सखी

संगोपन

आनंद निकेतन ‘प्रयोग’ शाळा

‘आनंद निकेतन’ ही नाशिक मधील प्रयोगशील शाळा साचेबध्द शिक्षणापेक्षा वेगळ्या वाटा अवलंबवत आहे. शाळेच्या ताईंनी केलेले वेगळे शैक्षणिक प्रयोग, मुलं समजून घेतांना आलेले वेगळे अनुभव त्यांनी वाचकांसाठी दिले आहेत. ही शैक्षणिक चळवळ फक्त त्यांच्या शाळेपूर्तीच मर्यादीत न राहता प्रत्येक पालक आणि शिक्षकापर्यंत पोहोचावी म्हणून ही धडपड.

कविता म्हणावी आपुली!

Anandniketan School जून आला. शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले. मुलांनी नवीकोरी पुस्तके आणली असतील. ती हाताळताना मुले काय करतात, हे तुम्ही पाहिले आहे का? मुले सर्वप्रथम भाषेच्या पुस्तकातले धडे पाहतात. गोष्टीरूप गद्य, चित्रे जास्त आकर्षक वाटतात आणि शेवटी लक्ष जाते कविता अथवा पद्याकडे! हा अनुभव सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत सामान्यत: आढळून येतो. कवितेतील तांत्रिकता, शब्दांच्या कसरती आणि अर्थ जाणण्यासाठी करावी लागणारी धडपड हे सर्व ‘धडा आधी आणि कविता नंतर’ या मनोवृत्तीला कारणीभूत होत असेल. मुलांना कविता आपलीशी वाटावी, कवितेतली गंमत त्यांनी समजून घ्यावी, कवितेबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतात. मग मात्र मुलांना त्यातील गंमत आवडायला लागते. त्यासाठी आधी शिक्षकाला कवितेकडे डोळसपणे बघावे लागते. कवितेचे मर्म जाणून ते मुलांपर्यंत पोचवावे लागते.

छोटय़ा कविता, बडबडगीते अगदी जन्मापासून मुलांच्या कानावर पडत असतात. आमच्या बालवाडीतही ताई मुलांना गाणी-कविता शिकवतात. मुले हावभावासहित ताईंबरोबर या कविता तालासुरात म्हणतात. कविता म्हणताना नाचतात. पहिलीत गेल्यावर पाठय़पुस्तकात कविता असतातच. त्याशिवाय शाळेत जाणीवपूर्वक निवडलेली कवितांची पुस्तकेही मुलांना हाताळायला मिळतात. ताई वेगवेगळ्या कविता मुलांना वाचून दाखवतात. शांता शेळके, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, अनंत भावे, नीलिमा गुंडी अशी अनेक नावे पहिली-दुसरीपासूनच त्यांच्या कानावर पडतात.
तिसरीच्या पाठय़पुस्तकात यमक जुळवण्याचा खेळ आहे. त्यासाठी कवितेच्या ओळींतील शेवटचे शब्द कसे जुळवलेले आहेत, हे मुलांच्या लक्षात आणून देतो. मग मुलेही जुळणारे शब्द शोधायला लागतात. त्यांची वाक्ये बनवून सुरुवातीला निर्थक कविता करतात. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी काही संबंध नसतो, पण त्याही गमतीदार असतात. आता हेच बघा ना-
तिसरीतल्या नुवेशने-
मुंगीताई, मुंगीताई,
मला चालायला शिकव बाई

अशी मुंगीकडून वेगळी कृती शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर विराजने
झाडदादा झाडदादा, फिरायला जाऊ
भेळभत्ता मजेत खाऊ

असे म्हणून झाडाशी संवाद साधला आहे. मुलांच्या मनातील इच्छा, भावनाही अशा प्रकरे व्यक्त होताना दिसतात. अशा कवितांचे पीक संपले की, ताई सर्वानी मिळून कविता करायला सांगतात. त्यात सगळेच ओळी सुचवतात, पण तेच निवडही करतात. यातून कवितेत थोडा थोडा अर्थ भरायला लागतो.
एकदा तिसरीत विंदांची ‘एटू लोकांचा देश’ ही कविता वाचून दाखवल्यानंतर सर्वानी मिळून अशी कविता केली.
एटू घालतात कपडे लोकरी,
ढील संपला की संपते चक्री
एटूंची भरते आकाशात शाळा
ताई म्हणतात शिस्त पाळा
एटूंचे असते उडते घर
म्हणून भरावा लागत नाही कर.

कल्पनाविस्तार आणि शब्दरचनेचे काम आम्ही मुलांकडे सोपवतो. प्रोत्साहनाबरोबरच कवितेसाठी अनुभव निर्माण करतो. मुलेही आनंदाने आणि कुतूहलाने उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. सर्वानाच चांगल्या कविता करणे जमते असे नाही, पण त्या करण्यातील उत्साह, प्रयत्न, धडपड मात्र अनोखी असते आणि मला कविता करता येते, या भावनेनेच स्वत:वर खूश होतात.
मोठय़ा गोगलगायीचे निरीक्षण करून दुसरीच्या मुलांनी केलेल्या या कविता बघा.
गोगलगाय, गोगलगाय
गुणी गुणी गोगलगाय
तुला शिंग कसे काय?
देवाने दिले पोटातपाय,
पाठीवरती घर घेऊन चाललीस काय?
नावात तुझ्या गाय,
पण तू दूध देत नाय,
पावसाळ्यात येतेस काय?
खाते तू काय, कळलेच नाय!

चौथीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘खार’ ही कविता शिकताना मुलांना त्यांच्या आवडीच्या प्राणी किंवा पक्ष्यांवर कविता करायला सांगितल्या. कवितेत खारीचं वर्णन, तिचे गुण, तिच्याबद्दल आलेली विशेषणं यावर बोलणं झालं. ‘खारीचा वाटा उचलणे’ हा वाक्प्रचार कशावरून आला, खारीच्या पाठीवरील पट्टे यावरही मुलांशी बोलले होते. आता मुलांनी त्यांना आवडतील, सोप्या वाटतील अशा प्राण्यांवर कविता केल्या. त्यापैकीच ओंकारची ही कविता-
पळा पळा वाघ आला, वाघ आला.
वाघ एका घरामध्ये घुसून बसला.
वाघाने नाशिककरांची धूळधाण उडवली.
नाशिककरांनी इंगा दाखवला, वृक्ष कापायला सुरुवात केली.
वाघाने चिडून नर्सरीतली झाडं चोरून लावली जंगलात
नाशिककरांनी थकून केला जंगलाचा जीर्णोद्धार.

टी.व्ही.वरील बातम्या, घरातील चर्चा, स्थानिक घटना, बातम्या यातील अनुभवविश्व ओंकारच्या कवितेत डोकावले. मध्यंतरी नाशिकमध्ये एक बिबटय़ा मानवी वस्तीत आला होता. त्याचा घरात होणारा मुक्त संचार टी. व्ही.वर दाखवला होता. त्याला पकडताना झालेला त्रास, तो मानवी वस्तीत का आला, त्यावर उपाय कोणते या सर्व गोष्टी ओंकारने कवितेत मांडल्या. माणसाने काही केले नाही तर वाघच काहीतरी उपाय शोधेल, हेही त्याने कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. घरातील गप्पा, अभ्यासक्रमात शिकलेले धूळधाण, जीर्णोद्धारसारख्या शब्दांचा छान वापर त्याने कवितेत केलेला दिसतो.

प्रभंजनने त्याच्या कुत्र्यावरील कवितेत त्यांच्या वेगवेगळ्या जातींचा, वैशिष्टय़ांचा उल्लेख केला. घरी कुत्रा पाळण्याआधी झालेली कुत्र्यांच्या जातींची चर्चा त्याला कविता करताना आठवली. हृषीकेशने झुरळावर केलेल्या कवितेत छान लय पकडली.
कळ्यांकळ्यांतूनी फुलाफुलातूनी
नाचते फुलपाखरू,
कीटकांचा राजा जणू असे हे फुलपाखरू

अशी फुलपाखरावर कविता लिहिणारी ओवी कवितेखाली स्वत:चे नाव लिहिण्याआधी कवयित्री असा उल्लेख आवर्जून करते. काही मुले कवितेलाच आपले अभिव्यक्तीचे माध्यम बनवतात. या कवितांमधून मुलांनी केलेले निरीक्षण, त्यांना जाणवलेले प्रश्न डोकावतात. अशा पद्धतीने आपले प्रश्न, आपले निरीक्षण पद्यरचनेतून मांडले ही भाषाशिक्षणाची एक महत्त्वाची पायरी आहे.

एकदा चौथीच्या मुलांना कविता करण्यातून तुम्ही आणखी काय काय शिकलात, असं सहजच विचारलं. मुले त्यावर फार बोलतील असं वाटलं नव्हतं, पण त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या, उत्स्फूर्त, स्तिमित करणाऱ्या होत्या.

निनाद- आता आम्हीच कविता करायला लागल्यामुळे मोठेपणी अवघड कविता समजायला लागतील.
सायली- मन रमवण्यासाठी आम्ही कविता करू शकतो.
प्रभंजन- आपल्याला मोठय़ा माणसांना एखादी गोष्ट सांगायची असेल व नंतर ते रागावतील, असे वाटले तर कविता करून ती त्यांना वाचायला देता येईल.
सृष्टी- प्रवास करताना आम्हाला एखादी कविता सुचेल.
स्वप्निल- इतरांच्या कविता वाचल्यावर नवीन शब्दही कळतात.
ओवी- एखाद्या विषयावरची कविता करताना त्याबद्दलची माहिती गोळा करावी लागते. मेंदूला ताण द्यावा लागतो.
.. अशा प्रतिक्रिया आल्या.

एक भाषिक खेळ म्हणून सुरुवात केलेला हा कवितेचा खेळ मुलांच्या मनाची दारे हळूवारपणे उघडतो. मुलांच्या आवडीनिवडी, अपेक्षा, मते, त्यांचे अनुभवविश्व, भावविश्व मुलांच्या कवितेत दिसू लागते. मुले कविता अधिक जाणिवेने वाचतात. कवितेतल्या खाचाखोचा, गमतीजमती त्यांना न सांगता समजू लागतात. सगळी मुले पुढे जाऊन कविता करतीलच, असे नाही. पण या शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेचं साधन म्हणून ‘आपण केलेल्या कविता’ मुलांना बरंच काही शिकवून जातात. शिवाय कविता केली नाही तरी वाचायची, ऐकायची, आस्वाद घ्यायची तरी गोडी लागते. सातवीत जाईपर्यंत विंदांच्या कवितेतल्या पिशीमावशीचे एकटेपण त्यांना जाणवते आणि मुले अंतर्मुख होतात. कवितेला विषयाचे बंधन राहत नाही. भाषा हा विषय अनेक अभ्यासविषयांशी व जीवनातील विविध बाबींशी सहजपणे जोडला जातो.

आपल्या मुलांनीही छान छान कविता कराव्यात, शब्दांशी खेळावं, आपल्या आठवणीतल्या कविता त्यांनाही आपल्याशा वाटाव्यात असे नक्कीच आपल्यालाही वाटत असणार. त्यासाठी काय करावे लागेल? थोडासा वेळ काढावा लागेल. भरपूर, वेगवेगळ्या कविता त्यांना म्हणून दाखवता येतील. कवितांची पुस्तके त्यांच्यासाठी आवर्जून विकत आणता येतील. बोलता-बोलता जुळणाऱ्या यमकाकडे जाणीवपूर्वक त्यांचे लक्ष वेधून घेता येईल. अशा अनेक गोष्टी घरबसल्या सहज करता येतील.

– सुजाता सावळे
“Shala Ek Maajaa”

आपल्या मुलांसाठी शाळा निवडण्यापूर्वी तुम्ही हे समजून घ्यायलाच हवं!