नृत्यकला

विविध नृत्य कला प्रकार

महाराष्ट्रात कोसाकोसावर मराठी लोकसंस्कृतीचे वैविध्य पहायला मिळते. महाराष्ट्रातल्या जाती-जमातींनी त्यांच्या परंपरा आणि आनंद विविध लोकनृत्यांतून जपला आहे. महाराष्ट्राची खरी ओळख ही लावण्याचं दर्शन देणारी लावणी ही जरी असली तरी अनेक लोकनृत्याचे प्रकार आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. कोकणात कोळी नृत्य तसेच नाशिक व नंदुरबारच्या आदिवासी भागात आदिवासींच्या लोकजीवनातील विविध प्रसंग आदिवासी नृत्यातून प्रतित होतात. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी नृत्याच्या पाऊलखुणा दिसतात, तर विदर्भात दंडार हे लोकनृत्य प्रचलित आहे. साधारणत: मराठी मनाला ही लोकनृत्ये माहिती आहेत. पण, या नृत्यांमध्येही विविध उपप्रकार बघायला मिळतात.

कोकणात गेलात तर कोळी, चेऊली, बाल्या तसेच गौरी-गणपतीच्या वेळी करण्यात येणारे नृत्य त्या लोकजीवनाचे खास असे नृत्य असते. आदिवासी भागात कोकरू, ठाकूर, भिल्ल अशा विविध जमातींमधून नृत्य केली जातात. ही नृत्ये ज्या वाद्याच्या साह्याने केली जातात त्या नृत्यांना त्या वाद्यांची नावे देण्यात आली आहेत. उदा. ढोल नाच, तारपा नृत्य अशी या नृत्यांची नावे आहेत. संतांनी तर महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा निर्माण केली आहे. या परंपरेतूनही काही नृत्ये पुढे आली आहेत. पालखी नेतांनाचा विशिष्ट ठेका, भारूड, वारीतील उंच उड्या मारून धरलेला ताल. तर टिपरी व गोफ नृत्ये नागर समाजात चांगलीच प्रचलित आहेत. ही नृत्ये पाहताना भुवया उंचावल्या नाहीत तर नवलच. या भक्तिपरंपरेला लागूनच कडकलक्ष्मी, वीर नाचणे, बोहाडे नाचणे, घागर फुंकणे, गौळण, भोंडला, मंगळागौर यातूनही लोकजीवन, भक्तिपरंपरा दिसून येते. आपले दैनंदिन काम करतानाही सुगीच्या दिवसांत आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरीही विशिष्ट ताल धरतात. त्यालाच शेतकरी नृत्य म्हटले जाते. धनगरांचे धनगर नृत्य असते, तर वाघ्या-मुरळीचा गोंधळ असतो. ही नृत्ये कुठून आली, त्याचा इतिहास काय?, त्याची परंपरा काय, असे अनेक प्रश्न असतात, त्याचाच मराठी वर्ल्डच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा…

तारपा नृत्य

आदिवासींचा सण-उत्सवात वा मंगलप्रसंगी जसे आदीवासी नृत्य केले जाते तसे त्यांचे एक लक्षवेधी नृत्य असते ते म्हणजे तारपा नृत्य. आदीवासींमध्येही विविध समाज आहे. त्यापैकीच वारली हा एक समाज. हा समाज कलासक्त आहे. उत्सवप्रिय आहे. वारली पेंटींग जसे प्रसिद्ध आहे तसेच या समाजातील तारपा हे देखील प्रसिद्ध आहे.

Tarpa या सामाजात तारपा नृत्याला फार वेगळे स्थान आहे. मंगल प्रसंग, लग्न यावेळी तर तारपा नृत्याचा फेर धरला जातोच पण आपल्या डोंगरमाळावरील जमीनीवर जेव्हा लागवड केली जाते विशेषत: भाताची किंवा नागलीची लागवड केली जाते तेव्हा तारपा नृत्योत्सव साजरा केला जातो. तसेच हेच पिक तरारुन आले की, या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो त्या आनंदाही हे नृत्य सादर केले जाते. हे नृत्य सादर करण्याचीही एक वेळ आहे. साधारणत: चंद्र दिसल्यावर तारपा नृत्याचा फेर धरला जाते. तर मध्यरात्रीपर्यंत विशिष्ट रचनेतून हे नृत्य सादर होते. हे समुहनृत्य असल्याचे त्याची मजा काही औरच येते.

Tarpa आदीवासी बांधवांमध्ये होळी हा सण विशेष महत्त्वाचा आहे. त्यामुळे होळीच्या रात्रीही हे बांधव तारपाच्या तालावर नाचतात. आदिवासी बांधवांचे लक्षवेधी कपडे, घुंगरू, ठेका धरण्याची विशिष्ट पद्धत त्या ठेक्यावर हेऽऽऽऽ ओऽऽऽऽ अशा हाका देणे आणि बेधुंद होऊन नाचणे हा सोहळा बघतांना बघणा-यांचे डोळे दिपून जातात. या रिंगणाच्या मध्यावर एकजण तारपा वाजवत असतो. हा तारपा तो वाजवत असतानाच तो देखील ठेका धरत असतो. गोलाकार, हातात हात गुंफून हे नृत्य जो तारपा वाजवत असतो त्याच्याकडे पाठ करुन केले जाते. हे पूर्ण नृत्य गोलाच्या आत नव्हे तर बाहेरच्या दिशेनेच केले जाते. हातात हात गुंफून हे नृत्य काही मोठा उत्सव वा नवीन काही घडले तर केले जाते. ते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले आहे. असा संदेश यातील हातात हात गुंफणे ही रचना देते.

काय आहे तारपा ?
Tarpa खरे तर तारपा हे या वारली समाजातील एक खास वाद्य आहे. सुकलेला भोपळ्यापासून हे वाद्य तयार केले जाते. एक मोठा वाळलेला भोपळा घेतला जातो. (इंग्रजीतील जे आकाराचा असल्यास उत्तमच.) तो कोरून-कोरून पोकळ बनविला जातो. त्याला विशिष्ट ठिकाणी छिद्र पाडले जातात. आदिवासी अर्थात वारली कलेनुसार त्याला सजविले जाते आणि हा तारपा वाजविला जातो. तारपा वाजवतांना तुमच्या श्वासावर तुमचे उत्तम नियंत्रण हवे. त्याच बरोबर तारपा वाजवतांना तुमचा दमही जास्त टिकायला हवा.