मुक्तांगण

मासिक सदरे

वेचू या

परदेशात स्थायिक झालेली माणसे परदेशी असलेल्या गोष्टींच्या अवास्तव प्रेमात पडून कधीकधी भारतातल्या गोष्टींकडे फारच तुच्छतेने पाहू लागतात, किंवा भारतातील गोष्टींच्या आठवणी काढून परदेशी खंत करीत बसतात. ग्लोबलायझेशनच्या लाटेत परदेशात जाऊन रहाणे ही अनेक देशातील माणसांच्या बाबतीत घडलेली, पुढेही घडत रहाणारी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत कोणत्याही एका टोकाला जाण्यापेक्षा आपल्या मूळच्या देशातल्या व नवीन स्थायिक झालेल्या देशातल्या चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण करणे हेच जास्त चांगले नाही कां? हा विचार मनोमन पटल्यामुळे भारतातल्या गोष्टी इकडे प्रसृत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तसेच इकडच्या कोणत्या गोष्टी तिकडे राबविता येतील याचाही विचार नक्कीच करीत आहोत. या गोष्टी लेखाद्वारे भारतातील लोकांपर्यंत पोचवाव्यात असे वाटले. म्हणून यासंबंधीची ‘वेचू या’ ही मासिक मालिका २००६ या वर्षात गुंफण्याचा हा प्रयत्न.

– सौ. कल्याणी गाडगीळ

सौ. कल्याणी गाडगीळ या पुण्याच्या – जन्म, शिक्षण, नोकरी सर्व पुण्यात. अलिकडे चार वर्षे मात्र न्युझीलँडला स्थलांतरित. वाचनाची, मराठी लेखनाची विशेष आवड. आपण पाहिले, अनुभवले ते इतरांनाही अनुभवता यावे या ओढीपायी लेखनाची सुरुवात. विविध गोष्टींमधे मनापासून रस व विद्यार्थी मनोवृत्तीमुळे ‘आकाशातील रत्ने’ हे खगोलशास्त्रावरील पुस्तकाचे भाषांतर, ‘यूरोप सहलीचा सोबती’ हे यूरोपच्या सहलीसाठी उपयुक्त असे पहिलेवहिले मराठी गाइड, ‘स्किझोफ्रेनिया – एक नवी जाणीव’हे स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी शास्त्रशुध्द माहिती देणारे पुस्तक, ‘न्युझीलँडसाठी भारत सोडताना’ हे न्युझीलँडला स्थलांतरित होणा-या मराठी माणसांना न्युझीलँडची रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्टींची माहिती देणारे पुस्तक ही त्यांची प्रकाशित पुस्तके. याशिवाय कविता, मासिकांसाठी, दिवाळी अंकांसाठी लेखन. मराठीवर्ल्ड.कॉम या वेबसाइटसाठीचे पायाभूत विचार व लेखन.

असे पुस्तक असलेच पाहिजे

3Daustralia2 इथल्या सिटी काउन्सिलच्या सेंट्रल लायब्ररीत गेले की अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे वाटते. पुस्तकेच पुस्तके – लहान, मोठी, जाड टाइपातली, रंगीत, चांगली जाडजूड, दोन हातांनी जोर लावल्याशिवाय उचलता येणार नाहीत अशी किंवा चिमटीत धरून नेता येतील अशी पुस्तके. लहान-मोठी,तरूण-वयस्कर माणसे, विद्यार्थी जिकडेतिकडे पुस्तकांशी सलगी करीत असतात. कुठले पुस्तक घ्यावे हे सुचेनासे होते. भांबावल्या नजरेने पुस्तकांच्या त्या खजिन्याकडे पहात होते. तेवढयात शेल्फवरच्या “3D Australia” या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले आणि पुस्तकाचा एक नवीनच प्रकार पहायला, हाताळायला मिळाला. त्याची गंमत तुमच्यापर्यंत पोचवायचा हा एक प्रयत्न.

या पुस्तकात ऑस्ट्रेलियातील अत्यंत रमणीय अशा ठिकाणांचे त्रिमितीदर्शक फोटो दिलेले आहेत. 3D – three dimensional म्हणजे त्रिमितीदर्शक फोटो. त्यासाठी एकाशेजारी एक असे दोन फोटो आवश्यक असतात. उजव्या हाताच्या पानावर ते फोटो व डाव्या हाताच्या पानावर त्या ठिकाणाची मुद्देसूद व विलक्षण बोलकी अशी माहिती. पुस्तकाच्या कव्हरलाच एक घडी घातलेली व आतल्या घडीमधे फोटो त्रिमितीत दिसावेत म्हणून भिंगे घालून व नाकासाठी मोकळी फट ठेवून चष्मा तयार केलेला. पुस्तक हातात धरून एकामागून एक पाने उलगडत जायचे म्हणजे १५ मिनिटामधे ऑस्ट्रेलियाची रमणीय ट्रिप घडते. त्रिमितीफोटोंमुळे आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हजर असल्याचा भास निर्माण होतो. त्या त्या ठिकाणांची माहिती वाचल्यावर तर प्रत्यक्ष तिथे जाण्याचा मोह आवरता येणे शक्यच नाही.

त्रिमिती दृष्य दिसण्यामागची संकल्पनाही अगदी सोपी आहे. प्रत्यक्षात आपल्याला दोन डोळयांनी जी दृष्ये दिसतात ती दोन वेगवेगळी दृष्ये असतात. आपल्या मेंदूमधे ती एकवटली जातात व आपल्याला त्रिमितीयुक्त असे एकच दृष्य दिसते. याच कल्पनेच्या आधारावर 3D कॅमे-याचा वापर करून दोन फोटो घेतले, ते एकाशेजारी एक ठेवले व 3D चष्म्यातून पाहिले की तो फोटो त्रिमितीदर्शक दिसतो. भिंगांचा उपयोग अशासाठी केला जातो की डाव्या डोळयाने फक्त डाव्याच बाजूचा व उजव्या डोळयाने फक्त उजव्याच बाजूचा फोटो दिसला जावा.

3D Australia या पुस्तकातील फोटोंचे विषय तरी किती रंजक…. रसेल फॉल,कांगारूची उडी, मगरीचा भयावह उघडा जबडा, सूर्यप्रकाशात केशरट-लाल रंगात झगमगणारा उलुरू नावाचा अप्रतिम डोंगर … नाकाला चष्मा लावून थोडे मागे पुढे करून नजर स्थिरावली की त्या ठिकाणी आपण क्षणार्धात हजर.

आपल्याकडे 3D सिनेमे तुरळक का होईना पण पाहिल्याचे आठवते. छोटा चेतन नावाचा सिनेमा मी पुण्याच्या अलका थिएटरमधे पाहिला होता. चष्मा घातल्यावर दिसणारी गंमत अनुभवली होती. एका प्रसंगात छोटा चेतन आइसक्रीमचा कोन धरलेला हात पुढे करतो. 3Dच्या करामतीमुळे आइसक्रीमचा कोन इतका जवळ आला की त्याला हात लावण्याचा मोह कुणालाच आवरता आला नव्हता आणि सगळेजणच आपापल्या फजितीला मनापासून हसले होते.

3D पुस्तक मात्र मी पहिल्यांदाच पाहिले. हे पुस्तक मला भलतेच आवडले. आजकाल आपल्याकडे सुध्दा किती नवनवीन प्रकारची पुस्तके येतात. मोठया टाइपातली, रंगवता येणारी, पाणी लावले की रंग उमटणारी… लहान मुलांसाठीच्या पुस्तकात चित्रातल्या पक्षाला हात लावला की त्या पक्षाची शीळ ऐकू येणारी. त्यात या नवीन प्रकारच्या पुस्तकाची भर घालायला हरकत नाही.

विशेषत: टूरिझमसाठी असल्या पुस्तकांचा नक्कीच फार उपयोग होईल. पौर्णिमेच्या रात्री चंदेरी प्रकाशात नहाणारा ताजमहल, जोग फॉलने पाण्याचे तुषार उडवीत घेतलेली खोल साहसी उडी, पावसाच्या आगमनामुळे आनंदून पिसारा फुलविलेला व रंगांचे मनोहर दर्शन घडविणारा मोर……एकापेक्षा एक सरस अशी पुस्तके तयार करता येतील. ही पुस्तके विकत घेणारा वर्ग त्याच्या किंमतीमुळे, त्यामानाने जरा कमी असेल. पण परदेशी पाहुण्यांसाठी अशा पुस्तकांची किंमत हा अगदी गौण मुद्दा आहे.

– कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड