गिर्यारोहण

शिवकालीन हरिश्चंद्रगड

निसर्गाशी नातं जोडणारा शिवकालीन हरिश्चंद्रगड

Harishgad सह्याद्रीच्या माथ्यावर असलेला हरिश्चंद्रगड प्रत्येक ऋतू आपल्या सौंदर्याची सप्तरंगी रूपे घेऊन येत असतो. मुसळधार पावसात हिरव्यागार फुलांनी बहरलेल्या हरिश्चंद्रगडावर कित्येक धबधबे कोसळतात. फुलांनी, हिरव्या झाडाझुडपांनी बहरलेल्या आणि प्राचीन शिल्पकलेचे सौंदर्य जोपासलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर आल्यावर निसर्गाशी नातं जुळतं. पूर्वेकडे घनदाट जंगलांनी व्यापलेले सह्याद्रीचे उंच कडे आणि पश्चिम उत्तरेकडे पसरलेला अथांग सागर असं निसर्गसौंदर्य लाभलेलं हे स्थान आहे. संगमनेर, कोथळा बस ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी जाते. कोथूळपासून पुढे गेलं की, हिरवी शाल पांघरलेली उंच-उंच झाडे पर्यटकांचं स्वागत करतात.

गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर विस्तिर्ण, सपाट, घनदाट सदरहित झाडांनी वाढलेली तीन शिखरे येथे आहेत. पैकी एक शिखर तारामातीच्या पोटाशी आहे. नऊ ब्राम्हणी लेणी आणि इतर दोन शिखरांना हरिश्चंद्र, रोहिदास नावाने ओळखले जाते. हेमाडपंथी बांधणीच्या सप्ततीर्थात असलेल्या मंदिरामध्ये चौदा विष्णुमूर्ती, पश्चिमेकडून मंगळगंगेचा वाहणारा प्रवाह आणि त्यालगतचा सुमारे आठव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. येथील निसर्गसुंदर शिवस्थाने, गुंफा प्रेक्षणीय आहे.

चांगदेवांनी सन १२४७ मध्ये आपल्या शिष्यांसमवेत येथे वास्तव्य करून तत्वसाराची निर्मिती केली. तारामती शिखरावर एक राऊळ आहे. या गडाच्या कुंडांना एकूण ११ गुहा आहेत. गुहांच्या समोरच सपाट भागात तीर्थमंदिर आणि शिवालये यांचे दर्शन घडते. शिवालय आणि शिवालयाखाली एका खोलवर असलेल्या खडकात कोरलेल्या गुहा हे येथील वैशिष्ट्य ठरल्याने पर्यटकांची मनं वेधून घेतात. मंदिराच्या उत्तरेस मंगळगंगेच्या प्रवाहास लागून असलेले केदारेश्वराचे मंदिर नेहमी पाण्यातच असते. येथील शिवलिंगापर्यंत पोहोचायचं म्हटलं की, तारेवरची कसरत करत कमरेइतक्या थंड पाण्यातून जावं लागतं. हिवाळ्यातील थंडी आणि दाट धुके यांचा संगम या गडावर काही काळ पहावयास मिळतो. याचा अनुभव घेण्यासाठी कित्येक पर्यटकांची येथे गर्दी होते. गुलाबी थंडी या मोसमात अनुभवास येते. येथील गुहा पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या असतात. इथले पाणी प्यायल्यानंतर या पाण्याला एवढा गोडवा असला तरी कोठून ? हा प्रश्न पर्यटकांना कोड्यात टाकतो. शिवालयाच्या बाहेरच्या बाजूस एक औरस-चौरस शिवालय आहे. सुमारे ४० फुट रुंदी आणि ४० फुट लांबी असलेले हे शिवालय आहे. येथील गुहेत मध्यावर सारख्या अंतरावर ठिकठिकाणी चार कोरीव स्तंभ आहेत. या स्तंभानजीकच सात फुट रुंद आणि ९ फुट लांब अशी महादेवाची पिंड आहे. गुहेत दर्शनासाठी पावसाळ्यात पिंडीपर्यंत पोहत जाऊनही पर्यटक आनंद लुटतात.

हरिश्चंद्रगडावर मंदिराच्या आवारात एकूण आठ शिलालेख आहेत. यावरून चांगदेव या ठिकाणी वास्तव्यात राहत असल्याचे दिसते. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर दोन लेख, केदारेश्वर लेण्यांच्या मध्यखांबावर एक, हरिश्चंद्र मंदिराच्या मागील लेण्याच्या दोन दर्शनी खांबांपैकी डाव्या खांबावर एक, मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या गणपतीच्या माथ्यावर ‘श्री दक्षिणनाथ भासिस सकपनाथ’ याप्रमाणे आहे. या शिलालेखांकडे सर्वप्रथम ई सिक्लेश्वर, जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी टिपणे केली होती. मात्र त्यांना त्याचे वाचन करता आले नाही. नंतर गो.नी.दांडेकर यांनी त्याचे वाचन केले. यातच आनंद पाळंदे, रा.चिं ढेरे, राजेश्वर गोस्वामी, कोलते या संशोधकांनीही त्यावर संशोधन केल्याने येथील शिलालेखाच्या निसर्गलेण्याने या परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. हरिश्चंद्रगडाचे कोकणकडा हे वैशिष्ट्य ठरले आहे. या कोकणकड्यावरून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडते, तर ठाणे जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य फुलून आलेल्र दिसते.

हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम’ असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत. या मंदिर परीसारातील बहुतेक गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य असे आहे. मंदिराच्या मागे असणा-या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथ-यात जमिनीत खाली एक खोली आहे असून त्यावर शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केल्याचे गावकरी सांगतात.

Harishgad हरिश्चंद्रगड पूर्ण पहायचा असल्यास किमान दोन दिवसांचा निवांत वेळ असायला हवा. गडाचा घेरा खूपच मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातूनही एक वाट आहे. यासाठी मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटी या गावी यावे. तेथून अकोले मार्गावरील राजूर येथे उतरावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर-पाचनई अशी एंस टी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. एवढे आहे. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून गड चढून जायला साधारणपणे ३ तास लागतात. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, पाचनई, मूळा नदीच्या खो-यातून, ही वाट टोलारखिंडीत पोहचते. मात्र येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात सहज पोहचता येते. तसेच खिरेश्वर मार्गे ४ तास लागतात. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाजापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घ्यावे. कारण पुढे वाटेत कुठेही पाणी नसते.

या गडावर राजा हरिश्चंद्राने काही काळ तपश्चर्या केली, असेही म्हटले जाते. पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरलेला कोकणकडा निसर्गरम्य आहे. या कड्याची मुंबईच्या पर्यटकांनी १९८५ साली १ वर्ष ३ महिने अथक परिश्रम करून चढाई केली होती. इथे हिरव्यागार रंगाच्या छटा सर्वत्र दिसतात. खळखळणारे झ-यांचे पाणी आणि धबधबे पाहून मन प्रसन्न होते. कोकणकडा पाहून मंदिराच्या पश्चिमेस सुमारे २ कि.मी. अंतरावर निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहून मन मोहून जाते. पश्चिमेकडून वारा आला तर कड्याखाली टाकलेले कोणतीही वस्तू (उदा. टोपी, चेंडू, गवताची पेंडी) पुन्हा तेवढ्याच वेगाने दरीतून वर येते. मे-जूनच्या दरम्यान पश्चिमेकडून धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असल्याने येथे वर्तुळाकार सप्तरंगी इंद्रधनुष्य दिवसभर पाहावयास मिळते.

इंद्रधनुष्य दिसण्याची प्रथम नोंद हा किल्ला १८३५ मध्ये जिंकनाणा-या कर्नल साइक्सने केली. मे १९१८ हा गड त्याने काबीज केला आणि कॅप्टन मॅकिटॉशने गडाचे बरेचसे बांधकाम उद्ध्वस्त केले. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४,६९१ मीटर इतकी आहे.

हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी जाताना कोथळे गावापासून नयनरम्य दृश्ये नजरेत सामावून घेत, गड चढता-चढता, धो-धो वाहणा-या धबधब्यांचा व निर्सगाचा आनंद घेत आपण गडावर कधी येऊन पोहोचतो ते कळत नाही. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याजवळ गेल्यानंतर दोन्हीकडच्या गगनचुंबी कड्यांवरून कोसळणारे धबधबे थांबायला भाग पाडतात. काही धबधब्यांखाली भिजल्याशिवाय अनेक निसर्गपर्यटक आपली पाऊले पुढे टाकतच नाही. यासाठी मात्र पावसाळ्यात सफर करावी लागेल.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग : हरिश्चंद्राची रांग

जिल्हा : अहमदनगर

श्रेणी : मध्यम

राहण्याची सोय : गडावर हरिश्चंद्रेश्र्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा आणि आजुबाजूच्या गुहेत राहता येते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे. शिवाय पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. Location Icon