मूल-मंत्र

राजीव तांबेराजीव तांबे हे सध्याचे मुलांचे सर्वात आवडते लेखक. राजीव तांब्यांची प्रत्येक कृती आणि काम हे फक्त आणि फक्त मुलांसाठीच असते. मुलांसाठी लिखाणाबरोबरच त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी, पालकांसाठी, युनिसेफ आणि अनेक ‘एनजीओज’ संस्थांसाठी चर्चासत्रे, प्रशिक्षण आणि सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी त्यांनी चालवलेला ‘गंमतशाळा’ हा उपक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबविला जातो. वृतपत्रातल्या लेखना बरोबरच त्यांची मुलांसाठी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. ह्यामध्ये गोष्टी, कविता, कादंब-या, निबंध लेखन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण तसेच मुलांच्या भाषा विकासावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ह्या कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

आरसा

काही मोठी माणसं आरशासारखी असतात. आरशात कसं डावीकडचं उजवीकडे दिसतं म्हणजे उलटं दिसतं, अगदी तशीच असतात ही माणसं. ही मोठी माणसं काही ना काही निमित्त काढून उगाचच लहान मुलांशी भांडत असतात. आणि… त्या मोठया माणसांना वाटत असतं की ही लहान मुलेच आपल्याशी भांडत आहेत.

मला सांगा, अशा मोठया माणसांशी भांडत बसायला ही लहान मुले का वेडी आहेत? इतकी साधी गोष्ट पण त्या मोठया माणसांना समजत नाही. यातला आणखी एक प्रकार म्हणजे लहान मुले जे बोललीच नाहीत ते सुध्दा या मोठया शहाण्या आरसे माणसांना म्हणे स्पष्ट ऐकू येतं. आणि मग पुढे काय होतं… हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
हा पुढचा प्रसंगच पाहा की…

संध्याकाळी चक्क टीव्ही न पाहता समीर खिडकीत उभा होता. आरसे बाबांचं समीरवर बारीक लक्ष होतं. सलग पाच मिनिटं समीरला खिडकीत उभा पाहून बाबा बेचैन झाले आणि त्यांच्यातला आरसा ऍक्टीव्ह झाला! ”आज खिडकीत उभा रहायचा अभ्यास दिला आहे का? बास झाला टाईमपास. चल गणिताचा गृहपाठ करायला घे.” असं बाबांनी म्हणताच समीर त्यावर काही बोलणारच होता. इतक्यात पुन्हा बाबा गरजले, “हे बघ, गणिताचा गृहपाठ दिलेला नाही हे कारण अजिबात चालणार नाही समजलंय?”

पुन्हा एकदा समीरने तोंड उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तेव्हा बाबांचा पारा चढला. वैतागून टिव्ही बंद करत बाबा म्हणाले,”जरा शांतपणे बातम्या काही बघू देणार नाही. आता जरा तोंड बंद करून माझं ऐक.” या सर्व प्रकाराने समीर कावराबावरा झाला. कसाबसा धीर धरून तो म्हणाला, ”बाबा पण मी काही बोललोच….”

आता बाबांचा संतापाचा आरसा तडकला! ते म्हणाले, ”कमाल आहे! मी तुला तोंड बंद कर सांगितले तर तू पुन्हा बोलतोस?” समीरला संकटाची चाहूल लागली. पण तरीही नेटाने समीर खिडकीपासून काही दूर झाला नाही. आता बाबांचा आरसा तापायला लागला. इतक्यात समीरने थोडीशी हालचाल केली आणि बाबांना काही कळायच्या आत समीर झटक्यात दरवाज्यातून बाहेर पळाला. बाबांसाठी हा प्रसंग इतका अनपेक्षित होता की त्यांचा तापलेला आरसा काळवंडला.

पाणवठया जवळ वाघ जसा दबा धरून बसतो त्याप्रमाणे बाबा दरवाज्यात आपल्या प्रिय सावजाची वाट पाहात बसले. पाचच मिनिटात आई पाठोपाठ दोन हातात पिशव्या घेतलेला समीर पाहताच त्या वाट पाहणा-या वाघाची शेळी झाली!
आई म्हणाली, ” कशाला ओरडलात त्याला? अहो मीच त्याला खिडकीत उभं राहायला सांगितलं होतं. या दोन जड पिशव्या घेऊन तीन जीने चढणं मला शक्य तरी आहे का? समीरची केव्हढी मदत होते मला.” आता शेळी गुरकावत म्हणाली, ”मग तसं त्याने सांगायचं नाही का मला? मला म्हणाला गणिताचा गृहपाठ दिला नाहीये. मग कशाला करायचा गणिताचा अभ्यास?”

बाबांच्या डोक्यातला आरसा आईला माहीत होता. आणि हा आरसा आईने बरोबर ओळखला आहे हे बाबांनी पण ओळखलं होतं. त्यामुळे बाबांनी लगेचच टिव्ही सुरू केला व बातम्यांकडे डोळे आणि आईच्या बोलण्याकडे कान ठेवून ते शांतपणे खूर्चीत बसून राहिले. मुलाची प्रत्येक कृती ही आपल्याला खिजवण्यासाठीच आहे. असंच मानतात ही आरसेवाली माणसं?

खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून लांब राहून तरीही स्वच्छपणे पाहता यावं यासाठी प्रत्येकाच्या डोक्यात असतेच की एक काच. पण काही माणसं स्वत:तच इतकी गुरफटतात की त्यांच्या काचेचा आरसाच होतो! या आरशातून त्यांना पलीकडची गोष्ट दिसत नाही, समोरचा माणूस समजावून घेता येत नाही. आपण आरसा झालो आहोत हे काहींना कळत नाही. ते सगळीकडे स्वत:लाच पाहात असतात असे आरसे असणा-या घरातल्या मुलांची मात्र फार पंचाईत होते. म्हणून खूप वाईट वाटतं!

पालकांसाठी गृहपाठ – आता इतकं स्पष्ट सांगितल्यावर त्यांना आपल्या डोक्यातील आरसे दिसतील ते पालक भाग्यवान. आणि ज्यांना दिसणार नाहीत त्यांच्या मदतीसाठी मुले आहेतच!

‘आधाराशिवाय उभाच राहू शकत नाही आरसा’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.

– राजीव तांबे