आनंदाचा परिजातक
छोटया छोटयाशा क्षणांतील
मजा चाखत जगता यावे
पार नसलेल्या आनंदाला मग
इवल्याशा मुठीत मावता यावे
थकून सायंकाळी घरी आल्यावर
प्रसन्न वदनी दीप उजळावे
दाराआड लपलेल्या गंमतीने
चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे
हेतूक – अहेतूक नाजूक कटाक्षांनी
मोहरत्या कळयांचे गंध व्हावे
जीवन डवरणा-या क्षणांना
धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे
दाटून येणा-या स्निग्धतेतून
पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे
जीवनाशी राखून जाळ अबाधित
विश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे
चिमखडया गोड गोड बोलांना
भाबडे बोबडे प्रश्न पडावे
निरर्थक अशा हावभावांनीही
हसून हसून बेजार व्हावे
पक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाट
हिरव्याकंच साजाने नाचनाचावे
क्षितीजावर करुन सोनेरी उधळण
निसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे
महाल गाडया नि शेतीवाडया
कशास यांचे अप्रूप वाटावे
फुलवाया मळे आनंद अंगणी
वणवण फिरण्या ते का लागावे
आनंदाचा असा पारिजातक
सदैव दरवळतो मनामनात
शोधावा तेव्हा तो सापडतो
आपला आपल्याच आंगणात
यतीन सामंत
|
देवाचा तराजू
देवा तुझ्या तराजूला एक पारडे जड का?
माणसाच्या ठोकळयाला दोन हाती माप का?
दुर्जनांच्या परिपत्या जन्मतो तो तूच ना?
हिंदवीला आग-याची मग सांग ना कैद का?
शुभ्रतेच्या ज्योतीसंगे काजळी किनार का?
जीवनाच्या धुंद क्षणी आसवांची धार का?
बेरजेचा गोफ झुले एखाद्याच्याच भाळी
कुण्या येती नशीबी केवळ वेदनांची जाळी
निर्जीव हया बाहुल्याला विकारांची चेतना का?
दिव्यत्वाच्या झेपेसाठी अपूर्णतेचा शाप का?
निर्मितीचा आनंद का रे वैचित्र्यात शोधतोस?
संभ्रमाच्या तराजूत का रे मानवाला तोलतोस?
यतीन सामंत
|
हे पोष्टमणा
ये रे ये रे पोष्टमणा
माहेरच्या आण डाकें
मना लागे हुरहुर
वरण होई फिके-फिके
वाटेकडे तुझ्या डोळे लावून
लावून मला चष्मा लागे
चित्त नसे स्वयंपाकात
भाजीत हे कच्चे वांगे
पायतली काढून हाणू का रे
सुंदर तुझ्या ह्या थोबडयावरती
लक्ष न देताच जातोस मेल्या
दारावरून माझ्या पुढती
काय मेले लफडे तुझे
शेजारच्या टवळी संगे
रोज रोज कार्डे द्याया
तिच्या घरी कोण सांगे?
ये रे ये रे पोष्टमणा
खबर घेऊन गावाहून
अगोबाई नादात तुझ्या
भाजी गेली की रे करपून
आई माझी म्हातारी
असेल वळीत वाती
किंवा आजोळी आलेल्या
असेल खेळवित नाती
बाबा माझे मोठे शास्त्री
असतील सांगत शास्तर
निरोप त्यांचा पोचव ना रे
आणून माझ्या पोत्तर
मी न शिकले तरी
भाऊ माझा शाळेत प्यूण
हुशार शिकलेला
दुजा कचेरी कारकूण
बहिणी माझ्या साळू, काळू
चमेली, ढमेली नि मैना
असतील दमलेल्या संसारी
कळीव की रे त्यांची दैना
लगबगे पोष्टमणा
माहेरच्या आण डाके
मनात रे माझ्या कशी
पाल का रे चुकचुके?
यतीन सामंत
|
कोरडे पाषाण
कोरडया सोपस्काराचे कोरडेच झरे
वैराण वाळवंटातील भगभगीत वारे
नात्यांचे आखीव रेखीव बांध काही
आपुलकीचा आनंद गंध नाही
हास्याच्या कृत्रिम कवायती या
अंतरीचा त्यात उन्माद नाही
भावनांना यांच्या ओल नाही
जिव्हाळयाचे कुठे बोल नाही
आटलेल्याच मनोमनद्या साऱ्या
पात्र कुणाचेच खोल नाही
आपुलकीची ओसरतील सर नाही
भावनांना कुणाच्याही घर नाही
अहिल्याचा शिळांना तर आता
कुणा श्रीरामाचा कर नाही
काळजात सल कधी उठत नाही
आतडयातही यांच्या का तुटत नाही
मनं कशी कुणात गुंततच नाही
नाती जुळलीच जर, तर कळत नाही
देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश
कोरडा मी कोरडा तू कोरडयापाषाण सारे
विमनस्क अशा आभाळी विखुरलेले तारे
नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे
नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
मुडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो
यतीन सामंत
|