सुट्टया लागल्या की रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जर चार दिवस शांत आणि निसर्गरम्य परिसरात घालवायला मिळाले तर याच्याइतका आनंदाचा क्षण अजून कुठला असेल? आणि हे सर्व जर खिशाला परवडेल अशा दरात जर मिळाले तर दुधात साखरच पडली म्हणायचे. असा हा मजेत सुट्टी घालवण्यास उत्तम परिसर म्हणजे दिवेआगार- श्रीवर्धन-हरिहरेश्वर परिसर.
या परिसरात कसे जायचे?
हा परिसर रायगड जिल्ह्यात मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगावच्या पश्चिमेला येतो. जर तुम्ही पुण्यावरुन निघणार असाल तर रेल्वेची सोय नाही. स्वारगेटवरुन थेट दिवेआगार बस जाते आणि तिचा मार्ग पुणे-पौड-ताम्हिणी- डोंगरवाडी-आदरवाडी-विळे-माणगाव-गोरेगाव-दिवेआगार (सुमारे १५० कि.मी.). दुसरा एक मार्ग भोर मार्गे वरंधा घाटातून गोरेगावला जातो आणि तिथून पुढे दिवेआगार. मुबंईहून या प्रदेशात येताना मुबंई-गोवा राष्ट्रीय मार्गाने कोलाड, माणगावच्या पुढे गोरेगाववरुन दिवेआगारला जाता येते.
राहण्याची व जेवणाची व्यवस्था
कुठेही निघताना ही सर्वात महत्वाची गोष्ट असली तरी इथे जाताना त्याची काळजी करण्याचे कारण नाही. कारण तिथली अतिशय प्रेमळ माणसे म्हणजे श्री. सुहास बापट आणि त्यांच्या पत्नि सौ. वर्षाताई बापट, तुम्ही फक्त त्यांचा फोन नबंर ०२१४७-२२४३७७ लक्षात ठेवा आणि केव्हाही फोन करुन तुमचे बुकिंग करा. राहायची व्यवस्था तर ते करतीलच पण चहा, फराळ आणि भोजन यासर्व गोष्टी तुम्हाला इतक्या प्रेमाने आणि अतिथ्यशिल पणे देतील की तुम्हाला घराबाहेर आहोत असे भासणारच नाही. त्याच्यांकडील फणसाची भाजी, उकडीचे मोदक यासारखे पदार्थ जर खाल तर अण्णपूर्णा ह्या शब्दाचा खरा अर्थ कळेल. काही स्पेशल गोष्टीं खाण्यासाठी आधी पूर्व कल्पना द्यावी लागते ऐवढेच. हो पण याच्याकडे फक्त शुध्द शाकाहरी जेवणच मिळेल, मासांहरी लोकासाठी दुसरीकडे जेवणाची व्यवस्था आहे. राहण्याची सोय म्हणजे खरोखरीच कोकणातील घरांचे पुस्तकांत वाचलेले वर्णन. नारळी पोफळीच्या बागेतील कौलारु घर, त्याच्या पुढे आणि मागे मोठे सारवलेले अंगण, तेही अगदी स्वच्छ, भरपूर पाणी आणि स्वच्छ मोकळी हवा. जिथून समुद्र अगदी पाच दहा मिनीटांच्या अतंरावर. समुद्राच्या पाण्याची खळखळ तुम्हाला अगदी घरातुनच ऐकायला येते आणि ह्याची मजा काही वेगळीच आहे.
दिवेआगर परिसर
इथले मुख्य आकर्षण म्हणजे ४-५ कि. मी. लांबीचा शांत समुद्रकिनारा. जिथे सकाळ संध्याकाळ तुमचा वेळ इतका शांत आणि छान जाईल की विचारु नका. कारण कुठल्याही प्रकारची अस्वच्छता किंवा दुकाने, फेरीवाले इथे दृष्टीस पडणार नाहीत. शांत वाळूवर पहूडायचे किंवा समुद्राच्या लाटांवर खेळायचे. इथला समुद्रही खूप शांत आहे आणि वाळू बिलकूल घसरत नाही, त्यामुळे भितीचे आजिबात कारण नाही. संध्याकाळी सूर्यास्त पहायला एक वेगळीच मजा येते. एवढया अथांग समुद्रात सुर्याचा लालबुंद गोळा बुडतानाचे ते दृष्य खरोखरीच अविस्मरणीय आहे. इथले अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इथले सुवर्णगणेश मंदिर. या मंदिराजवळ श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळी पोफळीच्या बागेत जमिनीखाली खणताना एका तांब्याच्या पेटीत हा गणेशाचा सोन्याचा मुखवटा सापडला, जो त्यांनी गणेशमंदिर विश्वतांकडे सुपूर्त केला आणि त्याची स्थापना मंदिरात करण्यात आली. आणखी इथली एक वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे येथील रुपनारायण मंदिर. ज्याची एक ते दीड मीटर उंचीची दुर्मिळ मूर्ती येथे पाहायला मिळते.
हरिहरेश्वर परिसर
याला दक्षिण काशी असेही म्हणतात. समुद्रकिना-यावर असलेले मंदिरात ब्रम्हा, विष्णू आणि महेश अशी तिन लिंगे व पार्वतीचा उंचवटा आहे. येथिल काळभैरवाचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे, आणि त्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एका डोंगराला प्रदक्षिणा घालायची आणि ती ही अगदी समुद्राच्या कडेने. समुद्राला भरती असते तेव्हा ही प्रदक्षिणा घालता येत नाही.
तेथील फेसाळणारा समुद्र आणि उंच उंच जाणाऱ्या लाटा हे दृष्य म्हणजे खरोखरीच एक अविस्मरणीय आहे. तिथे सुटणारा वारा इतका सोसाटयाचा असतो की कधी कधी भिती वाटून जाते, पण हे सर्व अनुभवायला एक वेगळीच मजा येते. समुद्रकिनाऱ्यावर लाटा आदळून दगडांची झिज होऊन त्यांचे तयार झालेले वेगवेगळे आकार येथे पहायला मिळतात. काही आकार तर मधमाशाच्या पोवळयासारखेच भासतात. येथे बसून तासन तास लाटांचे तांडव पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो आणि तो कुणी सांगुन अनुभवता येत नाही त्यासाठी तिथेच जायला पाहिजे.
तेथून पुढे जे दिघी गाव आहे त्या गावावरुन लॉच ने मरुड जंजि-याला जाता येते.
श्रीवर्धन परिसर
श्रीवर्धन म्हटले की पेशव्यांची आठवण येते. कारण हे त्याचे मुळ गाव. पेशवेकालीन बऱ्याच वास्तू आणि मंदिरे येथे पाहायला मिळतात.
अशा प्रकारे एकदा भेट दिल्यावर पुन:पुन्हा जावे वाटणा-या ह्या परिसराला एकदा तरी भेट द्यावी. आणि आयुष्यातील एक चांगला अनुभव घ्यावा.
सौ. मनिषा नवले, पुणे