पापड / मसाले

मसाले

आनंदानं जेवण करणं ही जशी चांगली बाब आहे, तसंच दुसर्‍याला आनंद मिळेल असं जेवण तयार करणं हा गृहिणींचा कौतुक करण्याजोगा गुणच म्हणावा लागेल.उन्हाळा आला, आंबट कैर्‍या, लोणची, पापड निरनिराळी वाळवणे ह्यांचा ऋतु सुरू होतो आहे.

मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी पापड कराण्याच्या कृती, तसेच लोणच्याचे प्रकार निरनिराळे मसाले तयार करण्याच्या कृती सादर करीत आहोत. तुम्हाला हा विभाग आवडेल याची खात्री आहे. चला तर मग खमंग जेवणाची सोय करण्यासाठी रोजच्याच डाळ-भात अधिक रुचकर करण्यासाठी थोडे प्राविण्य पाककलेतही मिळवूयात.

तांदळाचे पापड

tandulpapad साहित्य – १ किलो तांदूळ, लाल तिखट, पापडखार, हिंग, मीठ.

कृती – तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते दळून आणावे, १ भांडे पिठाला १ भांडे पाणी देऊन त्यात अर्धा चमचा हिंग पावडर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार व १ चमचा लाल तिखट पाण्यात घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ भांडे तांदळाचे पीठ घालून मंद विस्तवावर पिठाची उकड करावी, उकडीला दोन वाफा आल्यावर ढवळून गॅस बंद करावा. गरम असतांनाच पीठ तेलाच्या हाताने मळून घ्यावे व तेलाच्या हाताने एकसारख्या लाटया तयार करून तेलावरच पापड लाटावेत.

टीप – ह्या पापडाचे पीठ एक वेळेला १ भांडयाचेच करावे, नाहीतर पीठाचा चिकटपणा गार झाल्यावर कमी होऊन पापड लाटतांना फाटतात.

तांदळाच्या पापडया

tandul papadya साहित्य – १ किलो जुने सुवासिक तांदूळ, मीठ, हिंग पावडर, १ टे. स्पून खसखस.

कृती – तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते दळून आणावे, १ भांडे पिठाला ३ भांडे पाणी, मीठ, हिंगपूड व खसखस घालून मिश्रण कालवावे. गॅसवर ठेवून गुठळी होऊ न देता मिश्रण हलवावे व पीठ शिजवून घ्यावे. वाटल्यास अर्धे भांडे पाणी आणखी घालावे.

टीप – वरील पिठाच्या पीठ गरम असताना प्लॅस्टिकच्या कागदावर मोठया पातळ पापडया घालाव्यात. दुसर्‍या दिवशी उलटया बाजूकडून वाळवाव्यात व खडखडीत वाळल्यावर डब्यात भराव्यात.

पोह्याचे पापड

साहित्य – १ किलो जाड पोहे थोडे भाजून दळून घ्यावेत. पोह्याचे निम्मे पीठ पापड लाटायला ठेवावे, लाल तिखट, पापडखार, हिंग, दळलेले मीठ.

कृती – १ भांडे पिठाला १ भांडे पाणी, अर्धा चमचा हिंग पावडर, १।। चमचा मीठ, २ चमचे लाल तिखट व १।। चमचा पापडखार घालून पाणी उकळावे. पाणी खाली उतरवून कोमट झाल्यावर त्यात एक भांडे पोह्याचे पीठ घालावे व पीठ भिजवून तेलाचा हात लावत पिठाचा गोळा खलबत्यात घालून कुटावे. पिठाचा कुटून लुसलुशीत गोळा तयार झाला पाहिजे. जेवढे पीठ जास्त कुटू तेवढे पापड हलके होतात. पीठ कुटून झाल्यावर तेलाच्या हाताने त्याच्या लाटया कराव्यात व पोह्याच्या पीठावर पापड लाटावेत व सावलीत वाळवावेत. नंतर दोन दिवस उन्हात खडबडीत वाळवून डब्यात भरावेत.

टीप – पोह्यांचे पीठ थोडे थोडे भिजवून कुटून मगच पापड लाटावे लागतात. एका वेळी एकाच भांडयाचे पीठ भिजवावे.

उडदाचे पापड

udidpapad साहित्य – २ किलो उडदाच्या डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पापडखार, १।। बारीक मीठ, १५ ग्रॅम पांढरे मिरे, २५ ग्रॅम काळे मिरे, हिरव्या मिरच्या आवडीनुसार, १।। वाटी तेल, ५० ग्रॅम हिंग.

कृती – उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, ४ वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. पाणी गार झाल्यावर थोडा पापडखार खाली बसेल तो घेऊ नये वरील पाणी घ्यावे. हिरव्या मिरच्यांवर उकळते पाणी घालून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे तिखट तयार करावे. मिर्‍यांची व हिंगाची पूड करावी.

उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंगपूड, तिखट घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. पीठ शक्यतो रात्री भिजवून ठेवावे. दुसर्‍या दिवशी पाटयाला व वरवंटयाला तेलाचा हात लावून कुटावे. पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाटया करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. तयार झालेले पापड सावलीत वाळवून डब्यात भरावेत. सर्व पापड झाल्यावर दोन दिवस सावलीत खडखडीत वाळवावेत.

टीप – वरील पापडाच्या पिठात १ किलो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद-मुगाचे पापडही चांगले होतात. पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटूनयेत. भाजतांना लवकर जळतो.

कुरडया

kurdya साहित्य – १ किलो गहू, मीठ, १ चमचा हिंग पावडर.

कृती – गहू ३ दिवस पाण्यात भिजत घालावे. प्रत्येक दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशी गहू वाटून चोथा काढून सत्व काढून घ्यावे. वरील वाटलेले सत्व रात्रभर झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी वर आलेले निवळीसारखे पाणी फेकून द्यावे व खालील दाट सत्व भांडयाने मोजून घ्यावे. जेवढी भांडी गव्हाचे सत्व असेल तेवढी भांडी पाणी उकळायला ठेवावे. पाण्यात अंदाजे मीठ व हिंगाची पावडर घालावी व पाण्याला उकळी आल्यावर भांडयात एका बाजूने गव्हाच्या सत्वाची धार धरून पीठ लाकडी चमच्याने सतत हलवावे. गुठळी होऊ देऊ नये. पीठ शिजत आले की, घट्ट चकचकीत व पारदर्शक होईल. पीठ खाली उतरवून शेवयांच्या सोर्‍यात भरून प्लॅस्टीकच्या कागदावर छोटया मोठया कुरडया घालाव्यात. दुसर्‍या दिवशी उलटया करून दोन्ही बाजूने उन्हात खडखडीत सुकवाव्यात व डब्यात भराव्यात.