हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘संगीतकार दत्ताराम’ हे नाव एके काळी खूपच गाजले होते. ”आसू भरी है ये जीवन की राहे” हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता ‘दत्ताराम’. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. त्यांना पाच वर्षापूर्वी पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याचे भाग्य मला लाभले आणि जीवनाच्या अखेरच्या पर्वात दत्ताराम पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आले. गेल्या आठवडयात हा मनस्वी, कलंदर कलावंत गोव्यातल्या डिचोलीजवळच्या म्हावळंग या गावात वृध्दापकाळात निधन पावला. त्यांचे जाणे हे तर निश्चित होते, पण या अखेरच्या दिवसांत त्यांना पुन्हा लाभलेली लोकमान्यता त्यांचे जीवन उजळून गेली आणि जुन्या हिंदी गाण्यांच्या रसिकांनाही त्यांच्याएवढाच अवर्णनीय अनंद होता.
गोव्यात ‘गोमान्तक’ दैनिकाचा प्रमुख संपादक म्हणून संचार करतांना डिचोलीमध्ये संगीतकार दत्ताराम जवळपास अज्ञातवासात राहतात अशी माहिती मिळाली. म्हावळंग या गावी त्यांना जाऊन गाठले. पण ते बोलायला तयार नव्हते. आपला भूतकाळ मागे टाकला आहे, आजच्या सवंग संगीताच्या युगात त्या आठवणी कशासाठी ? असा त्यांचा सवाल होता. पण दोन-तीन वेळा भेटून त्यांना या वैफल्यातून बाहेर काढल्यावर माळयावर टकलेले जुने अल्बम त्यांनी खाली काढले. त्यांच्याशी गप्पागोष्टी रंगू लागल्या आणि त्यातूनच ‘गोमान्तक’च्या दिवाळी अंकात त्यांच्यावरील प्रदीर्घ लेख प्रसिध्द झाला. त्यामध्ये निवडक २०-२५ छायाचित्रेही होती. या एकाच लेखाने दत्ताराम यांचे जीवन बदलून गेले. अज्ञातवासातून हा कलावंत बाहेर आला. राजकपूर, शंकर – जयकिशन, लता मंगेशकर, मन्ना डे, महंमद रफी अशी हयात आणि काळाच्या पडद्या आड गेलेली महान माणसे त्यांच्या भोवती पुन्हा कल्पनेच्या विश्वात नाचू लागली. दत्ताराम यांचा नैराश्याचा कालखंड संपला, नव्या पिढीला सांगण्यासारखे आपल्याकडे काहीतरी आहे, किंबहुना आपण कोणीतरी आहोत अशी आत्मसन्मानाची भावना त्यांच्या मनात तयार झाली आणि त्यांच्या मनाने उभारी धरली. गोव्यात ठिकठिकाणी त्यांचे सत्कार झाले. काही ठिकाणी त्यांच्याबद्दल मला भाषणे द्यावी लागली. भूतकाळाच्या विस्मृतीचा पडदा भेदून संगीतकार दत्ताराम वयाच्या ८० वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकांपुढे सन्मानाने आले. त्यांच्या नव्या चाहत्यांनी त्यांना आर्थिक पाठबळ दिले. गोवा सरकारने या गुणी कलावंताला मासिक मानधन सुरू केले. एका मनस्वी कलावंताची जणू लोकमान्यतेची नवी इनिंग सुरू झाली होती.
दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव ‘दत्ताराम वाडकर’ सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल – भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा ‘आग’ चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण ‘आग’ आपटला. पुढे ‘बरसात’ जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. ‘चोरी चोरी’ चित्रपटात ‘ये रात भिगी भिगी’ या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत ‘दत्ताराम ठेका’ म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना ‘अब दिल्ली दूर नही’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ”चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया” हे गाणे हिट झाले.
दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे ‘परवरिश’ चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. “ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें ” या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली ‘कैदी ने ९११’ मधील लताच्या आवाजातील ”मिठी मिठी बातोंसे बचना जरा” हे गाणेही खूप लोकप्रिय झाले.
१५ – १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, ‘परवरिश’ साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली आणि २० वर्षापूर्वी गोव्यात आले. थकले होते, काळ बदलल्याचे भान त्यांना होते. आपण कधी काळी लोकप्रिय संगीतकार होतो हेही त्यांना विसरायचे होते, तसेच ते वागले, पण आमच्या प्रयत्नांनी त्यांची स्मरणयात्रा पुन्हा जागी झाली, पुण्यात ‘दत्ताराम रजनी’चा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी झाला. अनेक सत्कार झाले. हा कृतज्ञ कलावंत भारावला, म्हापशाला त्यांची चार महिन्यापूर्वी भेट झाली तेव्हा थकलेल्या दत्ताराम यांनी अचानक वाकून माझ्या पायाला हात लावला, ”मला म्हातारपणी नवी ओळख दिलीत, आता मरायला मी मोकळा आहे” असे डोळयात पाणी आणून म्हणाले. आता तर ते खरोखरच गेले आहेत.
– शरद कारखानीस