चटण्या – कोशिंबीर

चटण्या

कोशिंबीर

लोणची

पानात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना आपल्याकडे तसे वरचे स्थान आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याच्या लोणच्यांचे दिवस आल्यासारखे वाटते.

डिसेंबर-जानेवारी महिन्यात लिंबाचे लोणचे घातले जाते. याशिवाय कच्ची करवंदे, भोकरे, माइनमूळ, मिरची, विविध भाज्यांची तात्पुरती लोणची ही जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी खाल्ली जातात. उन्हाळयाच्या दिवसात भाज्या फारशा चांगल्या मिळत नाहीत व मिळाल्याच तर त्या खूप महाग असतात.त्यावेळी पूरक तोंडीलावणे म्हणून यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. प्रत्येकाला जेवणात काहीतरी नवीन, चटकदार हवे असतेच. वेगवेगळया चटण्या-लोणची किंवा कोशिंबीरी जेवण अधिक रूचकर बनवितात. अशा चटकदार चटण्या कोशिंबीरींच्या कृती येथे नमूद केलेल्या आहेत.

लसूण चटणी

garlic-chutney साहित्य – १ सुक्या खोबर्‍याची वाटी ८-१० सोललेल्या लसूण पाकळया, अर्धा चमचा जिरे, दीड चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.

कृती – खोबरे किसून व तव्यावर थोडेसे कोरडेचे भाजून घ्यावे. नंतर तव्यात जिरेही थोडेसे कोरडे भाजून घ्यावेत. किसलेले खोबरे, जिरे, तिखट, मीठ व लसूण पाकळया एकत्र कराव्यात व खलबत्यात ही चटणी कुटावी. काही जणांना त्यात भाजलेले दाणे घातलेलेही आवडतात. तेही चांगले लागतात, लसूण चटणी महिनाभरसुध्दा चांगली टिकते.

तिळाची चटणी

tilachi-chutney साहित्य – दोन वाटया निवडून घेतलेले पांढरे तीळ, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ.

कृती – कढईमध्ये तीळ घालून गुलाबी होईपर्यंत कोरडे भाजावेत, त्यात तिखट-मीठ घालून हे मिश्रण खलबत्यात कुटावे. त्याला तेल सुटून चटणीचा गोळा होतो. ही चटणी कच्चे गोडेतेल घालून भाकरीबरोबर विशेषत: थंडीच्या दिवसात फार चांगली लागते.

पुदिन्याची चटणी

mint साहित्य – १ पुदिन्याची गड्डी, १ हिरवी मिरची, चवीनुसार थोडे लाल तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे, ३ मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, २ लसूण पाकळया, अर्धे लिंबू.

कृती – प्रथम पुदिना निवडून स्वच्छ धुवून ठेवावा, नंतर त्यात एक मिरची, लाल तिखट, १ चमचा जिरे, २ लसूण पाकळया व कोथिंबीर घालावी. हे सर्व नंतर पाटयावर बारीक वाटावे की चटणी तयार झाली. ही चटणी परोठा, पुर्‍या किंवा ब्रेडबरोबर पण चांगली लागते.

कारल्याची चटणी

bitter-gourd साहित्य – निवडून धुवून वाळविलेले कारले १ वाटी, अर्धी वाटी निवडलेले पांढरे तीळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, ४-५ लसणीच्या सोललेल्या पाकळया.

कृती – प्रथम तीळ व कारले वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. ते एकत्र करून त्यात तिखट, मीठ व लसूण पाकळया घालाव्यात. सर्व खलबत्यात एकत्र करून जाडसर कुटावेत, ही चटणी पुष्कळ दिवस टिकते. भाकरीबरोबर तेल घालून विशेष चांगली लागते.

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

green-chilli साहित्य – ८-१० हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेले दाणे, मीठ, १ चमचा जिरे, ७-८ लसणाच्या, अर्ध्या लिबांचा रस, १ चमचा साखर.

कृती – प्रथम मिरच्यांची देठे काढून घ्या, त्यात मीठ, जिरे, लसूण घालून मिक्सरमध्ये थोडे फिरवा. त्यावर भाजलेले दाणे व साखर घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटा. ही चटणी खलबल्यात कुटल्यास छान लागते. ह्या चटणीत मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरल्यास टिकावू चटणी तयार होते. लाल तिखट घातलेली चटणी जाडसा न वाटता थोडी एकजीव होऊ द्यावी.