मुक्तांगण फूडस

फूड जंक्शन

Foods Junction“हा घास चिऊचा, तो घास काऊचा” असे म्हणत तासनतास आपल्या बाळाला भरवणारी आई मनातून खरंतर वैतागलेली असते. तरी आपला संयम ठेवून सगळ्या प्रकारचे पौष्टीक अन्न बाळाला कसे देता येईल ह्याच चिंतेत रोज असते. दिल्लीच्या स्मिता श्रीवास्तवाने ह्यावर छान उपाय शोधला. आपल्या पाच वर्षाच्या ’नंदिका’साठी रोजच्या जेवणात कार्टून्स, आगगाडी, क्रिसमस ट्री, पतंग, मोर… आणले. स्मिताची ही पदार्थ मांडणीची कल्पकता तिने http://littlefoodjunction.blogspot.com ह्या ब्लॉगवर वाचकांशी शेअर केली आहेत. ह्या ब्लॉगवर स्मिताने फळ, भाज्या, भात, ब्रेड मिल्क शेक्स ह्यांची मांडणी कल्पकतेने कशी करायची, हे फोटो आणि त्याखालिल माहितीच्या रुपाने वाचकांना व्यवस्थित समजावून सांगितली आहे. नमुन्या दाखल स्मिता म्हणते दिवसभराच्या कामानंतर मुलीला आईच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी ‘खास’ रात्रीच्या जेवणात पाहिजे असते तेव्हा स्मिता तिला पपई आणि स्ट्रॉबेरीचे मनीमाऊचा चेहरा असणारे पिवळे आणि गुलाबी रंगाचे ‘योगर्ट शेक्स’ करुन देते.

सॅन्डवीचचे तर अनंत प्रकार स्मिताने केले आहेत जसे प्राणी संग्रहालय, पतंग, सूर्य, कार्टून्स, सॅन्टा, क्रिसमस ट्री, ट्रॅफिक सिग्नल… प्रत्येकवेळेला गाजर, ढोबळी मिरची, कोबी, बीट, ऑलिव्ह, अननस, सफरचंद वगैरे भाज्या आणि फळांचा वापर कल्पकतेने केला आहे. ब्लॉगवरची ही चित्र पाहिल्यावर स्मिता म्हणते तसे खरोखरच Little Pricky Eaters साठी हा अत्यंत उपयुक्त ब्लॉग आहे.

फ्रायडे लंच बॉक्स

http://fridaylunchbox.blogspot.com हा चेन्नईच्या ’दुराई’ ह्या बाबांचा ब्लॉग आहे. सात आणि चार वर्षांच्या मुलांसाठी बाबाचे हे वेगवेगळे प्रयोग आहेत. बाबाची मुलगी जेवायला खूपच त्रास देते त्यामुळे ह्या बाबानी डब्यात डोसा वेगवेगळ्या आकारात द्यायला सुरुवात केली जसे फॅन, आंबा, झाड, ट्रॅफिक सिग्नल, बस, क्रिसमस ट्री, ब्रश, असे अनेक वैशिष्टयपूर्ण डोसा आकार अनुभवायला मिळतात. कौतूकाची गोष्ट म्हणजे ह्या ब्लॉगवरुन इतर आयाही खूप टीप्स मिळवत असतात. आपल्या बाबांचाच आदर्श पुढे चालवत दुराईच्या मुलाने, साईश्रीने http://kiranjayandkids.blogspot.com हा ब्लॉग चालू केला आहे. ब्लॉगवर त्याने कॉफी, नूडल्स, लॉलीपॉप्स, फ्रूट सलाड असे सोप्पे पदार्थ दिले आहेत. फारसा अपडेटेड नसला तरी मुलांनी जरुर बघावा असा ब्लॉग आहे.

इंटरनेटवर रेसिपीजचे अनेक ब्लॉग्ज आहेत परंतु पदार्थ आणि कलात्मकता ह्याची सांगड घालणारे हे ब्लॉग्ज आपल्याला रोजच्या जेवणाकडे बघण्याची वेगळी दृष्टि देतात. चित्रांत दाखल्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे प्राण्यांच्या आकाराचे सॅण्डवीच करता येतील-

साहित्य – ब्रेड स्लाईस, चीज स्लाईसेस, गाजर आणि काकडी गोल चिरुन, ऑलिव्ह्ची फळे, टोमॅटो सॉस

कृती – वरील साहित्याची मांडणी करुन विविध प्राण्यांचे आकार तयार करता येतात. तुमचे सॅण्डवीच ’झू’ तयार !!

फूड ब्लॉग

Foods Blog उत्तरेचा खाना-पिना ग्लोबलायझेशनच्या जमान्यात आपल्या राहण्याबरोबर खाण्यातही अनेक व्यापक बदल झाले आहेत. इंटरनेटमुळे त्यांच्याबद्दल माहिती आणि पाककृतीही सहज उपलब्ध होतात. परंपरागत मराठी खाण्यांबरोबरच अनेक प्रांतांचे आणि परदेशातले प्रकारही आपल्या रोजच्या जेवणात येऊ लागले आहेत.

हिंदी भाषिक आपल्याला जवळचे असले तरी त्यांचे खाणे खूप वैविध्यपूर्ण आहे. http://nishamadhulika.com ह्या ब्लॉग आपल्याला उत्तरेकडच्या पदार्थांच्या रेसिपीजची माहिती करुन देतो. हा ब्लॉग तसा जुना असल्यामुळे बराच लोकप्रिय आहे. पदार्थांनुसार न्याहारी, पुरी-पराठा, चटण्या-लोणची, गोड व वरण-सूप असे वर्गीकरण केलेले आहे त्यामुळे तुम्ही शोधत असलेला पदार्थ शोधणे खूपच सोप्पे जाते. त्याचबरोबर प्रांतानुसारही वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे आपल्याला चटकन राजस्थाची दाल मंगोडी कढीही मिळते आणि बिहारचा लिट्टी चोखाही !

निशा-मधुलिका ब्लॉगचे वैशिष्टय म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या कृती बरोबर त्याचे छायाचित्रही आपल्याला अपडेटेड असते त्यामुळे पदार्थ पटकन लक्षात येतो आणि चुका होण्याची शक्यताही कमी होते. आतातर ब्लॉगवर आपल्याला प्रत्यक्ष पदार्थ करतांनाचे व्हिडीयोही यूटयूबच्या सहाय्याने पहायला मिळतात. त्यामुळे महिलांचे ऑनलाईन कुकींग क्लासेस घरबसल्या होऊ शकतात.

एखादी पाककृती सांगण्या अगोदर निशा-मधुलिका आपल्याला त्या पदार्थाचे प्रांतीय वैशिष्टय सांगते जसे उडीद डाळीची भरवां बेडमी पुरी हे दिल्ली, आग्रा, मथुराकडचे स्ट्रीट फूड आहे. सकाळी नाश्त्याला ही उडीद डाळीची पुरी मसाला आलू आणि शि-यासोबत (सुजी का हलुवा) खाल्ली जाते. तसेच राजस्थानची पिटौर की सब्जी (महाराष्ट्राच्या पाटवडया) पाककृती सांगण्या अगोदर निशा आपल्या आवर्जून सांगते की राजस्थानमध्ये हिरव्या भाज्यांच्या कमतरतेमुळे डाळीचे पीठ आणि दह्याचा मुबलक वापर केला जातो. ही भाजी पारंपारिक पध्दतीने करतांना दह्यात केली जाते परंतु वाचक कांदा आणि टोमॅटोही वापरु शकतात, अशी टीप द्यायलाही निशा विसरत नाही. ह्या ब्लॉगवरच्या पाककृती कांदा-लसूण विरहीत असून सुध्दा त्यांची चव तितकीच लज्जदार आहे. प्रत्येक पाककृतीवर वाचक आपला अभिप्राय कळवतात. प्रश्न विचारतात, नवीन पाककृती सांगण्याविषयी सुचवतात. निशाही त्यांना तत्परतेने उत्तर देते. त्यामुळे ब्लॉग अधिकच ‘interactive’ झाला आहे.


निशा-मधुलिकाच्या ब्लॉगवरची उडीद डाळीची भरवां बेडमी पुरी पाककृती खास वाचकांसाठी

साहित्य
गव्हाच्या पीठाच्या आवरणासाठी
• गव्हाची कणीक – 250 ग्राम (2 कप)
• रवा – 50 ग्राम (अर्ध्या कपापेक्षा थोडा कमी)
• तेल – 1 टेबल स्पून
• खायचा सोडा – 1 चुटकी
• नमक – स्वादानुसार
• तेल – बेड़मी पूरी तळण्यासाठी

सारणासाठीStuffing for Bedmi Poori
• उरदाची दाळ – 50 ग्राम (1/3 कप)
• नमक – स्वादानुसार
• लाल तिखट – 2 चिमूट
• गरम मसाला – 1/4 छोटया चमच्यापेक्षा कमी
• अमचूर पाउडर – 1/4 छोटया चमच्यापेक्षा कमी
• हींग – 1-2 चिमूट
• हिरवी मिरची – 1-2 बारीक कापून
• आलं – 1 इंच लांब तुकड़ा (किसून)
• कोथिंबीर – 1 टेबल स्पून बारीक चिरुन

आवरणासाठी कणीक – परातीत कणीक आणि रवा एकत्र करुन त्यात मीठ, तेल, सोडा घालून पाणी टाकून कणीक चांगली मळून घ्या. ही कणीक नेहमीच्या पुरीपेक्षा थोडी मुलायम पण परोठ्यापेक्षा थोडी घट्ट भिजवा. भिजवलेली कणीक २० मिनीटे झाकून ठेवा. पुरीसाठी कणीक तयार आहे.
सारणासाठी – उडदाची डाळ चार तास भिजत घाला. नंतर जरा जाडसर मिक्सरवर वाटून घ्या. आता वर दिलेले मसाले त्यात मिसळ.

कृती
सर्वात आधी तेलाचा हात लावून कणीक सारखी करुन त्याचे २०-२२ छोटे गोळे (उंडे) करा. आता गोळा घेऊन त्याची छोटी पुरी लाटा. लाटलेली पूरी हातात घेऊन एक छोटा चमचा उडदाच्या डाळीचे सारण त्यात भरुन, पूरी बंद करा. आता चपटी करुन हलकेच लाटून घ्या. कढईत तेल चांगले तापले की पूरी तळा. जास्तीचे तेल काढण्यासाठी पेपर नॅपकीनवर ठेवा. अश्या त-हेने उरलेल्या पू-या तळून घ्या.

मथूरेची पारंपारिक बेडमी पूरी आलू (बटाटा) मसाला भाजी आणि कोथिंबीर चटणी बरोबर खाल्ली जाते.

अधिक सूचना
बेड़मी पूरी (Bedmi Poori) बनवतांना उडीद डाळी ऐवजी मूगाच्या डाळीच्या वापरही आपण करु शकतो.

– सौ. भाग्यश्री केंगे