‘रॅडिकल रिव्होल्यूशनरी’ असं जिच्या नव्या अल्बमविषयी अमेरिकेतली वृत्तपत्रं म्हणतात. सलमान रश्दीसारखे लेखक तिच्या वादनाला ‘द नेक्स्ट बिग बिग’ म्हणतात. ‘ब्यूटीफुल लेडी विथ मॅजिकल बीटस्’ असं जिला म्हणता येईल ती आहे एक मराठी तरूणी सुफला पाटणकर !
पाश्चात्य-भारतीय, आधुनिक-पारंपारिक, इलेक्ट्रॉनिकल-क्लासिकल अशा संगीताच्या सरहद्दी पार करून तिने लोकप्रियता मिळविली आहे. नुकताच तिचा ‘ब्ल्यू प्रिंट’ हा अल्बम प्रसिध्द झाला. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स, ब्यूटीफुल पीपल अशा वृत्तपत्रांनी व मासिकांनी त्याबद्दल तिचं कौतुक केलंय. तरूणांमध्ये हा अल्बम सध्या धूम करतोय.
सुफला अमेरिकेत मिनियापोलिस इथे लहानाची मोठी झाली. वयाच्या तिस-या-चौथ्या वर्षापासून पियानो शिकायला लागली. संगीत हे तिचं पहिलं प्रेम आहे. गायन, वादनाचा वारसा नसला तरी आवड तिला वारशानं मिळाली. तिचे वडील मेकॅनिकल इंजिनीअर असून स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. आई मेडिकल टेक्निशीयन आणि कॉम्प्यूटर प्रोग्रॅमर. लहानपणी पियानो शिकताना ती सर्व प्रकारचे संगीत ऐकायची. विविध वाद्य ऐकताना तबल्याविषयी विशेष आवड निर्माण झाली आणि वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे तशी थोडी उशिराच तबला शिकायला तिने सुरूवात केली.
सॅनफ्रान्सिस्को येथे जगप्रसिध्द तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन तिला गुरू म्हणून लाभले. त्यानंतर भारतात मुंबईला उस्ताद अल्लारखॉ यांच्याकडे तबला शिकण्यासाठी यायला लागली. गुरू-शिष्य पध्दतीने सुफला भारतात येऊन तबला शिकायला लागली. वर्षातले तीन महिने तर कधी सहा महिने भारतात राहू लागली. इतर शिष्यांप्रमाणे ती अल्लारखॉ यांची ‘बेटी’ झाली. दोन्ही गुरुंनी शास्त्रीय संगीत शिकतांना त्याचा पाश्चात्य संगीताशी मिलाफ करून वाजवायला कधी विरोध केला नाही. फ्यूजनसाठी तिला या गुरुंकडूनच प्रोत्साहन मिळालं. उस्ताद अल्लारखॉ असेपर्यंत ती त्यांच्याकडे शिकली. त्यांच्या निधनानंतरही त्यांची बरसी अथवा विद्यालयाच्या गुरूपौर्णिमा कार्यक्रमांसाठी ती आवर्जून उपस्थित असते.
सुफलाचे आतापर्यंत वादनाचे ‘इन्स्ट्रूमेंटल’, ‘द नाऊ’ आणि ‘ब्ल्यू प्रिंट’ असे तीन अल्बम प्रसिध्द झाले आहेत. सॅनफ्रान्सिस्को आर्ट इस्टिटयूशनमध्ये शिकताना लोकल क्लबच्या एका कार्यक्रमात तिला तबला वाजवतांना पेरी फॅरल यांनी ऐकले आणि रॉक बॅण्डमध्ये वाजवण्यास सांगितले. दोन वर्षे तिने विविध ठिकाणी कार्यक्रम केले. त्यानंतर पहिला अल्बम इन्स्ट्रूमेंटल केला. २००२ मध्ये एका कार्यक्रमात पं. रविशंकर यांची कन्या नोरा जोन्स हिच्याशी तिची ओळख झाली. कलावंत आणि माणूस म्हणूनही छान असलेल्या नोराशी तिची मैत्रीच झाली. नोराला तिने नव्या अल्बमसाठी विचारले आणि नोरा तसे एन्टेनिओबॅन्डेरास, किंग ब्रिट, व्हर्नोन रीड आदीसह ‘द नाऊ’ हा अल्बम केला.
भारतीय संगीताचे मुख्य वैशिष्टय म्हणजे उत्स्फूर्तता. कलावंत बांधीव राग गात वाजवत नाहीत. त्याचे गायन-वादन स्टेजवर आल्यावर मनाने खुलत, फुलत जाते. राग विस्तार काही आधी ठरवून ठेवलेला नसतो. एकच राग प्रत्येक कलाकार नियमात राहूनही प्रत्येक वेळी विविध प्रकारे खुलवत, विस्तार करत सादर करतो. आपल्या संगीताचं हे वैशिष्टय ही थीम होऊन सुफलाने ‘ब्ल्यू प्रिंट’ अल्बम तयार केलाय. तिच्या घरात, स्वत:च्या आरामदायी रेकॉर्डिंग रुममध्ये तबला, कॉम्प्युटर की बोर्ड आणि मायक्रोफोन यांच्या सहाय्याने ती एकटीच विविध रचना, टयून्स तयार करते. आणि मग या मूळ कल्पनेत इतर कलावंत, गायक यांच्या सहाय्याने रंग भरते. Ancient sound for next generation असं हे सादरीकरण पाश्चात्य देशातील तसेच भारतीय तरूणांना आवडतंय. ‘ब्ल्यू प्रिंट’ मध्ये तिच्याबरोबर बासरीवादक राकेश चौरसिया, गायक एडी ब्रिकेल, किंग ब्रिट, व्हर्नोन रिड आदी कलावंत आहेत.
सुफलाने पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा देशांमध्येही दौरे केले आहेत. तालीबान उध्दवस्त झाल्यानंतर तिथे भेट देणा-या मोजक्या कलावंतांमध्ये सुफला होती. “मी आत्तापर्यंत महिला तबला वादकाबरोबर वादन केलं नव्हतं आणि आमचे पूर्वज तर अशी कल्पनाही करू शकत नव्हते” असे उदगार तिच्याबरोबर तबला वाजवणा-या अफगाणिस्तानमधील तबला वादकाने काढले होते. न्यूयॉर्क सिटीसेंट्रल पार्क, समरस्टेजच्या वर्धापन दिनानिमित्त झालेला तिचा कार्यक्रम अविस्मरणीय होता, असं ती म्हणते. लाखो लोकांसमोर सादर केलेलं भारतीय व पाश्चात्य संगीताचं फ्यूजन लोकांना आवडलं. त्यांच्या प्रतिक्रिया जवळून बघायला मिळाल्या असं ती म्हणते. ब्यूटिफुल पीपलसारख्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर ती झळकली आहे. तिचे कपडे वैशिष्टयपूर्ण असतात. म्यूझिकप्रमाणेच कपडयातही नावीन्य तिला आवडते. ती म्हणते ‘आय मे लूक ट्रेन्डी बट माय म्यूझिक इज ऑरगॅनिक’ पाश्चात्य आणि भारतीय संगीत, संस्कृती याचा अफलातून मिलाफ असलेली सुफला तिच्या आवडीच्या क्षेत्रात रमली आहे. असं भाग्यं थोडयांना मिळतं. पण इथे परफेक्शन असलं की, दुसरं काही लागत नाही हेच तिने सिध्द केलंय. रॅकिंग अल्बम देणारी ही भारतीय तरूणी म्हणते,” फॉलो द ड्रीम्स – यश तुम्हाला मिळेलच”
राधिका गोडबोले, नाशिक