वो हमसे चूप है

C Ramchandra अंदाजे २०-२१ वर्षांपूर्वीची घटना आहे. आमच्या सातारा गावात राजस्थानमधून अध्यात्मिक क्षेत्रातील एक गृहस्थ प्रवचना करिता आलेले होते. आठ-पंधरा दिवस त्यांचा मुक्काम होता. त्यांचे दोन शिष्य सकाळच्या वेळी गावातील काही भागातून भजने म्हणत चालत जात असत. त्यापैकी एकाच्या गळयात हार्मोनियम पण असे. ते दोघे आमच्या घरापुढून जात असतांना माझ्या कानावर ती हार्मोनियमची धून आणि त्यांच्या आवाजातील “श्रीकृष्ण, गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा” हे शब्द कानावर आले. परमेश्वराचे नामस्मरण करीत ते चालले होते. एक दिवस नाही तर तीन-चार दिवस तीच धून, त्याच चालीतील ते शब्द ऐकले आणि मी सहजासहजी ते तसेच गुणगुणू लागलो.

आपल्याला ती चाल का आवडली आहे, स्मरणात राहिली आहे याचा विचार मी करू लागलो तेव्हा लक्षात आले की, ही चाल एका चित्रपटगीतामधून आपण यापूर्वीच ऐकली आहे. तेव्हा मी त्या दोन शिष्यांना गाठून विचारले की, आपणाला ही चाल कोणी शिकविली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘आमच्या गुरूंनी!” त्यावर मी काही बोललो नाही. पण त्यांच्या गुरूने ही चाल कोठून घेतली आहे ते माझ्या लक्षात आले होते.

१९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या, फिल्मीस्तानच्या राजकपूर, रेहाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरगम’ या चित्रपटातील ‘वो हमसे चूप है, हम उनसे चूप है’ या द्वंद्वगीताची ती चाल होती. त्या चालीवरच या अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी ‘श्रीकृष्ण गोविंद’ अशी परमेश्वराची नावे घेऊन एक मधूर भजन तयार केले होते.

अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना जी चाल भावली होती ती हिंदी चित्रपटसृष्टीत आधीच लोकप्रिय झाली होती. १९५० सालानंतर १५ वर्षांनी ती चाल वापरण्याचा मोह संगीतकार चित्रगृप्त यांना झाला होता म्हणून तर त्यांनी १९६५ सालच्या ‘आधी रात के बाद’ या चिपटासाठी याच चालीवर गीतकार आंनद बक्षींकडून गाणे लिहून घेतले होते. “बहुत हसी है तुम्हारी आँखें, कहो तो मैं इनसे प्यार कर लू….”या चालीचा महिमा एवढयावर थांबत नाही. पुन्हा जवळ जवळ ४० वर्ष गेल्या एक- दोन वर्षात पडद्यावर आलेल्या ‘उमरावजान’ला संगीत देणारे अन्नू मलिक यांनी त्याही चित्रपटात हीच चाल वापरून गीतकार जावेद अख्तरकडून गाणे लिहून घेतले “तुम्हारी महफील में आ गये है, तो क्यूं न हम ये हिसाब कर ले, सलाम करनेकी आरजू है, इधर जो देखो सलाम कर ले..”

पंचावन्न वर्षाच्या कालावधीत सिनेमा व अध्यात्माच्या क्षेत्रातील लोकांना तीन वेळा तीच धून वापरण्याचा मोह होतो एवढी ती आकर्षक धून तयार करणारे संगीतकार होते सी. रामचंद्र!

सी.रामचंद्र अशी अजरामर गीते मागे ठेवून २५ वर्षांपूर्वी महायात्रेला गेले. त्यांच्या स्मृती जागवतांना त्यांचे सहकारीही आठवतात आणि विशेषत: सप्टेंबर महिना आला की ‘७ सप्टेंबर’ गीतकार पी. एल. संतोषींची यादही तीव्र करतो. पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच ‘अनोखे बोल’ हा गीतप्रकार ‘टिका लई कली दई’ (चित्रपट – शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. ‘कोई किसीका दिवाना ना बने’ (सरगम), ‘महफिल में जल उठी शमा’ (निराला), ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.

रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. ‘शहनाई’, ‘खिडकी’, सरगम’ हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या ‘हम पंछी एक डालके’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते.

C Ramchandra अशा या पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात. पी. एल. संतोषींच्या लेखणीतून उतरलेले एक गाणे त्यांच्या स्मृतीदिनाच्यानिमित्त सादर करत आहे. या लेखाच्या सुरूवातीला जो चाल, संगीत याचा किस्सा मी कथन केला आहे, तीच चाल असलेले मूळ गाणे पी. एल. संतोषींचेच होते. त्या गाण्याची चाल जेवढी मोहक, आकर्षक आणि लक्षात राहणारी आहे तेवढेच त्याचे शब्दही अर्थपूर्ण आहेत.

दोन प्रेमिकांचे हे गुंजन – त्यांच्या ह्दयाचे स्पंदन व्यक्त करताना संतोषी लिहितात, ‘सी. रामचंद्र’ नावाने चितळकर गातात :

“वो हमसे चूप है हम उनसे चूप है”
लता मंगेशकर साथ देतात-
“मनानेवाले मना रहे है”

दोन प्रेमिकांमधील काही क्षुल्लक झगडयांमुळे निर्माण झालेला हा अबोला, नंतर दोघांनीही सुरू केलेला संवाद, प्रेमिकात असे रूसवेफुगवे होतच असतात. एकमेकांवर प्रचंड प्रेम असलेले ते दोघे भांडून पुन्हा एकत्र येतात व गातात-

“वो हमसे चूप है हम उनसे चूप है
मनानेवाले मना रहे है
निगाहे उठ उठ के कह रही है
मजें मोहब्बत के आ रहे है…..”

वारंवार त्याची नजर चुकवून पण पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच बघावेसे वाटते म्हणून त्याच्याकडेच बघून मी माझी नजर काही बोलते आहे असे म्हणतो त्यावर ती म्हणते, होय ही नजर सांगते की या अशा रूसण्या – फुगण्यामुळे प्रेमाची लज्जत आणखी वाढते आहे.

ये झूठी आहें,
ये झुठे ऑसू
झलक रहे है
जो हर पलकमें

(अहो बघा ना त्यांच्या) डोळयात तराळणारे हे पाणी – हे अश्रू तसे खोटेच आहेत. त्यांनी दु:खाने टाकलेले निश्वासही खोटेच आहेत. (उगीचच माझ्यावर रूसल्यामुळे हे घडले आहे) त्यावर ती पण म्हणते –

बना रहे है-

बता रहे है- के टूटे दिल दो
हजारो सदमें उठा रहे है
मजें महोब्बत के आ रहे है

(उगीचच, काही कारण नसताना) तुटलेली, दुखावलेली दोन ह्दये, दोन मने (एकमेकाला) बनवत आहेत, फसवत आहेत की एकमेकांना सांगत आहेत – एकमेकांशी बोलत आहेत (मी बोलू इच्छित आहेत). पण लटक्या रागामुळे बोलत नाहीत. त्यामुळेच अनेक धक्के (सदमें) सहन करत आहेत, पण या लटक्या रागानेच प्रेमातील रंगत वाढत आहे.

रूसवा – रूसवीचा हा खेळ आणखीन कसा रंगत आणतो ते सांगताना ती म्हणते –

घडी में बिगडे, घडी में झगडे
है बैठे फिरभी ऐसी अदासे

क्षणात नाराज होत आहेत, क्षणात भांडत आहेत, पण बघा ना कशा नख-याने असले आहे
तिच्या या आरोपावर तो म्हणतो –

दबाके अपने होठोंको दोनो
हॅसीको अपना छिपा रहै है

ती असे काही म्हणाली तरी तो म्हणतो, खरे म्हणजे आम्ही दोघे…. आमचे हास्य ओठाआड दाबून धरून बसलेलो आहोत. आमचे ….. आम्ही लपवत आहोत. कारण आमचे हे भांडण, ही रूसवाफुगवी… सगळे प्रेमातील एक भाग आहे. हे आम्ही ओळखून आहोत.

दोन प्रेमिकांमधील किरकोळ भांडण, वादावादी, रूसवाफुगवी, त्यातून घडणारा अनोखा संवाद पी. एल. संतोषींनी असा लाडिक शब्दात बांधलेला होता आणि त्याची लज्जत सी. रामचंद्र यांच्या संगीताने अधिकच वाढलेली होती.

– पद्माकरजी पाठकजी, सातारा