अक्षय (अक्षय्य) तृतीया

akshaya-tritiya

अक्षय तृतीया हा सण वैशाख शुध्द तृतियेला साजरा केला जातो. या सणाला ‘अक्षय तृतीया’ नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते. उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, वहाणा अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदीकुंकवासाठी माहीत आहे. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करतात.

चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सोयीनुसार हळदीकुंकू केले जात असले तरी काही जण अक्षयतृतियेलाच हे हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळीची करंजी असे खायला देतात. याशिवाय बत्तासा, मोग-याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरब-यांनी त्यांची ओटी भरतात. खस किंवा वाळयाचे अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडतात. हळदीकुंकवाला चैत्रगौर सजवितांना कलिंगड किंवा खरबूज कापून त्यात देवीची स्थापना करतात व फराळाचे पदार्थ करून व विविध खेळणी वगैरे मांडून ती जागा शोभिवंत करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.

वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)

भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड. या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे – सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.

आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात. म्हणून सौभाग्याचे लक्षण असेलेल्या हिरव्या बांगडया, शेंदूर, बुक्का, हळद-कुंकू, फुले, अक्षता, एक गळेसरी वडाच्या पूजेकरिता घेतात. याशिवाय अत्तर, कापूर, पंचामृत, वस्त्र, विडयाची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोब-याचा नैवेद्य, दुर्वा इ. साहित्य घेतात. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करतात. हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्याची पूजा करतात. शक्य असल्यास ब्राम्हण बोलवून पूजा करतात. या दिवशी बायका उपवास करतात. पूजा झाल्यानंतर वडाला तीन प्रदक्षिणा घालतात. वडाच्या बुंध्याला सूत गुंडाळतात.

गुरुपौर्णिमा (आषाढ शुध्द पौर्णिमा)

gurpaurnima

भारतातील शिक्षण पध्दतीत ‘गुरू-शिष्य’ प्रथेला फार महत्त्व आहे. वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मौंजीबंधन विधी करून ब्राह्मण मुले विद्यार्जनासाठी गुरूगृही जात असत. एक तप (१२ वर्षे) विद्यार्जन करून ते गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असत. गुरूला वंदनीय मानून आदर व्यक्त करण्याच्या हेतूने हा सण निर्माण केलेला आहे. महर्षी व्यास जगाचे आद्यगुरु होते असे हिंदू मानतात. त्यामुळे या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी महर्षी व्यासांची पूजा करतात व खालीलप्रमाणे श्लोक म्हणून त्यांना वंदन करतात.

ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे फुल्लारविंदाय तपत्रनेत्रयेन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः॥

याशिवाय कोणत्याही विषयातील आपापल्या गुरुजनांना आदराने वंदन करतात. गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु आपणांस नवी दृष्टी देतात. योग्य पध्दतीने जाणतेपणाने कष्ट करण्यास शिकवतात. एकाग्रता, सहनशीलता, त्याग, आज्ञाधारकता वगैरे सदगुण गुरुमुळेच आपणांस प्राप्त होतात. अशा गुरुंविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून मानतात. आपल्या गुरुबद्दलची निष्ठा सतत जागरुक ठेवण्याचा, गुरुचे स्मरण करण्याचा हा मंगल दिन आहे. या दिवशी रुद्राभिषेक करून गुरूंना वस्त्र-दक्षिणा किंवा तत्सम काहीतरी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. गायन-नृत्य किंवा चित्रकला वगैरे कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दिवस आहे. गुरूंच्या आशिर्वादाने हे विद्यार्थी आपापली कला लोकांसमोर सादर करतात.