१ ते १२ आठवडे
स्त्रीबीज व शुक्रजंतू योग्य स्थितीत असतील तर त्यांचा सफल संयोग होऊन बीज तयार होते. नंतर त्याचाजवळजवळ तीन दिवस प्रवास सुरू असतो. साध्या नजरेला न दिसणारे हे गर्भबीज ४ इंच लांबीच्या गर्भनलीकेतून प्रवास करीत गर्भाशयात प्रवेश करते. तुम्ही गर्भार असल्याची तारीख तुमच्या आधीच्या महिन्याच्या ऋतुचक्राच्या पहिल्या तारखेपासून मोजली जाते. म्हणजे गर्भ रुजला की दोन आठवडांचा असतो.
दोन आठवडाचा गर्भ
स्त्रीबीज व पुरूषबीज ह्याचे मिलन गर्भाशय नलिकेत होते. ४६ गुणसुत्रे मिळून येणा-या Fertilised egg बाळाचे मानवी, शारीरिक, मानसिक स्वभाव ठरवतात. फलित झालेले हे बीज नलिकेतून गर्भाशयाकडे सरकते. गर्भबीज गर्भाशयात आले की, ते तेथेच तरंगत रहाते व भराभर वाढत जाते. एक पेशीच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा पेशी वाढून पेशींचा समूह तयार होतो. हा समूह, लहानलहान चेंडू एकमेकांना घट्ट चिटकवून ठेवल्यासारखा दिसतो. काही दिवसांनी या घट्ट गोळ्यात मध्यभागी पाणी तयार होते. त्या पाण्यामुळे गोळ्याचा आकार दुप्पट होतो. आत पाणी व बाहेरून नारळाच्या खोबण्यासारखा दिसणारा हा पेशीसमूह-गर्भपिंड साधारणपणे तिस-या आठवडात गर्भाशयाच्या अंतरभागाला चिकटतो. तो अंतरभाग उकरून तेथील पेशी खाऊन जगतो. अशाप्रकारे प्रत्येक गर्भ आईचे रक्तमांस खाऊन मोठा होतो. गर्भाशयाच्या अंतरभागातील रक्तवाहिन्यांतील रक्तावर हा वाढत असतो. काही काळाने ह्या गर्भपिंडाच्या अंगावर जणू हजारो जीभा निर्माण होतात व त्यांनी भोवतीच्या रक्तातील पोषक द्रव्ये भराभर शोषून गर्भपिंड मोठा होतो.
६, ८, १२ आठवडा
याच्या पुढची गर्भाची वाढ अशी की, गर्भपिंडाची बाह्य बाजू गर्भाशयाच्या आतील बाजूला चिकटलेली असते. ती 6 weeks embrayo नारळाच्या करवंटीप्रमाणे घट्ट होऊ लागते तिच्यापासून वार तयार होऊ लागते. ती ९ महिन्यांपर्यंत गर्भाशयाला चिकटलेली असते. गर्भपिंडाच्या आतल्या पेशीपासून छोटा गर्भ (embrayo) तयार होतो व बाकीच्या पेशींची एक पाण्याने भरलेली पिशवी तयार होते तिच्यात गर्भ तरंगत रहातो. गर्भाशयाच्या पिशवीत गर्भजल तुमच्या बाळाचे रक्षण करते. तुमच्या बाळाला अन्न, पाणी, प्राणवायु नाळेच्या सहाय्याने मिळायला सुरुवात होते. थोडक्यात बाळाचे घर तयार होते. आता आईचे ऋतुचक्र थांबते. तुमच्या बाळाची वाढ अत्यंत झपाटयाने होत असते. बाळाच्या हृदयाची स्पंदने चालु होतात. मुख्य व महत्त्वाच्या अवयवांची जडणघडण चालु होते. डोळे, कान, मणका, छोटे हात पाय हे झपाटाने तयार होतात. तुमचे शरीर दिवसरात्र ह्या कामात गुंतलेले असते. पर्यायाने तुम्हाला थकवा अधिक जाणवतो.
६ व्या आठवडात गर्भाची लांबी ३ ते ५ मि.मी. असते. आता मेंदूचे कार्य झपाटाने पूर्ण होते. मेंदूची तीन आवरणे जी स्मरणशक्ती, 8 weeks embrayo संदेशवाहिन्या तसेच श्वसन व स्नायू हालचालींकरीता जबाबदार असतात, त्यांची वाढ पूर्ण होते. किडनी तसेच यकृताची वाढ होते. ७ व्या-८ व्या आठवडा दरम्यान तोंड व जीभ आकाराला येते. हात, पायांची लांबी वाढून छोटी छोटी बोटे आकाराला येतात. रक्तपेशी बाळाचे यकृत निर्माण करते. बाळाचा रक्तगट स्वतंत्रपणे तयार होतो. गर्भ आता १/२ इंच लांबीचा असतो व मजेत गर्भजलात पोहू शकतो.
१२ व्या आठवडापर्यंत तुमचा गर्भ जणू छोटा बालकाचे रूप घेतो. हृदयाचे काम पूर्ण होते. २९ दात व हिरडयांचे काम सुरू होते. स्वरयंत्र आकाराला येते, पापण्या निर्माण होऊन मिटलेल्या अवस्थेत सातव्या महिन्या पर्यंत राहतात. मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते. गर्भ आता सहजपणे अंगठा चोखू शकतो.
पहिल्या त्रैमासिकात खाण्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पौष्टीक व सकस आहाराबरोबर फॉलिक ऍसिड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. तसेच हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, वाटाणे, ह्यातूनही फॉलिक ऍसिड मिळते. फॉलिक ऍसिड अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या गर्भारपणाच्या प्रारंभी जाणवणारी काही प्राथमिक लक्षणे :
१ पाळी चुकणे
पाळी चुकणे हे गर्भार असल्याचे प्रथम लक्षण मानले जाते तरी सुध्दा डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या व चाचण्या करून घेणे अधिक चांगले.
२ उलटया व मळमळ
गर्भ रूजत असतांनाच्या पहिल्या काही आठवडात तुम्हाला उलटया होऊ शकतात. अन्नावरची वासना उडते. पण अन्न हे घेतलेच गेले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर बिस्कीटांसारख्या कोरडा मितआहाराने सुरवात केल्यास उलटयांची भावना काही अंशी कमी होते. सतत थोडया थोडया अंतराने अन्न घेत राहणे चांगले. अधिक उलटया होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले.
३ अधिक थकवा
गर्भारपणाच्या पहिल्या ८ ते १० आठवडात तुम्हाला अधिक जाणवतो. तुमच्या शरीरात चाललेल्या झपाटाच्या बदलाने हा थकवा अधिक जाणवत असतो. तुमचे शरीर दिवसरात्र गर्भ रूजवण्याच्या व वाढवण्याच्या कार्यात गुंतले असल्यामुळे साधारण १२ आठवडापर्यंत हा थकवा सकाळी जाणवतो. ह्यालाच मॉर्निंग सिकनेस म्हणतात.
४ हलका स्त्राव
सुरवातीला जेव्हा गर्भ गर्भाशयात रूजत असतो तेव्हा हलका फिकट गुलाबी रंगाचा स्त्राव होण्याची शक्यता असते. हा स्त्राव साधारण शुक्राणू व स्त्रीबीज ह्यांचे मिलन झाल्यावर ८-१० दिवसांनी होतो. तुमच्या नेहमीच्या ऋतुचक्राशिवाय तुम्ही सहजपणे हा स्त्राव ऒळखू शकता कारण हा अतिशय हलका, गुलाबी तसेच नेहमीच्या पाळीच्या स्त्रावाच्या तक्त्याप्रमाणे (आधी हलके – अधिक – परत हलके) नसतो.
५ तापमान वाढणे
नलिकेत गर्भधारणा झाल्यावर गर्भ गर्भाशयाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. ह्याच दरम्यान तुमचे शारीरिक तापमान नेहमीपेक्षा थोडे वाढलेले जाणवते.
वरील लक्षणे थोडाफार फरकाने कमी अधिक प्रमाणात गर्भवती स्त्रियांमध्ये आढळतांना जाणवतात.