उंचीने महाबळेश्वर पाठोपाठ महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ होय. समुद्रसपाटीपासून ११४३ मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. राज्यातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे विकसित न झाल्याने हे स्थान केवळ उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांचेच विशेष आकर्षण आहे. तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे (खानदेशच्या जनतेच्या आवडीचे सापुतारा हे स्थळ गुजरात राज्यात येते.) जवळपास कुठल्याही शहराचा आणि वर्दळीचा अभाव या कारणांनी तोरणमाळने आपले नैसर्गिक सौंदर्य जपले आहे.
तोरणमाळ येथील प्रमुख आकर्षण
१) सात पायरीचा घाट – घाट चढून गेल्यावर शेवटच्या उंच टोकावरून रस्त्याकडे पाहिल्यास एका खाली एक सात पायऱ्या दिसतात. हा घाट तोरणमाळ पासून ४ किमी आधी सुरु होतो. सात पायरी घाटाच्या पायथ्याशी काळा पाणी नावाचा पहाड आहे. गंभीर गुन्हे केलेल्या कैद्यांना इंग्रज या पहाडावरून लोटून देत असत. तोरणमाळ माथ्याच्या सुरुवातीलाच असलेल्या एका गुहेत अर्जुनाची आदि मानवाच्या अवस्थेतील मूर्ती आहे म्हणून त्याला नागार्जुनाची गुहा असेही म्हणतात.
२) सिताखाई पॉइंट (सिता गुफा) –
तोरणमाळच्या ईशान्य भागात सिताखाई पॉइंट आहे. प्रचलित आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र सितेसोबत या भागातून जात असताना या ठिकाणी रथ अडकून गुफा तयार झाली. येथे रथाच्या दोन चाकांची तसेच घोड्याच्या खुरांच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात. भौगोलिकदृष्ट्या ही गुफा पाषाण आणि उंच सुळक्यांनी वेढलेली आहे. सीतेला तहान लागली असता प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीच्या पोटात बाण मारून भूगर्भातील जल बाहेर काढले. ते स्थळ आज सिताकुंड म्हणून ओळखले जाते. सिताखाई धबधब्यातून वाहणारे पाणी पुढे सरकल नदीला जाऊन मिळते. पुढे ही नदी नर्मदेस मिळते.
३) यशवंत तलाव – वर्षातील बाराही महिने पाणी असणाऱ्या तोरणमाळ मधील या तलावाची मोहिनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री अशावंतराव चव्हाण यांच्यावरही पडली होती. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ पासून या तलावाचे यशवंत तलाव असे नाव नामकरण झाले. या तलावाचे मूळ नाव अज्ञात आहे. या ठिकाणी बोटिंगची सोय उपलब्ध आहे. तलावातील पाणी पुढे सिताखाईच्या धबधब्याला जाऊन मिळते.
गोरक्षनाथ मंदिर, खडकी पॉइंट, पुरातन किल्ला हे स्थळ, सूर्योदय आणि सूर्यास्थाचे विलोभनीय दृश्य ही तोरणमाळची इतर वैशिष्ट्ये आहेत.
गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये वसलेले हिलस्टेशन म्हणजे ‘सापुतारा’. सापुतारा समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचीवर आहे. शुध्द आणि थंड हवा असल्याने पर्यटक येथे उन्हाळ्यात गर्दी करतात.
नाशिकहून सापुता-याला जातांना वळवळांचा, घाटाचा रस्ता असल्याने मजा येते. सापुतारा सर्कल वरून थोडं चालत गेल्यास गांधी शिखर लागते येथे सनसेट पॉईंट आहे. इथून दिसणारा सूर्यास्त एक अविस्मरणीय अनुभव आहे. सूर्योदय पाहण्यासाठी लोकं आवर्जून सरदार शिखरावर जातात. खो-याच्या मध्यवर्ती भागात टेकड्यांनी वेढलेला ७० फुट खोल तलाव येथील आकर्षण आहे. या तलावात बोटिंग करण्याचा आनंद ही पर्यटकांना घेता येतो. डांग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लोकांची जीवनशैली, परंपरा, दाग-दागिने, संगीत-वाद्ये, घरे अशी संस्कृती जपणारे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. विविध गुलाबाची फुले असलेले रोझ गार्डन तसेच पाय-यांची रचना असलेले स्टेप गार्डन ही पाहण्यासारखे आहे. ऋतभरा विश्वविद्यालयापुढे असलेल्या एको पॉईंच्या पठारावर खेळायला मजा येते. जातांना वाटेत तुम्हाला भरपूर लालचुटूक स्ट्रॉबेरीज खायला मिळतात.
कसे जाल?
नाशिक ते सापुतारा हे अंतर साधारण ७७ कि. मी आहे. नाशिकहून दिंडोरी – वणी – बोरगाव मार्गे २ तासात सापुता-याला पोहोचता येते. तेथे बसेसची सोय आहे तसेच खाजगी वाहनाने ही जाता येते.