मराठी कोश वाड्मय

भारतीय संस्कृतिकोश

‘भारतीय संस्कृतिकोश’ हा दहा खंडांचा कोश. हा कोश म्हणजे मराठी भाषेतील एक अपूर्व प्रकल्प आहे. प्रवचनकार, लघुकथाकार, साहित्यिक म्हणून प्रसिध्द असणा-या पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या पत्नी सौ. सुधाताई यांना गोवा मुक्ती लढयात बारा वर्षाची शिक्षा झाली. त्या वेळच्या मन:स्थितीत शास्त्रीबुवांनी या कोशाचे काम सुरु केले. त्यासाठी कोशाच्या मजकुराची पहिली प्रत त्यांनी एकटयाने हाताने लिहून काढली. मासिकाच्या आकाराची आठ हजार छापील पाने, एवढा हा कोश मोठा आहे. त्यासाठी शास्त्रीबुवांनी वहीची एक लाख पाने भरतील इतकी हस्तलिखिते तयार केली. पुढे या कामासाठी मंडळ स्थापन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारे, विद्यापीठे, संस्था यांच्या मदतीमुळे हे काम पूर्ण केले गेले. कोशकारांच्या हयातीत एवढे प्रचंड काम पूर्ण होणे ही विशेष गोष्ट मानली जाते.

सणवार, जात-जमाती, संत, भाषा, वाङ्मय, साहित्यिक, व्यक्ती अशा वेगवेळया प्रकारची माहिती या कोशात मिळते. तुकाराम. ज्ञानेश्वर, सावतामाळी असे संत किंवा मोरोपंत, मुक्तेश्वर, वामन पंडित असे कवी या पध्दतीने पाहिल्यास त्यांचे जीवनचरित्र, कार्य अशा प्रकारे माहिती त्यात मिळते. मात्र गाथा, शिवलीलामृत अशा ग्रंथाच्या नावाने शोध करण्याचा प्रयत्न करुन उपयोग होणार नाही. कारण ग्रंथाची महिती ग्रंथकाराच्या नोदींतच सापडते. त्यामुळे शिवलीलामृताचे लेखक श्रीधर आहेत एवढी माहिती आपल्याला हवी.

जाती-जमातींची किंवा विवाहपध्दतीची माहिती वाचली तर आश्चर्याचे धक्के बसतील. मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा ब-याच ठिकाणी असते. पण मावसबहीण, चुलत बहीण, बहीणीची मुलगी अशा वेगवेगळया नात्यात लग्न करण्याच्या पध्दती वेगवेगळया जातींत आढळतात. वेगवेगळया प्रांतांतील संतांची चरित्रे पहिली तर सा-या भारतातील संत वेगवेगळया भाषांत भक्तीचा आणि समतेचा एकच संदेश देत असल्याचे आढळेल. कोशाचा एक खंड घेतला आणि पाने उलटत गेले, तर कितीतरी नव्या नव्या गोष्टी समजू शकतील.

भारतीय संस्कृतिकोश इतक्या सोप्या भाषेत आहे, की तो संपूर्ण वाचणेही शक्य आहे. हा कोश पूर्ण झाला त्या वेळी एका हिंदी भाषक विद्वानाने ‘यापुढे ज्याला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल, त्याला मराठी भाषा शिकावीच लागेल.’ असे गौरवोद्गार काढले होते.

प्रकाशक – भारतीय संस्कृतिकोश मंडळ,४१० शनिवार पेठ, पुणे ४११ ०३० . फोन ४४५१९३९

प्रमुख संपादक – पंडित महादेवशास्त्री जोशी

एकूण खंड – १०

पृष्ठ संख्या – ८००

किंमत – रु. ३५० (एका खंडाची)

मिळण्याचे ठिकाण – भारतीय संस्कृतिकोश मंडळ,४१० शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०. फोन – ४४५१९३९
अनमोल प्रकाशन, १३६० शुक्रवार पेठ, पुणे ४११००२. फोन – ४४८७०११/४४९१६११

महाराष्ट्रीय ज्ञानकोश

आधुनिक कोशवाङमयातील मराठी भाषकांना अत्यंत अभिमान वाटावा, असा हा प्रकल्प डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तयार केला. डॉ. केतकर हे स्वत: अतिशय गाढे विद्वान, संशोधक आणि साहित्यिक होते. परदेशांत शिक्षण घेत असताना ते ज्या वेळी कोशांच्या कामाची माहिती घेत, त्यावेळी माहिती सांगणा-यांची समजूत त्यांना एखादा शब्दकोश करायचा असावा, अशी होई. त्यामुळे ‘आधी ज्ञानकोश करायचा आणि मग त्यातील शब्द घेऊन शब्दकोश करायचा’ असे ते सांगत. या कोशासाठी डॉ. केतकर यांनी स्वत: एक लिमिटेड कंपनी स्थापन केली होती आणि छापखानाही काढला होता.

त्या काळात अशा कामाला अनुदाने, सरकारी मदत अशा प्रकारे उत्तेजन नसल्याने त्यांना स्वत:ला खंड विकत फिरावे लागत असे. त्यात त्यांची ओढगस्त झाली, प्रकृती ढासळली आणि अकाली मृत्यू झाला. मात्र, कोशाचे काम पूर्ण झाल्याचे त्यांना स्वत:ला पाहायला मिळाले.

तेवीस खंडांच्या या कोशाचे मुख्य संपादक स्वत: डॉ. केतकर होते. शिवाय संपादकीय कार्यव्यवस्थापक, उपसंपादक, शाखासंपादक अशा अनेकांचे त्यांनी सहकार्य घेतले होते.

प्रकाशक – महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळ लिमिटेड, नागपूर, तर्फे श्रीधर व्यंकटेश केतकर, ८४१ सदाशिव पेठ, पुणे ४०० ०३०

प्रमुख संपादक – डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

एकूण खंड – २३

पृष्ठ संख्या – सुमारे २५० प्रत्येकी