मधल्या वेळचे पदार्थ

व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास सोडणे असा होतो. सकाळी उठल्यावर रक्तातील उत्साहवर्धक तत्वे अत्यंत कमी झालेली असतात. त्यामूळे नव्या दिवसाच्या कामाला हात घालण्यापूर्वी ती वृध्दिंगत करणे जरूर असते. शरीराची ही गरज ओळखून पाश्चात्य देशात न्याहारीसाठी सहज पचतील, परंतु अत्यंत पौष्टिक असतील असेच पदार्थ सेवन केले जातात. शरीराची ही गरज केवळ शारिरीक श्रम करणार्‍यांसाठीच सीमित नसून बौध्दिक काम करणार्‍यांनाही लागू आहे.

भारतातही न्याहारी केली जाते. न्याहारीसाठी पूर्वीपासून चालत आलेला पदार्थ म्हणजे आदल्या दिवशीची शिळी भाकरी, ती कुस्करून त्यात दूध-मीठ घालून लसूण चटणी किंवा लिबांचे/कैरीचे लोणचे ही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची खरी न्याहारी. कोकण भागात गुरगुटया भात व मेतकूट किंवा तांदळाची उकड तिखट मीठाचा सांजा हे पदार्थ केले जातात. तसेच संध्याकाळच्यावेळी दोन मुख्य जेवणातील अल्प आहार म्हणून ‘मधल्या वेळेच्या खाण्याचे’ पदार्थ लोकप्रिय आहेत. एकाचवेळी खूप जेवणापेक्षा थोडया थोडया वेळाने थोडे थोडे खाणे प्रकृतीच्या दृष्टीनेही चांगलेच असते. न्याहारी व मधल्यावेळच्या खाण्यासाठी महाराष्ट्रात बनविल्या जाणार्‍या काही निवडक पदार्थ याठिकाणी दिले आहेत, जे अबालवृध्दांपासून सर्वांनाच आवडतील अशी आशा आहे.

दूध पोहे

milk-pohe साहित्य – ५ टेबलस्पून पोहे, ४ कप दूध, ३ चमचे साखर, वेलची पावडर.

कृती – पोहे धुवून घ्यावे, ४ कप दुधात ३ चमचे साखर घालून गरम करावे. दुधाला उकळी आली की त्यात पोहे घालावे आणि थोडे शिजवावे. शिजलेले पोहे जसे गार होतील तसतसे घट्ट होत जातील. नंतर त्यावर १-२ चिमूट वेलची पावडर घालावी. (पोहे हे वातनाशक, कफकर आणि पचायला किंचित जड असतात. दुधातून घेतल्यास ते बल देणारे, धातु वाढवणारे, स्निग्ध आणि सारक असतात. लहान मुलांकरिता हा अत्यंत उत्कृष्ठ पदार्थ आहे.)

दडपे पोहे

dagade-pohe साहित्य – २ वाटया पातळ पोहे, खवलेला नारळ अर्धी वाटी, १ कांदा बारीक चिरलेला, लिंबाचा रस १ चहाचा चमचा, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, २ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी २ चमचे तेल व अर्धा चमचा प्रत्येकी जिरे-मोहरी, नारळाचे पाणी, साखर पाऊण चहाचा चमचा, अर्धा इंच आले.

कृती – हिरव्या मिरच्यांचे लांबट तुकडे करून त्या मिठात चुराव्यात, आले किसून घ्यावे. पोह्यांना नारळाच्या पाण्याचा शिपका मारावा. कांदा, लिंबाचा रस, मीठ, साखर, खवलेला नारळ, चुरलेल्या, किसलेले आले व पोहे एकत्र करून खूप कालवावेत. जिरे व मोहरीची फोडणी करून ती पोह्यांवर टाकावी व लगेच त्यावर झाकण ठेवावे. १० मिनिटांनी त्यावर कोथिंबीर पेरावी.

फोडणीचे पोहे

phodnicha-pohe साहित्य – १ वाटी जाड पोहे, १ कांदा बारीक चिरलेला, एका बटाटयाची साले काढून केलेल्या काचर्‍या, अर्धा चहाचा चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, २ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी ३ चमचे तेल व अर्धा चमचा प्रत्येकी जिरे-मोहरी-हिंग, साखर पाऊण चहाचा चमचा, २-३ चमचे खवलेले ओले नारळ.

कृती – प्रथम पोहे चाळणीत धूवून निथळत ठेवावे. कढई गॅसवर ठेवून कढईत तेलाची हिंग, हळद, जिरे, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे, कांदा, बटाटयाच्या काचर्‍या घालून ते झाकण ठेवून शिजू द्यावे. नंतर त्यात धुतलेले पोहे, थोडी साखर, चवीप्रमाणे मीठ घालावे व ढवळावेत. त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यावर थोडा लिंबाचा रस घालावा. खायला देते वेळी पोह्यांवर आले, खोबरे घालावेत व ते खायला द्यावेत.

झटपट पौष्टिक पोहे

nutritional-pohe साहित्य – १ वाटी पोहे, ४-५ चमचे मोड आलेले मूग, ४ चमचे नारळचव, १ सिमला मिरची, एका गाजराचे तुकडे, कोथिंबीर, किसलेले आले, ४ मिरच्या, अर्धे लिंबू, डाळींबाचे दाणे, हळद, मीठ.

कृती
प्रथम कोथिंबीर, मिरची बारिक चिरून घ्यावी. आले किसून घ्यावे, सिमला मिरची व गाजराचे तुकडे बारिक करून घ्यावे. एका भांडयात मूग घ्यावेत. त्यात नारळचव, कोथिंबीर, आले, सिमला मिरची, गाजराचे तुकडे, मिरचीचे तुकडे, घालून चांगले एकत्र करावे. त्यानंतर किंचीत हळद व चवीनुसार मीठ घालून हलवावे. लिंबू पिळावे, पोहे घालून पुन्हा कालवावे, वरून डाळिबांचे दाणे घालून वाढावे, यात तेल व गॅसचा वापर नाही. सर्व पदार्थ कच्चे असल्याने पौष्टिकता वाढते.