमी लागतो. त्यातही पांढरा बलक आधी व मग पिवळा बलक फेटावा.
४. केकमधे रंग घालायचा असल्यास त्यात दूध घालू नये. कारण त्यामुळे रंग बदलतो.
५. केक भाजण्यासाठी वापराल ते केकपात्र ऍल्यूमिनियमचे असावे. कारण त्यामुळे केक लवकर ‘बेक’ होतो, तसेच जास्त मऊ देखील होतो.
६. मोठा केक (120 ग्रॅम्स व त्यापेक्षा जास्त वजनाचा) पाऊण तासात होतो, तर लहान केक (१०० ग्रॅम्स साहित्याचा) ओव्हनमधे केल्यास २० मिनिटांत तयार होतो.
७. ऍल्यूमिनियमच्या केकपात्रातून चारही बाजूने केक सुटला आणि वरच्या अंगाने त्याला रंग आला (ब्राऊनीश कलर) की सुरी किंवा विणायची सुई केकच्या मध्यभागी खुपसून पाहावी. सुईला/सुरीला मिश्रण चिकटून आले नाही तर समजावे की केक अगदी तयार झाला आहे.
८. केक भाजून झाल्यानंतर बंद ओहनमध्ये तो न ठेवता थोडा कोमट असतानाच ताटामध्ये किंवा चाळणीवर काढावा. तसे न केल्यास केक केकपात्रालाच चिकटून राहतो व निघत नाही.
९. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मॉडेल असल्यास केक लवकर तयार होतो, फक्त मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मॉडेल मध्ये केक चांगला होतो. साध्या मायक्रोवेव्हमध्ये केक फक्त शिजतो, बेक होत नाही. केक चांगला होण्याकरिता ओव्हन १५-२० मिनीटे तापवून घेणे आवश्यक आहे.
सीमा कुलकर्णी हया बेकिंग व कुकिंग कौशल्यामधे पारंगत आहेत. पाक-कलेचे क्लासेस घेणे, मुलांकरिता शिबिरे भरविणे, असे उपक्रम त्या करतात. त्यांनी बालवाडी-प्रशिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हया अध्यात्मिक चळवळीच्या त्या सदस्य आहेत.
साहित्य – १०० ग्रॅम मैदा, १/४ टी. स्पून सोडा (१/८+ १/८), १ टी. स्पून बेकींग पावडर, १३० ग्रॅम मिल्कमेड, ६०-७० ग्रॅम मार्गरिन, १ टी.स्पून व्हॅनिला इसेन्स, ५० मि.ली. दूध, ७५ मि.ली. पाणी, १३० ग्रॅम सीडलेस खजूर, ४० ग्रॅम तुकडा आक्रोड.
कृती – १) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा. नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे.
३) खजूर बारीक चिरून त्यात पाणी घालावे. १/८ सोडा त्यात घालावा. पाणी आटेपर्यंत खजूर गॅसवर शिजवावा.
४) मैदा, बेकिंग पावडर व १/८ सोडा पिठाच्या चाळणीने ३ वेळा चाळून झाकून ठेवावा.
५) मिल्कमेड व मार्गरिन फेटून घ्यावे.इलेक्ट्रीक बीटरने फेटल्यास उत्तम.
६) नंतर त्यात चाळलेला मैदा थोडा थोडा घालत फेटावे. नंतर त्यात दूध घालावे. शिजलेला खजूर व आक्रोडाचे तुकडे घालून परत फेटावे.
७) तयार मिश्रण टीनमध्ये घालून ओव्हनमध्ये ठेवावे. साधारणपणे १८-२० मिनाटे बेक करावे.
८) साधारण २० मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.
९) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. जाळीवर केक काढल्याने केकला दोन्ही बाजूनी हवा लागते. थंड झाल्यावर तुकडे कापावेत.
– आदिती पातकर