दक्षिणोत्तर पसरलेल्या महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न आणि समृध्द समुद्रकिना-याची दोन टोके! आपली विविध रूपे दाखविणारा समुद्र आणि त्याच्या मर्यादांची जाणीव करून देणारे डोंगर!
मानवाला पाण्याचे वेड हे जन्मजात असते. तासनतास लाटा पाहात बसले तरी कंटाळा येत नाही. नवीन येणारी प्रत्येक लाट आपल्याबरोबर नवीन स्वप्नेच जणू घेऊन येते. एकटयाने हा लाटांचा खेळ पाहात बसण्यासारखा आनंद नाही दुसरा. महाराष्ट्राच्या या अनमोल खजिन्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. समुद्र किनारा हा शेवटी सगळीकडे सारखाच – तो रेडीला पाहिला काय अन् रत्नागिरीला पाहिला काय! पण तसं नसतं. म्हणून तर शिरोडयाच्या सुरूच्या बनात बसून समुद्र जितका मोहक वाटतो, तितकाच तो विजयदुर्गच्या किल्ल्यातूनही वाटतो. त्याच्या पोटात जितकी अमर्याद संपत्ती दडली आहे, तितकेच त्याचे दर्शनही अमर्याद आनंददायी आहे.
या संपूर्ण किनारपट्टीवर हा आनंद वेचण्याची ठिकाणे कोठे आहेत याची माहिती करून देण्याचा इथे अल्पसा प्रयत्न केलेला आहे. पायी किना-याने फिरणा-यां पासून गाडीने किना-यावर जाणा-यांपर्यंत सर्वांना तो मार्गदर्शक ठरावा हा हेतू. गोव्याच्या किना-याची सा-या जगाला माहिती आहे, पण अत्यंत प्रेक्षणीय असूनही महाराष्ट्राचा हा किनारा मात्र ब-याच अंशी दुर्लक्षितच राहीला आहे. त्याला न्याय मिळाला तर माझे श्रम सफल झाले म्हणेन!
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या चार जिल्हयामध्ये महाराष्ट्राचा कोकण किनारा पसरला आहे. या किना-याची चार भागांमध्ये ओळख करून देण्याचा संकल्प असून, त्यातील हा पहिला भाग.
सिंधुदुर्ग
भौगोलिक स्थान – | १५.३७ अंश ते १६.४० अंश अक्षांश ७३.१९ अंश ते ७४.१३ अंश रेखांश |
जिल्हयाचे क्षेत्रफळ – | ५०८७ चौ. किमी. |
किनारपट्टीची लांबी | १२१ किमी. |
जिल्हयाचे मुख्यालय | सिंधुदुर्गनगरी |
तालुके | सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी, दोडामार्ग |
लोकसंख्या | ८६१६७२ |
पर्यटनासाठी चांगला कालावधी | नोंव्हेंबर ते मार्च, एरवी पावसाचा आनंद लुटण्यासाठी पावसाळा, आंबे खाण्यासाठी उन्हाळा! |
गणपती मंदिर, रेडी
![]() |
![]() |
गणपती मंदिर, रेडी | आतील मूर्ती |
फोटोची वेळ- दुपारी १३.००, ऑक्टोबर २००२, ठराविक अंतरावरून मूर्तीचा फोटो घेण्याची परवानगी आहे. |
कोणत्याही शुभ कार्याची सुरवात गणपतीच्या वंदवंदनाने होते. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन सहलीच्या सुरवातीलाही रेडीच्या गणपतीला वंदन करूनच पुढे जाऊ. कोकण किनारपट्टी म्हणजे, परशुरामाची भूमी समजली जाते. महाराष्ट्राच्या या किनारपट्टीमध्ये चार जिल्हयांचा समावेश होतो. दक्षिणेच्या टोकाला सिंधुदुर्ग, त्यानंतर क्रमाने रत्नागिरी, रायगड, आणि उत्तर टोकाला ठाणे जिल्हा. पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्हयाचाच भाग होता. दोडा मार्ग किंवा बांद्याच्या माणसाला कामासाठी जिल्हयाच्या ठिकाणी रत्नागिरीला जायचे म्हणजे एक दिव्यच. खूपच लांबच्या लांब पसरलेला हा जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने आणि जनतेलाही गैरसोयीचा होता. त्यामुळे १ मे १९९१ रोजी रत्नागिरी जिल्हयाचे विभाजन करून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हयासाठी जिल्हा मुख्यालय निश्चित होण्यामध्ये अनेक समस्या आल्या प्रथम कुडाळ या ठिकाणी जिल्हयामधील काही प्रमुख कार्यालये सुरू केली. सर्व कार्यालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध करणे फारच कठीण होते. कालांतराने ओरोस-रानबांबुळी या गावांच्या सीमेवर जागा घेऊन जिल्हयाचे मुख्यालय उभारण्यात आले. १९९४ मध्ये अत्यंत आधुनिक आणि आकर्षक अशी ही सिंधुनगरी अस्तित्त्वात आली आणि जिल्हाभर विखुरलेली सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आली. अशा पध्दतीने आधुनिक जिल्हा मुख्यालय असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा बनला. सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड आणि वैभववाडी हे सात तालुके होते. प्रशासनाच्या सोयीसाठी सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून दोडामार्ग तालुक्याची निर्मिती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हयाचे क्षेत्रफळ ५०८७.५ चौरस किलोमीटर इतके आहे. इथल्या भूमीपुत्रांनी बाहेर जाऊन खूप मोठा नावलौकिक मिळवला आहे. कला आणि क्रिडा क्षेत्रामधील अनेक दिग्गज हे कोकणचे सुपुत्र आहेत. भात आणि मासळी हे इथले मुख्य अन्न. आले, खोबरे आणि कोकम यांच्या वैशिष्टयपूर्ण वापरामुळे मालवणी जेंवण हे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहे. मटणाची सागोती आणि वडे या खाद्यपदार्थाने महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.