समुद्रकिनारे

वेंगुर्ला

Vengurla वेंगुर्ला हे बंदर म्हणून काही वर्षांपूर्वी खूप प्रसिध्द होते. जमिनीवरील वाहतूक अत्यंत मर्यादित होती, त्यावेळी कोकणात समुद्रमार्गे सर्व व्यवहार चालायचे. मुंबई-गोवा समुद्र मार्गावरील वेंगुर्ला हे एक मोठे बंदर होते. येथे दीपगृह आहे. डचांच्या वखारी आहेत. कोकण कृषी विद्यापीठाचे काजू संशोधन केंद्र आहे. वेगवेगळया फळझाडांची रोपे शासकीय तथा खाजगी रोपवाटिकांमधून उपलब्ध होतात.

राहण्यासाठी व उत्कृष्ट कोकणी जेवणासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. समुद्रकिना-याच्या उंच टेकडीवर शासनाचे ‘सागर’ हे अत्यंत रमणीय विश्रामगृह आहे. संध्याकाळी या ठिकाणाहून सूर्यास्ताचे दर्शन करण्यासाठी बरीच गर्दी असते. सकाळचा सूर्योदय देखील येथून चांगला दिसतो. शासनाने वेंगुर्ला ते मालवण हा जवळजवळ ४० किलोमीटरचा सागरी महामार्ग नुकताच विकसित केला आहे. समुद्राच्या काठाकाठाने माडांच्या अन् पोफळीच्या बागातून चढ उतारांचा आणि वळणांचा हा अत्यंत देखणा रस्ता असून केवळ त्या रस्त्याने रमतगमत प्रवास करणे हाच एक मोठा आनंद आहे.

मुंबईहून रेल्वेने सांवतवाडी व तेथून साधारण २८ ते ३० किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला आहे. मुंबईहून राष्ट्रीय महामार्गाने आल्यास कुडाळहून ही वेंगुर्ल्याला जाता येते. कुडाळ-वेंगुर्ला २२ ते २५ किलोमीटर अंतर आहे. वेंगुर्ला हे क्रिकेटच्या ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्करचे गाव.

Vengurla वेंगुर्ला मालवण या सागरी महामार्गापासून ३/४ किलोमीटर आत ‘कोंडुरा’ आहे. वेंगुर्ल्यापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेले हे एक अत्यंत रमणीय ठिकाण. किना-यावरून खाली खोल खोल उतरण. नारळी-पोफळीच्या बागेतून तुम्ही एकदम किना-यावरच जाता. समोर विस्तीर्ण समुद्र. पाठीमागे नारळी-पोफळीच्या बागा- त्या बागेतून नेहमी वाहणारा गोडया पाण्याचा झरा- झाडीमध्ये लपलेले लिंगेश्वराचे देऊळ! अत्यंत रमणीय आणि चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीसारखेच गूढ. किना-यावरून दक्षिणेकडे थोडेसे चालत गेले की, प्रचंड दगडामध्ये समुद्राने केलेले ‘कोरीव काम’ पाहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी जमेल त्या ठिकाणी दगड फोडून आत विवर बनवले आहेत. त्यात आत खोलवर लाट गेल्यानंतर प्रचंड गूढ आवाज यायला लागतो. मात्र दगडावरून फारच सांभाळून जावे लागते. लाटांच्या मा-याने दगड इतके अणुकुचीदार आणि धारदार बनले आहेत की, पाय कापूनच निघावा. Location Icon

निवतिचा समुद्रकिनारा

Nivati Beach कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट-म्हापण-निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. भोगव्याच्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो.

Nivati Beach तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात.

म्हापण-पाट-परूळे-केळूस हा संपूर्ण रस्ता वळणावळणाचा असून नारळी-पोफळीच्या बागातून जातो. हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते. Location Icon