पक्वान्ने

मोदक विविध प्रकार

रुचिपालट म्हणून, तसेच सणासुदीला नेहमीपेक्षा जास्त चविष्ट व उंची पदार्थ खाण्याची प्रथा जगभर आहे. भारतीय परंपरेनुसार तर अनेक सण व त्याच्याशी निगडीत असलेले अनेक पदार्थ प्रांतोप्रांती आढळतात.

महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्राचे खरे पक्वान्न म्हणजे पुरणपोळी. हरबऱ्याची डाळ, गूळ व गहू यांपासून बनविलेली ही पोळी शेतकऱ्यांपासून उच्चभ्रूवर्गातील सर्वाचा आवडीचा पदार्थ आहे. त्याचे पोषण मूल्यही जास्त आहे. पण मऊसूत आणि अलवार पुरणपोळी बनविणे हे कौशल्याचे, सुगरणीचे काम आहे. बैलपोळयापासून ते होळीपर्यंत कोणत्याही सणाला सर्वसामान्य महाराष्ट्रीय माणूस हेच पक्वान्न खातो. त्याच बरोबर विविध ऋतुनुसार शरीराला पोषक अशी पक्वान्ने करण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ थंडीच्या दिवसात जास्त उष्मांकाची जरूरी असल्यामुळे तीळ व गूळ वापरून केलेली गूळपोळी खाण्याची प्रथा आहे. श्रीखंड, बासुंदी या पदार्थांना पेशवाईत फार महत्व प्राप्त झाले व आता श्रीखंडातच आंबरस घालून आम्रखंड नावाचा एक चविष्ट पदार्थ लोक आवडीने खातात. कोकण भागात, जिथे नारळाचे भरपूर उत्पन्न होते तिथे नारळापासून बनविलेले उकडीचे मोदक, किवा तांदुळाच्या घावनाबरोबर नारळाच्या दुधापासून बनविलेले घाटले करण्याची प्रथा आहे. टिकाऊपणाच्या दृष्टीने व सार्वजनिक भोजनाच्या प्रसंगी मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू करण्याची पध्दत आहे. अशा अनेक पदार्थांपैकी महाराष्ट्रातील खास पक्वान्नाच्या कृती येथे दिलेल्या आहेत.

सत्यनारायणाचा प्रसाद

satynarayancha-prasad साहित्य – सव्वा पावशेर भांडे जाड रवा, सव्वा पावशेर साखर, सव्वा पावशेर पातळ साजूक तूप, सव्वा पावशेर दूध व १ भांडे पाणी, वेलदोडे, बेदाणे, काजू, केळी (केळ्याचे काप काळे पडू नये म्हणून २-३ थेंब लिंबाचा रस लावावा).

कृती – पातेल्यात तूप गरम करून त्यात रवा घालावा व रवा मंद आचेवर बदामी रंगावर खमंग भाजावा भाजल्यावर केळीचे काप टाकून थोडे परतावे. एका पातेल्यात सव्वा पावशेर दूध व भांडे पाणी उकळून घ्यावे. रवा भाजून झाल्यावर उकळते दूध – पाणी, साखर थोडे थोडे घालून ढवळावे म्हणजे रवा चांगला फुलून येतो. झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्यावी. नंतर काजू, वेलदोडा पूड, बेदाणे घालून प्रसाद उतरावा.

गाजराचा हलवा

gajracha-halwa साहित्य – १ किलो लाल गाजरे, अर्धा लिटर दूध, पाव किलो खवा, २ वाटया साखर, २ टेबलस्पून साजूक तूप, ५-६ वेलदोडयांची पूड, ५५ काजूचे बारीक तुकडे, बेदाणे.

कृती – प्रथम गाजरे स्वच्छ धुवून सालकाढणीने सोलून घ्यावीत व बारीक किसनीवर किसून घ्यावीत. नंतर गाजराच्या किसात एकदम दूध न घालता थोडे थोडे दूध प्रत्येक वाफेला घालून दूध आटेपर्यंत ढवळावे म्हणजे गाजराचा किस मऊ शिजतो.दूध आटल्यावर पाव किलो खवा हाताने गुठळी मोडून गाजराच्या किसात टाकावा. हे मिश्रण परत घट्ट होईपर्यंत हलवावे. नंतर २ वाटया साखर घालून हलवत रहावे. हलवा साखर विरघळून कोरडा झाला की २ चमचे साजूक तूप पातेल्यात सर्व बाजूंनी सोडावे व हलक्या तूपावर खमंग परतावा. नंतर त्यात काजूचे काप व वेलदोडे पूड घालावी.

गाजराची खीर

gajrachikhir साहित्य – ४ लाल गाजरे, ३ वाटया दूध, २ चमचे साजूक तूप, वेलचीपूड, अर्धा कप साखर, काजू, बदाम व इतर सुकामेवा.

कृती – गाजरे स्वच्छ धुवून त्याची साले काढावीत. त्याचे तुकडे करून ते कुकरमध्ये २ शिट्टया होईपर्यंत शिजवावेत. गार झाल्यावर एकजीव करावे, जरूरी वाटल्यास किंचीत पाणी घालावे. एका पातेल्यात थोडे तूप गरम करावे. त्यावर हे गाजराचे मिश्रण परतून घ्यावे, नंतर त्यात साखर व दूध घालावे. हे मिश्रण व्यवस्थित ढवळावे, उकळी आल्यानंतर उतरवावे.

गोड घावन

sweetghawan साहित्य – तांदळाचं पीठ २ वाटया, गूळ अर्धी वाटी, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ चवीपुरतं.

कृती – एक – दीड वाटी पाण्यात गूळ विरघळून घ्यावा. तांदळाच्या पिठात गुळाचं पाणी, जिरेपुड, मीठ घालून चांगलं कालवावं. नॉनस्टिक तव्यावर याची घावन काढावीत.

टीप – कोशिंबिरीसाठीचे टोमॅटो पिकलेले पण टणक असावेत, नाहीतर कोशिंबिरीला फार पाणी सुटते, फोडणी नाही दिली तरी चालते दही आंबट असल्यास थोडे दूध घालावे. आवडल्यास दोन तीन काळया मिर्‍यांची पूड मिसळावी. कोशिंबीर खाण्यास वेळ असल्यास ती फ्रिजमध्ये ठेवावी.

गुलाबजाम

gulabjamun साहित्य – ५०० ग्रॅम गुलाबजामचा खवा, ५०० ग्रॅम साखर, ८ – १० वेलदोडे, १०० ग्रॅम कॉर्नफ्लोअर, थोडा रोझ इसेन्स, १ चिमूट खाण्याचा सोडा, तळणीसाठी रिफांईड तेल २५० ग्रॅम.

कृती – खवा हाताने मोडून घ्यावा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर व वेलचीची पूड करून घालावी. अर्धा चमचा खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून त्यात घालावा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे. खूप मळू नये. गुलाबजाम तळण्यापूर्वी पाक करावा. साखरेत मोठे अडीच कप पाणी घालून एकतारी पाक करावा. पाकात रोझ इसेन्स घालावा. नंतर मळलेल्या खव्याचे ५० लहान – लहान गोळे तयार करून मंदाग्नीवर तळावेत. तळतांना गुलाबजामवर तेल उडवावे. तळल्यानंतर ते बाहेर काढून निथळून पाकात टाकावेत. गुलाबजाम पाकात टाकताना पाक गरम असावा. दूसरे तळून झाले की पहिले गुलाबजाम पाकातून काढून उथळ डब्यात ठेवावेत.

गव्हल्यांची खीर

साहित्य – १ वाटी गव्हले, ४ वाट्या दूध, १ वाटी साखर, ५ -६ वेलदोडयांची पूड, थोडे केशर, १ चमचा साजूक तूप.

कृती – जाड बुडाच्या कल्हईच्या पातेलीत १ चमचा साजूक तूप घालून त्या तुपात गव्हले मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत परतावे. परतलेल्या गव्हल्यांवर चार वाटया दूध घालावे व डावाने हलवावे. मोठया गॅसवर दूध चांगले उकळू व आटू द्यावे. दूध निम्मे आटले की गव्हाळ हाताने नीट दाबून शिजला का ते पहावे व शिजला असेल तर १ वाटी साखर घालावी. साखर विरघळून एक उकळी आली की खीर खाली उतरवून त्यात वेलदोडे व केशर पूड घालावी.