संग्रहालये/ऐतिहासिक स्थळे

गगनबावडा

Gaganbawada कोल्हापूर जिल्ह्याचा तीन टक्के भाग व्यापलेला एक तालुका म्हणजे गगनबावडा. महेश कोठारी यांच्या ‘पछाडलेला’ या चित्रपटाच्या शुटींगच्या निमित्ताने मी गगनबावडा येथे गेलो होतो. गगनबावडयापासून साधारण ९ किमी. अंतरावर एक भव्य ऐटबाज हवेली आहे. ही हवेली छत्रपती शाहू महाराजांच्या पंतप्रधानांनी बांधली आहे. बहुधा त्यांचे उपनाव केळकर होते असे ऐकिवात आहे.

या हवेलीमध्ये आल्यावर थंड गारवा, निलगिरीची रांगेनी उभी राहिलेली झाडे आणि नयनरम्य परिसर यांनी मन अतिशय मोहून जाते. या हवेलीमध्ये गतकाळाचे वैभव, मराठयांची शान, यांच्या निशाण्या सतत साद देत राहतात. हवेलीची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरते. सुरवातीला मोठे पोर्च, लांबलचक पाय-या आहेत. आतल्या दालनांमधील काळोख पचवण्यासाठी एक आंतरिक धीटपणा लागतो. आपणच आपल्या आत्म्याला जणू भेटायला आलो आहोत, असा भास होतो.

जेंव्हा आपण अगदी एकटे असतो, फक्त आपले आपणच असतो, तेंव्हा मनाच्या गाभा-यात शांतता दरवळत राहीली, तर तेच आपले खरेखुरे श्रेय. हा अनुभव इथे येत राहतो.

आतल्या भव्य मोठमोठया पण अंधाऱ्या चार खोल्या सोडल्या की वर जाणारा एक उंच पायऱ्यांचा जीना लागतो. या जिन्याने वर पोहोचल्यावर हंडया-झुंबरे असलेला उठ-बस करण्याचा खास दिवाण आहे. त्याची शान, आजूबाजूची झाडे आणि भरपूर मोकळी जागा यामुळे मनातील सर्व प्रकारची किल्मिषं दूर होतात. या जागी असणाऱ्या दोनही भव्य दिवाणखान्यांना मोठया खिडक्या जशा आहेत, तसेच मोठे व्हरांडे देखील आहेत. एक कोठीची किंवा साठवणीची खोली बाजूलाच आहे. त्या पलीकडे निजायच्या खोल्या लागतात. शिसवी पलंग, जुन्या काळातील घडवंच्या यांनी ह्या खोल्या सजल्या आहेत. या हवेलीच्या आवारात माझ्या नजरेस आलेल्या दोन विहिरी आहेत.

जिन्यावरून पुन्हा खाली आल्यावर थोडं पुढे सरल्यानंतर डावीकडे दोन खोल्या व बाथरूम आहे. तिथून मागच्या मोकळया अंगणात पाऊल पडल्यावर बऱ्याच वेळानंतर प्रकाश दिसल्याची गंमत वाटते. तिथे समोरच पाटाचं खळखळ वाहणारं पाणी येतं. मनसोक्त पाण्यात डुंबण्यासाठी या पेक्षा मस्त जागा या परिसरात दुसरी नाही. हवेलीच्या चहुबाजूला बागा आहेत. वॉकमन लावून गाणी ऐकत या झाडांच्या रांगामधून फिरण्याचा आनंद अवर्णनीय आहे. मुशाफिरी करणाऱ्या मनाला गेलेल्या काळातील गेलेले वैभव आठवून चटका मात्र सारखा लागतो.

आपला परंपरागत इतिहास, पेशव्यांचा कालखंड, मराठयांचा उदय, सरंजामशाही, शाहू राजांचा कालखंड याच्या अस्तित्त्वाच्या खुणा या हवेलीच्या भव्यतेमध्ये सापडतात. अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे शुटिंग या हवेलीमध्ये झाले आहे. विविध प्रसंगी, विविध प्रकारे इथल्या जागेचा उपयोग करता येतो. या हवेलीची शान, वैभव, शांत परिसर, झाडी, मागेच डोंगराळ अरण्य यामुळे निर्भरशील दिग्दर्शकांना प्रस्तुत लोकेशनचा वापर करावा असं वाटत राहीलं तर काहीच नवल नाही.

गगनबावडा या शब्दामध्ये आकाश व बावडी म्हणजे विहीर हे दोन शब्द आहेत. आकाश जेंव्हा विहिरीत पडतं, त्यावेळी आपल्या मनामध्ये पसरणारी निळाई ही याच बावडयात कशी?…, असं वाटत राहतं. एक असीम तन्मयता आपल्यात सामावते. या जागेची हीच तर मज्जा आहे. इथे नागर परिसरातील कोलाहल नाही. फॅशन नाही. गलबला नाही. गिचमिड नाही. म्हणूनच इथल्या ‘बावडयात गगन’ डोकावतं. गगनबावडयातील ही विशाल हवेली म्हणूनच माझं एक खास आवडीचं ठिकाण आहे.

– भरत जाधव