एक शून्य शून्य

कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया mweditor@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल.

सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती.

शोध अविनाशचा

शोध अविनाशचा (भाग-१)
जे. जे. मार्ग पोलीस ठाणे येथे मी कर्तव्यावर असतांना, पोलीस ठाणे नव्यानेच सुरू झालेले असल्यामुळे तेथे पो.उपनिरीक्षक फार कमी होते. त्यामुळे व तेथील वरिष्ठ पो.निरीक्षकांच्या हाताखाली मी त्यापूर्वी काम केले असल्यामुळे त्यांना माझ्या कार्यपध्दतीची पूर्ण कल्पना असल्यामुळे, पो.ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व गुन्हे प्रतिबंधक अधिकारी अशा दोन जबाबदार्‍या माझ्यावर टाकण्यात आल्या होत्या. मीही त्यापूर्वी सलग चार वर्षांपेक्षा जास्त काळ प्रथम विमानतळ सुरक्षा व नंतर विशेष सुरक्षा विभाग (एस.पी.जी) येथे अ कार्यकारी शाखांमध्ये काम केलेले असल्याने पोलीस ठाण्याच्या कामात अपेक्षेपेक्षा जास्त लक्ष घालत होतो. १९९२/९३ च्या भीषण जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर पो.ठाणे नवीन सुरू करण्यात आलेले असल्याने व तेथे गुन्हेगारी जास्त असल्यामुळे, पो.ठाण्याची जरब वाढावी आणि गुन्हेगारांना वचक बसावा अशी माझी भावना होती.

त्यावेळी सलग ४/५ दिवस मी पो.ठाण्यातच रहात असे, आठवडयातून १/२ वेळा घरी जात असे. अशाच एका संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पो.निरीक्षकांनी मला त्यांच्या कक्षात बोलावून मी त्या दिवशी काय करणार आहे? घरी जाणार आहे का? याबद्दल विचारणा केली. “३/४ दिवस घरी गेलेलो नाही त्यामुळे जर काही तातडीचे काम नसेल तर मी आज ८ वाजता घरी जाण्याचा विचार करतो आहे” असे सांगितले. “आजचा दिवस जाऊ नकोस. रात्री हा परिसर नीट पाहून ठेव आणि रात्री तीन वाजता मला घरी फोन कर” असे सांगून साहेबांनी एका कागदावर ‘शम्स्’ टेमकर मोहल्ला असे लिहून तो माझ्याकडे सरकवला.

मेडिकल कॉलेजच्या कॅटीनमध्ये जेवण करून मी माझ्या कक्षात बाकावर पडलो आणि रात्रपाळीच्या शिपायाला मला अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास गस्तीवर जातांना उठवण्यास सांगितले. रात्री शिपायांबरोबर पायी फिरून टेमकर मोहल्यातील ‘शम्स्’ नावाच्या बंद ऑफिसचा परिसर नीट पाहिला. ‘शम्स्’ हे कुख्यात गुन्हेगाराचे ऑफिस असून ते बरीच वर्षे बंदच आहे. दारावर व भिंतींवर न्यायालयाच्या व पोलिसांच्या असंख्य नोटीसच्या प्रती चिकटविण्यात आलेल्या होत्या. रात्री साडे तीनच्या सुमारास साहेबांना फोन करून उठवल्यावर अर्धा ते पाऊण तासात साहेब पोलिस ठाण्यात हजर झाले. मला कक्षात बोलावून त्यांनी सांगितले की वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पहाटे किंवा सकाळी अविनाश नावाचा इसम टेमकर मोहल्यात येणार असून त्याच्याकडे विदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आहे असे सांगितले.

मिळालेली माहिती अत्यंत तुटपूंजी तसेच अविनाशचे वर्णन नव्हते व टेमकर मोहल्यात तो ‘शमस्’ परिसरात येणार आहे ते ठिकाण किंवा वेळ ह्याचीही माहिती नव्हती. मी माझ्या पथकातील शिपायांना माहिती दिली आणि टेमकर मोहल्यांत आणि शम्स् ऑफिसच्या परिसरात इमारतींच्या व्हरांडयात आणि जिन्यात अंधारात शिपायांना वेगवेगळया ठिकाणी थांबवण्यास सांगून मी आणि साहेब अशाच एका अंधार्‍या जिन्यात थांबलो.

सुमारे तीन तास म्हणजे सात ते साडेसातच्या सुमारास गल्लीत वर्दळ वाढल्यावर तेथे थांबणे अशक्य वाटल्याने व रहिवासी आमच्याकडे संशयाने पहात असल्याने आम्ही पाळत ठेवण्याचे काम थांबविण्याचे ठरविले. रात्रभर थंडीत शिपायांना थांबविले असल्यामुळे त्यांना चहा देऊन मी पोलिस ठाण्यात आणतो असे मी साहेबांना सांगितल्यावर साहेबही आमच्यासोबत चहा पिण्यासाठी आले. दोन अधिकारी त्यातील एक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे गल्लीतील हॉटेलमध्ये शिपाई बाजूच्या टेबलवर बसले. मी माझ्या नेहमीच्या पध्दतीने आंत शिरण्याच्या दरवाजाकडे तोंड करून बसलो. चहाची वाट पहात असतांनाच हॉटेलच्या दारासमोरून एक तरूण जातांना दिसला.

“मुस्लीम मोहल्यांत हिंदू ठेवणीचा चेहेरा लगेच लक्षात येतो ना सर”, मी त्याच्याकडे निर्देश करून साहेबांना म्हणालो. हो, आपल्या अविनाशकडे परदेशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्तूल) आहे अशी खबर आहे. पण ह्या तरूणाच्या हातात पिशवीवैगरे काही दिसत नाही. फक्त एक छत्री आहे, साहेब उदगारले. तरीही मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो तरूण ‘शम्स्’ समोरच्या पानाच्या टपरीवर गेला, त्याने सुपारी तोंडात टाकून पाच मिनिटे उभा राहिला व पुन्हा परतीच्या वाटेला लागला. तो पुन्हा हॉटेलसमोरून जाऊ लागला. तेव्हा मी पथकातील दोन शिपायांना बोलाऊन त्या तरूणाकडे हलकासा निर्देश केला, व सांगितले त्या तरूणाला त्याचे नांव विचारा अविनाश असे सांगितले तर त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जा, अशा सूचना दिल्या. शिपाई गेल्यावर मला अचानक जाणीव झाली. ”सर, आपल्याला खबर पिस्तूलाची आहे जर तो तरूण अडचणीत आला तर तो शिपायांवरही हल्‍ला करण्याची शक्यता आहे त्याच्यांकडे कोणतेही शस्‍त्र नाही. विनाकारण धोका नको, असे सांगून मी चहा सोडून रस्त्यावर आलो. माझ्या समोरच दोन शिपाई त्यांच्‍यापुढे तो तरूण गल्लीबाहेर पडले. गल्लीबाहेर गेल्यावर शिपायांनी त्या तरूणाला थाबंवले त्याच्याशी बोलून शिपायांनी या तरूणास सोडून ते माझ्याकडे आले. काय झाले असे विचारले असता “ते पो.अधिकरी आहे. फौजदार प्रशांत देशपांडे असे त्यांचे नांव असून ते ठाण्याला असतात” असे शिपायांनी सांगितल्यावर त्या तरूणाच्या देहयष्टी व पोशाखावरून त्यांचे म्हणणे पटण्यासारखे होते. पण ठाण्याचा कोणीही पोलिस अधिकारी एकटा नागपाडयातील टेमकर मोहल्यासारख्या ठिकाणी एकटा येणार नाही, येताना त्याचे शिपाई बरोबर आणेल आणि प्रथम स्थानिक पोलिस ठाण्यात येऊन पोलिस मदत मागेल, ह्याची खात्री असल्याने मी दोन्ही शिपायांना सोडून धावतच त्या तरूणाच्या मागे गेलो व त्यास थांबवले. त्याने त्वरीत ”येथे माझ्याशी बोलू नका, माझ्यावर पाळत आहे आणि मी पोलिसांच्या कामासाठीच आलोय असे त्याने घाईघाईने सांगितले. मला त्याचे बोलणे चमत्कारी वाटल्याने मी त्याच्या पँटमध्ये खोचलेल्या शर्टच्या कमरेच्या डाव्या बाजूला हात घातला. तेव्हा अग्नीशस्त्राची मूठ हाताला लागली. मी शस्त्र बाहेर काढले असता ते हंगेरीयन बनावटीचे पिस्तूल होते. त्याच्या क्लिपमध्ये गोळयाही होत्या.

पोलिस खात्यात ९ मि.मी पिस्तूले भारतीय बनावटीची आहेत, व जी परदेशी आहेत ती बेल्जियमची आहेत. हंगेरीयन पिस्तूले महाराष्ट्र पोलिस दलात वापरत नाहीत. ह्याची माहिती असल्याने मी तेच पिस्तूल त्या तरूणावर रोखले. त्यावेळी त्याने दोन्ही हात वर करून “साहेब मारू नका, मी हत्यार द्यायला आलो होतो.” असे सांगितले. त्या तरूणाने पिस्तूल नागपाडयात देण्यास आलो होतो असे सांगताच, मी माझे पोलिसी कर्तव्य सुरू केले. तोपर्यंत आमच्या आजूबाजूला माणसे जमू लागली होती. त्यातील दोघांना मी साक्षीदार म्हणून काम करण्याची विनंती केली. त्यापूर्वी मी माझी स्वत:ची आणि सोबतच्या शिपायांची ओळख करून दिलेली असल्याने त्या दोन्ही व्यक्ती पंचनाम्यासाठी तयार झाल्या. दरम्यान साहेब व इतर स्टाफही तेथे पोहोचला. पंचनामा करून ते पिस्तूल जप्त करून त्या तरूणासह आम्ही पोलीस ठाण्यात आलो. त्याच्या झडतीत एक चिठ्ठी सापडली त्यावर अविनाश असे नांव व एक स्थानिक फोन नंबर होता, आणि दुसर्‍या एका चिठ्ठीत दुबई येथील एक नंबर होता.

आरोपीच्या सांगण्‍याप्रमाणे दुबईचा क्रमांक त्यांच्या मुख्याचा खास सहका-याचा होता. ते हत्याराची देवघेव करण्यास येत त्यावेळी बनावट नावाचा वापर करीत. तसेच हे अविनाश हे नाव बनावट नाव होते. नागपाडयात परत करण्यात आलेले पिस्तूल त्यांना साथीदारांनी दिलेले होते. त्याच पिस्तूलाच्या व इतर हत्यारांच्या साहाय्याने त्याने व त्याच्या साथीदाराने घाटकोपर (पूर्व) येथे टाईल्स व मार्बल विक्रेत्याचा त्याच्याच शोरूम मध्ये भरदिवसा खून केलेला होता. ते पिस्तूल त्या दिवशी परत देण्यास तो आला होता.

आरोपीस न्यायालयात हजर करून, त्याची पोलिस कोठडीत रिमांड घेण्यात आली होती. त्याच्याजवळच्या चिठ्ठी मधील स्थानिक फोनवर फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यास उलट उत्तर मिळत नव्हते. मी माझ्या वरिष्ठांना दुबई येथील क्रमांकावर फोन लावून बघण्याची परवानगी मागितली पण त्यांनी त्यास नकार दिला. दुबई येथे फोन लावून काहीच उपयोग होणार नाही हे त्यांचे म्हणणेही रास्त होते.

हत्यार परत घेण्यासाठी येणारी व्यक्ती रस्त्यावरच भेटणार होती आणि ती व्यक्तीही ‘अविनाश’ हेच नांव सांगणार होती. दोघांनीही एकच नांव सांगितल्यावर ओळख पटून हत्यार त्यांच्याकडे द्यायचे होते. थोडक्यात आमचा तपासच खुंटल्याप्रमाणे वाटत होते. आता पुढे तपास लागण्याची शक्यता नसल्याने स्थानिक क्रमांक जो चिठठीवर लिहिलेला सापडला होता. त्याचा शोध घेतला असता तो सुध्दा पानाच्या एका टपरीवरील क्रमांक असल्याचे आढळले. त्यामुळे तपासाची ती दिशाही बंद झाली होती. आता आमचा तपास पूर्ण करून घाटकोपर (पूर्व) येथील पो.ठाण्यात आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सांगावे असे सर्वांचेच मत झाले होते. दुसर्‍या दिवशी काही वृत्तपत्रात ह्या अटकेची ही बातमी प्रसारीत झाली होती. त्यादिवशीही इतर काहीच मार्गच नसल्याने मी माझ्या वरिष्ठांना दुबई येथे फोन लावून काहीतरी प्रयत्न करतो म्हणून परवानगी मागितली. इतर काहीच मार्ग नसल्याने वरिष्ठांनीही शेवटचा प्रयत्न करण्यास परवानगी दिली.

परवानगी मिळताच मी आरोपीस लॉकअप बाहेर काढून माझी योजना सांगितली व अनिल परबशी काय बोलायाचे आहे ते सांगितले. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली आम्ही आरोपीस एका फारशी वर्दळ नसलेल्या ISD सेंटरजवळ नेले. आरोपीने दुबई येथील नंबर लावला. संमातर फोनवर आम्ही सदर संभाषण व दुबई येथील बातचीत ऐकत होतो. दुबई येथे लावलेला फोन आण्णा ह्याने उचल्यावर आमच्या आरोपीने बोलण्यास सुरूवात केली. त्याने नाव सांगताच ”अरे तू तर पोलिसात जमा झालास ना”? आजच्या पेपरमध्ये बातमी आहे” आण्णा उदगारला. आरोपीला पढवून ठेवल्याप्रमाणे त्याने बोलण्यास सुरूवात केली. ”आण्णा, एरिया नवीन होता म्हणून मी वाडीतला एक मुलगा सोबत आणला होता. हत्यार त्याच्याजवळ ठेवले होते. त्याला टेमकर मोहल्यात पाठवून मी नाक्यावर उभा राहिलो. पोलिसांना टिप होती. त्यांनी त्याला उचलला. तो पोरगा ‘व्हाईट’ असल्याने (गुन्हेगारी जगातील नसल्याने) तो घाबरला आणि त्याचे नांव विचारल्यावर त्याने माझे नांव त्याचे नांव म्हणून सांगितले. पोलिसांनी त्याला हात टाकल्याबरोबर मी तेथून सटकलो. आण्णाचा आवाज साशंक होता. “मी आत्ता घाईत आहे, तू एक काम कर कोठेतरी लपून रहा आणि मला संध्याकाळी फोन कर!” आण्णाने आदेश दिला. अण्णा काहीतरी खात्री करून घेण्याचा प्रयत्न करेल, ह्याची जाणीव झाल्याने मी आरोपीस घरच्या जवळपास फोन असल्यास तेथे फोन करून आईला बोलावून घे आणि अण्णाला सांगितलेली हकीगत तिलाही सांग असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने आईला तो पकडला गेला नसल्याचे व मित्राकडे लपून बसला असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच त्याच्या आईवरील तणाव दूर झाल्याचे तिच्या आवाजावरूनही जाणवले. तिने त्याला सांभाळून रहाण्याबाबत सूचना दिल्या. देवावर भरवसा ठेव असे सांगून तिने फोन बंद केला.
फोन बंद करण्यापूर्वी त्याने आईला तो काही दिवसांसाठी मुंबई सोडून जाणार आहे व परिस्थिती शांत झाल्यावर परत येईन असे सांगितले.

* सदर लेखातील नावे काल्पनिक आहेत.

शोध अविनाशचा (भाग-२)

पोलिस दलातील कामाच्या सरावामुळे आणि विशेषत: गंभीर गुन्ह्यांच्या शोधाच्या सरावाने गुन्हेगार कोणत्या पध्दतीने विचार करतील याचा अंदाज करता येतो. माझ्या अंदाजाप्रमाणे अनिल परबने दुबई येथून फोन करून त्याच्या हस्तकापैकी एकाला अविनाशच्या घरी चौकशी करण्यास सांगितले. दुपारी तो अविनाशच्या घरी गेला व त्याने आईकडे चौकशी केली. अपेक्षेप्रमाणे अविनाशच्या आईने त्याला अविनाश मित्राकडे लपलेला आहे. पोलिस शोधत असल्याने तो मुंबई बाहेर जाणार आहे, आणि सर्व शांत झाल्यावर परत येईल असे सांगितले. संध्याकाळी आम्ही पुन्हा अविनाशला दुबई येथे फोन लावण्यास सांगितले. आईला सांगितलेली हकीगतच पुढे सुरू ठेवण्याचे ठरले होते व त्याप्रमाणे अविनाशला पढविण्यात आले होते. “आण्णा माझ्याकडे पैसे नाहीत थोडे पैसे मिळाले तर मी मुंबई बाहेर जाईन आणि २०-२५ दिवसांनी सर्व शांत झाले म्हणजे परत येईन”, असे अविनाशने सांगितले.
“मी तुला मुंबईमधील एक नंबर देतो, त्या नंबरवर फोन करून बिट्टूशेठसाठी विचार व शेठला सांग तुमचे कपडे आले आहेत डिलीव्हरी कुठे देऊ? तो जागा सांगेन तेथे तुला पैसे मिळतील”, अनिल परबने सुचना दिल्या.

आरोपी अविनाशला फोन करण्यासाठी वारंवार बाहेर काढणे धोक्याचे असल्याने दुसर्‍या दिवशी मीच अविनाश नावाने फोन करून बिट्टूशेठला डिलीव्हरीच्या जागेबाबत विचारले. “व्यापारी, हमे सेठने सब बताया है। तुम पिछले वक्त जहाँ डिलीव्हरी दिया था वहाँ कल दोपहर में आ जाना” असे बिट्टूशेठने सांगितले. एकंदरीत अनिल परब अद्यापही खात्री करून घेत होता हे माझ्या लक्षात आले. मी आरोपीला लॉकअप मधून बाहेर काढून त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरूवात केली. “आत्तापर्यंत किती वेळा पैसे मिळाले? ५-६ वेळा मिळाले आहेत. किती पैसे मिळतात. ५ ते १० हजार, कोण देतो? दरवेळी जागा वेगवेगळया असतात. शेवटचे पैसे कोठे मिळाले होते? मी धीर करून विचारले.
“ठाणा स्टेशनच्या पश्चिमेला स्टेशन बाहेर हॉटेल आहे तेथे मिळाले होते”, त्याने सांगितले.

माझ्या प्रयत्नांना यश येत होते. मी पुढच्या तपासाचा मार्ग स्पष्ट व्हावा यासाठी अविनाशला पुन्हा दूबई येथे फोन करून त्यांच्या टोळीचा स्थानिक म्होरक्यास भेटण्याची इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. वारंवार बाहेर पडणे शक्य नसल्याने दुसर्‍या दिवशी ठाण्याच्या जवळपासच भेटण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. अनिल परबने संध्याकाळी फोन करण्यास सांगितले व संध्याकाळी त्याचा स्थानिक म्होरक्या मुंलूड पश्चिम येथे वीणा नगर परिसरात भेटेल असे सांगून ‘टेली-लिंक’ नावाच्या कम्यूनिकेशन सेंटर जवळ थांबण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही दोन पंचासह आरोपीला घेऊन मुंलूंड पश्चिम येथे प्रयाण केले.

लाल बहादूर शास्त्री मार्गावरच एका छोटया गल्लीत वीणा नगर वसाहत व टेलीलिंक कम्यूनिकेशन सेंटर आहे. गल्लीत फारशी वर्दळ नसल्याने आम्ही अविनाशला दोन शिपायांसह एका दुकानात बसविले आणि मी व एक शिपाई दोन पंचासह टेलीलिंकच्या बाहेर असलेल्या आईसक्रीमपार्लर बाहेरच्या टेबलावर बसलो. इतर स्टाफला गल्लीच्या बाहेर जाण्यास सांगितले.

गल्लीबाहेर पाठविलेल्या पथकाने आम्हाला काहीही न सांगता परस्पर ठाण्याची जागा पाहण्याचे ठरविले व ते निघून गेले. गल्लीबाहेर मदतीला कोणीही नाही याची आम्हाला कल्पनाच नव्हती. संघटीत गन्हेगारीमधील आरोपी धोका टाळण्यासाठी कधीही वेळ ठरवून येत नाहीत, त्यामुळे वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. बर्‍याच वेळाने दुकानात बसवलेल्या अविनाशच्या चेहर्‍यावर अचानक सावध भाव उमटलेले दिसल्याने मी त्याच्या नजरेच्या रोखाने पाहिले. एक मजबुत बांध्याचा, व्यवस्थित कपडे केलेला तरूण गल्लीत शिरत होता. त्याच्या खाद्यांवर एक निळ्या रंगाची सॅक लटकवलेली दिसत होती. त्या तरूणाकडे इशारा करून अविनाश दुकानात आणखी आत सरकला. त्याच्यासोबत असलेल्या शिपायांनी तो दिसणार नाही अशा पध्दतीने त्याला कव्हर केले होते.

गल्लीत शिरलेला तरूण टेलीलिंक जवळ न थांबता गल्लीच्या आत पार दुसर्‍या टोकापर्यंत गेला त्याची भिरभिरती नजर शोधकपणे फिरत होती. माझ्याकडे पिस्तूल होते तरीही आपण तेथे थांबून नि:शस्त्र शिपायाला संशयीत तरूणास अडविण्यास सांगणे मला योग्य वाटत नव्हते. मी हळूच माझे पिस्तूल शिपायाकडे सरकवले आणि सावध रहाण्यास सांगितले. “मी त्याला अडवतो तो पळायला लागला किंवा माझ्यावर हल्ला केला तर तू गोळीबार कर” असे मी शिपायाला सांगितले. तो पर्यंत गल्लीच्या दुसर्‍या टोकाला गेलेला तरूण परतला आणि आमच्या समोरून पुन्हा शास्त्री मार्गाकडे वळाला. मी आणि संशयीत तरूणामध्ये सुमारे १५ फुट अंतर होते, म्हणजेच मी त्याच्याकडे धावलो तर त्याला शस्त्र काढून गोळीबार करण्याची संधी होती.

“ए, संजय” मी त्याला हाक मारली तो मागे वळाला पण माझा अनोळखी चेहरा पाहून त्याने “माझे नाव संजय नाही, संदिप आहे” असे उत्तर दिले. “अरे तू येथे मुलूंडलाच राहतोस ना?” मी पुन्हा विचारले. “नाही, मी जोगेश्वरीला राहतो”, तो उत्तरला. हे संभाषण सुरू असतांना तो थांबत होता व मी चालत होतो. त्यामुळे आमचे अंतर कमी झाले होते. त्याला हत्यार काढण्या इतपत संधी मिळणार नाही याची खात्री झाल्याने मी पुढे धावलो आणि त्याच्या खांद्यावरील सॅक खेचली. सॅक खेचताच त्याने ती घट्ट पकडलेली असल्याने त्याचा हात माझ्या पुढे आला व काही समजण्यापूर्वीच मी माझी स्वत:ची कोरियन बनावटीची हातकडी त्याच्या मनगटावर सरकवली. हातावर हातकडी पडताच त्याने झटापट करण्यास सुरूवात केली. मी त्याच्यावर नियंत्रण मिळवून त्याला शिपाई व पंच बसलेल्या टेबलच्या दिशेने खेचले. पिस्तूल रोखून उभ्या असलेल्या शिपांयाना पाहून तो तरूण थोडा थबकला. ताबडतोब मी त्याचा दुसरा हातही हातकडीत अडकवला. पंचासह त्याला शिपायांच्या मदतीने बाजूच्या दुकानात नेतानांच मी अविनाश सोबतचे शिपाई त्याला गल्ली बाहेर नेत असल्याची खात्री केली.

पंचासमक्ष झडती घेतली असता त्या तरूणाकडे कमरेवर शर्टखाली एक जर्मन बनावटी सात चेंबाचे व काडतुसांनी भरलेले रिव्हाल्वर सापडले. तसेच सॅकमध्ये ६ चेंबाचे ब्रिटीश बनावटीचे भरलेले रिव्हाल्वर आणि एका पिशवीत ९७ जिवंत काडतुसे सापडली. जागेवरच केलेल्या जुजबी चौकशीत तो तरूण अनिल परबच्या गँगमधील सुभाष माकडवाला उर्फ कुंची कर्वे यांचा खास सहाय्यक व माकडवाला मेल्यानंतर टोळीचा प्रमुख झालेला तरूण असल्याचे व खुनांच्या १० प्रकरणात हवा असलेला गुन्हेगार असल्याचे आढळले. आमचे झडतीचे काम सुरू असतानांच अविनाशसोबत असलेल्या शिपायांपैकी एकाने येऊन गल्लीबाहेर ठेवलेला स्टाफ जागेवर नव्हता व आताच ठाण्याच्या दिशेकडून परत आलेला असल्याचे सांगितले.

त्या स्टाफला थोडे कडक शब्दात समजावून आम्ही सर्व ठाण्याकडे रवाना झालो. आता स्टाफच्या ताब्यात दोन आरोपी झाले होते. ठाणे स्टेशनच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्येही एक शिपाई आणि पंचासह मी आंत शिरलो व अंर्तभागाची पहाणी ओसरत्या दृष्टीक्षेपात करून माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हॉटेलच्या मुख्य दरवाज्याकडे तोंड करून दरवाज्याजवळच्या टेबलापाशी बसलो. असे बसल्याने हॉटेलमध्ये शिरणारी प्रत्येक व्यक्ति तसेच दरवाज्याबाहेर रेगांळणार्‍या व्यक्ति आपल्या नजरेखाली रहातात.

थोडयावेळाने माझा एक सहकारी अधिकारी आत शिरला व माझ्या टेबलजवळ येऊन हलक्या आवाजात अविनाशला कोठे बसवायचे म्हणून विचारू लागला. आमच्यापासून थोडया अंतरावर असलेल्या टेबलावरील एक साधारण दिसणारा तरूण माझ्या सहकार्‍याच्या पायाकडे रोखून पहात होता. मी त्या अधिकार्‍याला माझ्या मागच्या टेबलाजवळ बसवावे असे सांगताच तो अधिकारी हॉटेलबाहेर गेला. तो अधिकारी बाहेर गेल्यावर बाजुच्या तरूणाने त्याचा रुमाल मुद्दाम खाली पाडून खाली वाकून आमच्या पायाकडे लक्ष दिले. आमच्या पैकी कोणाच्याच पायात पोलीसी लाल बुट न दिसल्याने तो थोडा निश्चित झाला असावा. तो पर्यंत वेटरने त्या तरूणाजवळ जाऊन ऑर्डरची विचारणा केली असता त्याने चहाची ऑर्डर दिली.

वेटर गेल्यावर तो तरूण इकडे तिकडे पहात असतानांच माझा सहकारी अधिकारी अविनाशला हाताला धरून हॉटेलमध्ये शिरला. अविनाश व त्याचा हात धरलेला माझा सहकारी यांच्याकडे लक्ष जाताच तो तरूण उठला व लगबगीने दरवाज्याकडे वळला. आमच्या पायाचे निरीक्षण करणे आणि चहाची ऑर्डर दिल्यावर चहा येण्यापूर्वीच बाहेर पडणे यामुळे माझा त्या तरूणावरील संशय खात्रीमध्ये बदलल्याने मी दरवाज्याकडे गेलो. तो पर्यंत तो तरूण समोरच्या स्टेशनकडे धावला परंतू त्याला बराच उशीर झाला होता. हॉटेल बाहेरील शिपाई त्याला पकडण्यास तत्पर होते. त्या तरूणाला पुन्हा हॉटलमध्ये आणून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ रू. ५०००/- च्या नोटा मिळाल्या. त्याने त्या अविनाशला देण्यासाठी शेठजीने दिलेल्या असल्याचे कबुल केल्याने त्यालाही अटक करण्यात आली. तीन आरोपींसह ठाण्याहून परत येतांनाच माहीमला जाऊन पैसे देणार्‍या शेठलाही अटक करण्यात आली. अविनाशच्या ताब्यात सापडलेल्या पहिल्या हंगेरिअन बनावटीच्या पिस्तूलाच्या प्रकरणाचा तपास मी करत असल्याने व त्या तपासातच हे सर्व आरोपी शस्त्रे, दारुगोळा व रोख रक्कम मिळालेली असल्याने मी स्वत: सरकार तर्फे फिर्यादी होऊन या सर्व आरोपी विरूध्द ‘टाडा’ या बहुचर्चित कायद्याखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला तरी मला या प्रकरणातील साखळीत खंड पडू देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळेच मी प्रथम अटक केलेल्या शेठला सांगून दूरध्वनीवरून अनिल परबला ‘डिलीव्हरी’ झाली असा निरोप देण्याची व्यवस्था केली.

अविनाशला पैसे मिळाले याची त्याला खात्री झालेली असतांनाच आम्ही संजय करवी पुन्हा फोन लावला. “अण्णा, मला अविनाश भेटला त्याला पैसे मिळाले आहेत. तो बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे काही ‘गेम’ करायचे असतील तर सांगा म्हणजे ते ‘गेम’ करून आम्ही दोघेही बाहेर जातो”, संजय म्हणाला. अनिल परबने त्याला दूरध्वनीवर त्याचा प्रतिस्पर्धी व सध्या बँकॉक परिसरात दडून बसलेल्या डॉन याचे सहकारी व त्यांना अर्थपुरवठा करणारे बांधकाम व्यावसायिक यांचा शोध घेऊन २ ते ४ कामे वाजवून मुंबई सोडा अशी सुचना दिली.

”अण्णा हत्यारांची व्यवस्था करा नां!”, संजयने विनंती केली. “अरे, अविनाश जवळचे हत्यार पोलिसांनी जमा केले, पण त्याच्याकडे आणखी एक आणि तुझी दोन हत्यारे आहेत ना!” अनिल बोलला. “अण्णा, अविनाश खूप घाबरलेला होता. जवळ हत्यार सापडले तर कोणीच वाचवू शकणार नाही म्हणूनच त्याने त्याच्याजवळचे दुसरे हत्यार खाडीत फेकले” संजयने सांगितले.

“अरे, त्याला काही अक्कल आहे की नाही? किमती हत्यारे फेकतो कशी? ठिक आहे, मी छोटयाशी (छोटा शकील)बोलतो आणि व्यवस्था करतो”, अनिल परबनी अश्वासन दिले.

पोलीस ठाण्यात परतताच मी अविनाशला “आणखी काही हत्याराची माहिती आहे का?” याबाबत विचारले. एक हत्यार लपविले आहे हे मान्य केले आणि दोन साक्षीदारांसमोर निवेदन देऊन भाईंदर येथे मावशीच्या घरी लपवून ठेवलेले अमेरीकन बनावटीचे पिस्तुल व ५ काडतुसे काढून दिली.

सुरुवातीच्या एका वाक्याच्या मोघम खबरीच्या आधारावर एवढा तपास होऊन एकूण चार विदेशी बनावटीची हत्यारे व चार आरोपी सापडल्याने वरिष्ठांनी माझी आणि माझ्या पथकाची पाठ थोपटली. यानंतर त्या तपासात पुढे टोळीच्या फाहेमा, नासिर, उमर आणि रफीक अश्या चार सदस्यांना अटक झाली परंतू दुर्देवाने आणखी हत्यारे मिळू शकली नाहीत. कारण माझ्या ‘टाडा’च्या गुन्ह्याबाबत पेपरमध्ये बातमी प्रसिध्द झाल्याने दुबई मधील मंडळी सावध झाली व माझी कबूली थंड पडली.

संजयकडे सापडलेली दोन्ही हत्यारे त्याच्या दहाही प्रकरणाशी शास्त्रीय पुराव्यांच्या अधारे जोडली गेली होती. अविनाशकडील पहिले हत्यार घाटकोपर (पूर्व) येथील गुन्ह्याशी जोडले गेले व भाईंदर येथून जप्त केलेले हत्यार एका हिंदूत्ववादी राजकीय पक्षाच्या आमदाराच्या खुनाशी जोडले गेले. त्यामुळे त्या प्रत्येक पोलीस ठाण्यांनी माझ्या आरोपींना न्यायालयामार्फत ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द दोषारोप पत्रे दाखल केली.

माझ्या टाडा प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात ‘टाडा’ कायद्याच्या गैरवापराबाबत बरीच ओरड झाल्याने प्रत्येक राज्य सरकारांनी उच्चस्तरीय समिती नेमल्या होत्या. अनेक प्रकरणांबाबत विचार करण्यासाठी सदर समितीने ठरविलेल्या निकषाप्रमाणे ज्या आरोपीकडे हत्यारे मिळालेली आहेत त्यांच्या विरूध्दची प्रकरणे कायम झाली. हत्यारे नसलेली आरोपी सुटल्याने माझ्या प्रकरणांनाही ठाण्यातून पकडलेला दिलीप, त्याच्याशेठ, नासिर, उमर, रफीक आणि फाहिम बाहेर पडले.

जेलमधून सुटल्यावर महिन्याभरात माहिम येथे गणपतीच्या दिवसात मांडवाजवळच एका कार्यकर्त्याचा चौघांनी खून केला. त्या प्रकरणात अटक व जामिन झाल्यावर त्यांच्यापैकी एकजण पळाला व तो आता कुप्रसिध्द गुन्हेगार झालेला आहे.

अविनाश व संजय यांच्यापैकी अविनाश वाट भरकटल्याने या सर्व गुन्हेगारीत अडकलेला असल्याची खात्री असल्याने मी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्याने माझ्याशी संपर्क साधला व तो सर्व गुन्हेगारी सोडणार असल्याने मी थोडी मदत केल्यावर तो अतिशय सामान्य जीवन जगतो आहे.

पूर्वी बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा अविनाश आता एका बांधकामावर वॉचमन म्हणून नोकरी करतो आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. गरीबीमध्ये पण समाधानाचे जीवन जगतो आहे.

बरीच वर्षे जेलमध्ये राहील्यानंतर संजय बाहेर पडला व नाहीसा झाला. त्यानंतर माहिती काढण्याचा प्रयत्त्न केला असता आता तो पश्चिम महाराष्ट्रात एका शहरात रिक्षा चालवतो आहे असे समजले.

– सुहास गोखले