खरे तर जन्माला मुलगी येणार की मुलगा येणार, गर्भाशयात वाढणारा गर्भ स्त्रीरुप धारण करणार की पुरुष रुप धारण करणार याचे रहस्य शुक्रजंतूंमधील एका विशिष्ट गुणसूत्रात दडलेले असते. त्याला लिंगदर्शक गुणसूत्र म्हणातात. म्हणजे या गोष्टीला पूर्णपणे पुरूष जबाबदार असतो. पण स्त्रीला दोषी ठरवले जाते व तिचा अनन्वित छळ केला जातो. अशी समाजात अनेक उदाहरणे दिसून येतात. शुक्रजंतूतील लिंग दर्शक गुणसूत्र आखूड असल्यास त्याला “Y” गुणसूत्र म्हणतात व ते लांब असल्यास त्याला “X” गुणसूत्र म्हणतात. बीजांडाशी संयोग पावणा-या शुक्रजंतूंत “X” गुणसूत्र असल्यास मुलगी होते तर बीजांडाशी संयोग पावणा-या शुक्रजंतूंत “Y” गुणसूत्र असल्यास मुलगा होतो. शूक्रजंतू व बीजांड या पूर्णपेशी नसून अर्धपेशी असतात. कारण शुक्रजंतू व बीजांडात इतर पेशीप्रमाणे ४६ गुणसुत्रे नसून २३ गुणसूत्रे असतात. शुक्रजंतू व बीजांड यांच्या मिलनाने जे गर्भबीज तयार होते ते मात्र पूर्णपेशी असते. कारण त्यात शुक्रजंतूमधील २३ व बीजांडामधील २३ अशी ४६ गुणसुत्रे असतात. बीजांडामधील २३ गुणसुत्रांपैकी एक गुणसूत्र लिंगदर्शक असते व ते नेहमीच “X” प्रकारचे असते. या गुणसूत्राची शुक्रजंतूमधील गुणसूत्राशी जोडी जमते. (मुलगा व मुलगी दोघे सामान आहेत)
जर शुक्रजंतूतील गुणसूत्र “X” प्रकारचे असेल तर फलित अंडातील जोडी “XX” लिंगदर्शक प्रकारची बनते. म्हणजेच मुलीचा गर्भ बनतो. जर शुक्रजंतूतील गुणसूत्र “Y” प्रकारचे असेल तर फलित अंडातील लिंगदर्शक जोडी “XY” प्रकारची बनते म्हणजेच मुलाचा गर्भ तयार होतो. एकंदरीत, यावरून असे दिसून येते की, गर्भाचे लिंग स्त्रीच्या बीजांडामुळे ठरत नाही तर ते पुरुषाच्या शुक्रजंतूमुळे ठरते. बीजांडाशी संयोग पावणा-या शुक्रजंतूची निवड करणे हे माणसाच्या हातात नसते. म्हणूनच माणसाची इच्छा काहीही असो, मुलगा किंवा मुलगी होणे त्याच्या हातात नाही. (येणाऱ्या बाळाचे लिंग ठरण्यास त्याची आई जबाबदार नसून पिता जबाबदार असतो)