अष्टपैलू पुष्कर

pushkar shrotri मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि सिरियल्स ह्या सर्व माध्यमातून सहजपणे प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा पुष्कर श्रोत्री सर्वांच्या परिचयाचा आहे. मराठीवर्ल्ड डॉट कॉमच्या रसिकांसाठी पुष्कर सोबत मनमोकळ्या गप्पा.

प्रश्न – तू ह्या क्षेत्रात कसे पदार्पण केलंस? ठरवलेल होतंस की योगायोग?
उत्तर – डहाणूकर कॉलेज, विले पार्ले येथे शिकताना गुरु विश्वास सोहोनी ह्यांच्याकडे एकांकीकेत काम केले, ज्यामध्ये उन्मेश, मृगजळ, आ.सी.फ़ ह्या एकांकिकेच्या स्पर्धेत भाग घेतला. सुदैवाने नाटकांना आणि मलाही बक्षिसे मिळाली. टी. वाय. बी. कॉमला असतांना पहिले व्यवसायिक नाटक केले ’हसत खेळत’ ह्याचे दिग्दर्शक होते अरुण नलावडे. अशोक सराफ, विनय येडेकर, क्षमा देशपांडे ह्या सारख्या कसलेल्या कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. शिक्षणानंतर बँकेत नोकरी करताना बॅरेस्टर, तरुण तुर्के म्हातारे अर्क, संध्याछाया, घर श्रीमंतांच, शोभायात्रा, हम तो तेरे अशिक है, अहो प्रेमात सगळचं माफ असतं इत्यादी व्यावसयिक नाटक गाजली.

प्रश्न – अभिनयाबरोबर कुठे नोकरी करत होतात?
उत्तर – मी, युनायटेड वेस्टन आताची आ. डी. बी. आय बँकेत ४ वर्षे काम करतांनाच नाटक आणि मालिका केल्या. नंतर १९९७ पर्यंत बँकेत कार्यरत होतो. आता मी इव्हेंट डायरेक्शन व चित्रपट बनवतो. जल्लोष, आपण ह्यांना ऐकलंत का?, अंडी आणि कोबंडी इत्यादी चित्रपट बनवले. मुद्दाम सांगण्यासारखे म्हणजे ७५ मराठी कलाकरांना घेऊन त्यांनीच स्वत: गायलेले “जन गन मन” राष्ट्रगीत मी स्वत:च रचले आणि त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. हे राष्ट्रगीत सध्या ६५ सिनेमॅक्स हॉलच्या चित्रपट सुरु होण्याआधी स्क्रीनवर दिसतात.

प्रश्न – ह्या सर्वात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून पाठींबा कसा होता?
उत्तर – मला माझ्या कुटुंबियांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. माझ्यापेक्षाही कुटुंबियांना मी ह्या क्षेत्रात यावे असे वाटत होते. त्यामुळे मी नोकरी सोडून ह्या क्षेत्रात आलो.

प्रश्न – आत्तापर्यंत केलेली मालिका आणि चित्रपट कोणते?
उत्तर – गाजलेल्या मराठी मालिका – गावाकडल्या गोष्टी, दामिनी, बंदिनी, सावज, भूल, सांजसावल्या, अवंतिका, वादळवाट, अभिलाषा, दौलत, अर्धांगिनी, व्हील स्मार्ट सुनबाई.
नॉन-फिक्शनल – टिकल ते पोलीटिकल, दार उघडा ना गडे
हिन्दी मालिका – कभी इधर तो कभी उधर, चुटकी बजाके, मिसेस. माधुरी दिक्षित, बा, बहु और बेबी.
मराठी सिनेमे – बिन पैशाचा तमाशा, कायद्याच बोला, आणि हाय काय नाय काय.
हिन्दी सिनेमे – पेहेचान, विरुद्ध , मुनाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, रीटा, मिर्च
लवकरच प्रर्दशित- अनोळखी हे घर माझे, टोपी घालरे, हापूस.

प्रश्न – दिग्दर्शनासाठी ’हाय काय नाय काय’ कसा सुचला?
उत्तर – हा विषय खूप दिवसांपासून डोक्यात होता. दिग्दर्शनासाठी मी आणि प्रसाद गेल्या २ वर्षांपासून स्क्रीन प्ले, चित्रपटाचे शॉट ह्याचा अभ्यास केला. ह्या चित्रपटासाठी आम्ही स्क्रिनिंग, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय केलाय. आत्तापर्यंतचा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार ज्यात ही चारही कामे एकाच व्यक्तीने केली आहेत.

प्रश्न – ’हाय काय नाय काय’ साठी कसा प्रतिसाद मिळाला?
उत्तर – उत्तम ! फोन करुन, रस्त्यात थांबून कौतूक करतात. खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रश्न – तुमच्या पुढच्या योजना काय?
उत्तर – वेगळे आणि चांगले सिनेमे बनवायचे आहेत. ह्यात थ्रिलर, कॉमेडी सुद्धा आले. मराठी सिनेमा मध्यप्रदेश, गुजरात सारख्या इतर राज्यात घेऊन जायचे आहेत.

प्रश्न – तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कोणता?
उत्तर – “अमिताभ बच्चन बरोबर काम करणे ! ते माझे देव आहेत.”

मुलाखत – वैशाली अय्या, ठाणे