अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये

  • चांदोली राष्ट्रीय उद्यान
  • जायकवाडी अभयारण्य
  • ज्ञानगंगा अभयारण्य
  • टिपेश्वर अभयारण्य
  • तानसा अभयारण्य
  • दाजीपूर अभयारण्य
  • नरनाळा अभयारण्य
  • नान्नज अभयारण्य
  • नायगाव अभयारण्य
  • फणसाड अभयारण्य
  • भामरागड अभयारण्य
  • भीमाशंकर अभयारण्य
  • मालवण समुद्री अभयारण्य
  • मेळघाट अभयारण्य
  • यावल अभयारण्य
  • येडशी अभयारण्य
  • राधानगरी अभयारण्य
  • लोणार अभयारण्य
  • वान अभयारण्य
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
  • सागरेश्वर अभयारण्य
  • गौताळा औटराम घाट अभयारण्य

कान्हा राष्ट्रीय उद्यान

‘जंगल बुक’चे प्रेरणास्थान – कान्हा

Kanha Park भारतातील व्याघ्रप्रकल्पांची सुरुवात झाली त्यावेळी पहिल्यांदा मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाचा सरकारने विचार केला होता. कान्हा राष्ट्रीय उद्यानात पहिला व्याघ्रप्रकल्प राबवला गेला. विशेष म्हणजे व्याघ्रप्रकल्प या ठिकाणी सर्वाधिक यशस्वी ठरला. सुप्रसिद्ध लेखक आणि नोबेल पारितोषीक विजेते रुडयार्ड किपलींग यांची सुप्रसिद्ध कादंबरी अर्थातच ‘जंगल बुक’ ही साहित्यकृती याच उद्यानावरुन त्यांना सुचली. ही भारतासाठी विशेष बाब मानली जाते.

या उद्यानाची स्थापना 1 जून, 1955 मध्ये करण्यात आली. त्याअगोदर हे उद्यान ‘हलून’ आणि ‘बंजर’ या दोन अभयारण्यांमध्ये विभागले गेले होते. आजचे कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मंडला आणि बालाघाट या मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. उद्यानाचे गाभाक्षेत्र व परिसर क्षेत्र एकूण मिळून 1009 चौ. किलोमिटर इतके प्रशस्त आहे. व्याघ्र प्रकल्प असल्याने येथील पर्यटकांचे मोठे आकर्षण अर्थातच पिवळा पट्टेरी वाघ हेच आहे. तसेच अन्य अभयारण्यांपेक्षा या ठिकाणी वाघांची संख्या सर्वाधिक असल्याने येथे हमखास वाघ दिसतोच. साधारणपणे दोन पूर्ण दिवस थांबून चार राईड केल्यास किमान एका राईडमध्ये तरी वाघ दिसतोच. 2006 सालच्या वाघांच्या जनगणनेनुसार येथे 131 वाघ होते. त्यानंतरही कठोर कायद्यांमुळे व सुरक्षेमुळे आज ही संख्या वाढली आहे.

जंगलातील अन्य प्राणीसंपदा

वाघांच्या व्यतिरिक्त या जंगलात अस्वल, बारहसिंगे, हरणे, रानकुत्री, रानकोंबड्या, बिबट्या, चितळ, सांबर, गवे, रानडुक्कर, कोल्हे, खोकड, माकडे, पाणमांजरी, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, तरस, खवलेमांजर, साळिंदर, नीलगायी, काळविट अशी मुबलक प्राणीसंपदा मोठ्या प्रमाणावर आढळते. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये कोब्रा, नाग, मण्यार, घोणस, मगरी, घोरपड हे प्राणी आहेत.

प्रामुख्याने सतत दिसणा-या प्राण्यांमध्ये गवे, अस्वले, रानडुक्कर, कोल्हे यांची संख्या जास्त आहे. भारतात दुर्मीळ असलेला लांडगाही येथे आढळतो. येथील चितळांची संख्या तर 20 हजारांहूनही अधिक आहे. तर, गव्यांची संख्या 6000 हून अधिक आहे. भारतीय रानकुत्र्यांची संख्याही येथे सर्वाधिक आहे.

जंगलाचा प्रकार

कान्हाचे जंगल हे मुख्यत्वे मध्य भारतातील पानगळी प्रकारचे आहे. येथे साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कान्हा उद्यान व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यानंतर आतील सर्व गावे इतरत्र हलवण्यात आली व संपूर्ण जंगल निर्मनुष्य करण्यात आले. ज्या भागात मानवी वस्ती व शेती होती, त्या ठिकाणी मोठमोठ्या कुरणांची निर्मीती झाली. या कुरणांमध्ये गवताचे खाद्य हरिणांसह अन्य शाकाहारी प्राण्यांना मिळाले. त्यामुळे त्यांची पैदास चांगली व मोठ्या प्रमाणावर झाली. याच ठिकाणी एक अशीही वनस्पती उगवते ती बारहसिंग्यांनाही खाण्यास खुप उपयोगी पडते.

प्रोजेक्ट टायगर नावाने प्रसिद्ध असलेला हा प्रकल्प भारत सरकारतर्फे चालवला जातो. याचा मुख्य हेतू म्हणजे भारतीय वाघांचे संरक्षण करणे. या अंतर्गतच त्यांच्या वस्तीस्थानांचे संरक्षण व संख्येत वाढ करणेही अपेक्षित आहे. वाघांची संख्या हा पूर्ण देशासमोरील चिंताजनक मुद्दा आहे. अगदी राजे-महाराजांच्या काळापासून शौक आणि मर्दूमकी गाजवण्यासाठी वाघांची शिकार करणे हा प्रघात ब्रिटीशराज गेल्यानंतरही कायम राहिला. इतर प्राण्यांच्या शिकारीतही वाढ झाली. दुसरीकडे जंगलांवर मानवी अतिक्रमण वाढत गेल्याने वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने पाळीव प्राण्यांवरील वाघांचे हल्ले वाढले. परिणामी वाघ पाळीव प्राणी खातात म्हणून विषप्रयोग करत त्यांना मारण्यापर्यंत माणसाची मजल गेली. वाघांची ही चिंताजनक स्थिती पाहून अनेक वन्यजीवप्रेमींनी या विरोधात आवाज उठवला. त्याला कायद्यानेही साथ दिली आणि 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आला. आजच्या घडीला कान्हा अभयारण्याची भारतातील सर्वाधिक यशस्वी व्याघ्रप्रकल्प म्हणून ख्याती आहे. येथील कौतुकास्पद गोष्ट अशी की, अभयारण्यातील चोख शिस्त आणि सुयोग्य व्यवस्थापन. कोणत्याही प्रकारच्या बेशिस्तीला येथे जराही स्थान नाही. तसेच तेथील एकंदर वातावरण पाहता अशी बेशिस्त करावी हे कोणालाही वाटणारच नाही. पर्यटकांच्या खाण्या-पिण्याच्या व राहण्याच्या सोयीसाठी एम. पी. टुरिझमच्या गेस्ट हाऊससह अनेक खासगी हॉटेल्स व रिसॉर्ट्स दिमतीला आहेत. जंगलात फिरण्यासाठी पर्यटक ओपन जीप गाड्या वापरतात. जवळपास प्रत्येक हॉटेलच्या स्वत:च्या गाड्या आहेत.

वाघ आणि अन्य प्राणी पाहण्यासाठी पहाटे लवकर निघणे केव्हाही सोयीस्कर. कारण आपण जेवढे लवकर जंगलात शिरु तितके प्राणी जास्त पहायला मिळतात. उन्हाळ्यापेक्षाही हिवाळ्याच्या दिवसात येथे जाणे कधीही उत्तमच. तसेच प्रत्येक जीपमध्ये चारजण बसू शकतात. सोबत एक ड्राइव्हर आणि एक मार्गदर्शक असतोच कारण तो जंगलाचा नियम आहे. हे गाईड बहुतांशी येथील जंगलाच्या आसपासच राहणारे बैगा जातीचे आदिवासी आहेत. त्यामुळे जंगल, प्राणी त्यांचे कॉल्स आणि त्यांची नेमकी जागा याची त्यांना खडान्खडा माहिती असते. नियमानुसार पर्यटकांना जंगलात शिरण्याआधी आपली सर्व माहिती द्यावी लागते. येथील आणखी एक आकर्षण म्हणजे हत्ती सफारी.. यात हत्तीच्या पाठीवर बसून वाघाच्या मागावर शिरणे आणि घनदाट जंगलात जाऊन वाघ पाहणे. हा थरार अगदी अनुभवण्यासारखाच. त्यातली मजाच काही वेगळी आहे. निसर्गाचे नियम आणि पर्यटकांची सुरक्षा याचा पूर्ण विचार करुनच ही सफारी चालवली जाते. या हत्तीचे माहूत अतिशय ट्रेंड असतात. यासाठी पर्यटकांकडून विशिष्ट मुल्यही आकारले जाते.

प्रत्येकाच्या मनात एकदा तरी जंगलच्या राजाला जवळून पहावे ही सुप्त इच्छा असतेच. मात्र व्याघ्रप्रकल्पात जाऊनही तो दिसणे हे बरेचदा रामभरोसेच असते. पण कान्हा मध्ये मात्र पर्यटकांचा हिरमोड होत नाही हे येथील विशेष आहे. मात्र त्यासाठी आपले पेशन्सही खुप गरजेचे आहेत. आपण जंगलचे सर्व नियम पाळणेही तितकेच गरजेचे आहे. तर आणि तरच जंगलचा राजा आपल्यावर प्रसन्न होईल. तुम्हाला वाघ दिसण्यासाठी खुप शुभेच्छा.

पर्यटकांसाठी महत्वाचे

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – जानेवारी ते जून 20 पर्यंत.

वेळ – सुर्योदयापासून ते 9.30 पर्यंत आणि दुपारी 3.30 ते सूर्यास्तापर्यंत.

विशेष – उद्यानात पायी फिरण्यास सक्त मनाई आहे.

कसे जावे

1. रेल्वेने जबलपूर गाठावे तेथून बस किंवा खासगी वाहनाने मंडला गावी जावे. तेथून कान्हा अभयारण्य जवळ आहे. (प्रवास जबलपूरहून अंदाजे 2 तास)

2. रेल्वेने नागपूर गाठावे तेथून बस किंवा खासगी वाहनाने थेट कान्हा मध्ये जाता येते. (प्रवास नागपूरहून अंदाजे 5.30 तास)

जवळची प्रसिद्ध ठिकाणे – भेडाघाट (नर्मदेची घळई), द्वारालोक मंदिर, बांधवगढचे अभयारण्य. Location Icon