पोळी-भाकरी

भारतात उत्तरेकडे गहू जास्त व चांगला पिकत असल्यामुळे तिकडच्या जेवणात पोळी (रोटी) हे मुख्य अन्न तर दक्षिण भारतात तांदुळाचे उत्पन्न जास्त म्हणून मुख्य अन्न भात.

महाराष्ट्रात मात्र, कोकणचा भाग वगळल्यास, भात आणि पोळी या दोन्हींना जेवणात समान स्थान आहे. ‘पोळी-भाजी-भात-आमटी’ हा महाराष्ट्रीयांचा ‘चौरस’ आहार. विशेषत: शेतकरी वर्गाचे भाकरी हेच मुख्य अन्न आहे. गव्हाची मऊसूत पोळी,किंवा गरम-गरम फुलके हे रोजच्या जेवणातील , पुरी ही सणावारी किंवा अन्नपालट म्हणून आणि खास सणानिमित्ताने पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, उसाच्या रसाची पोळी, आंबरसाबरोबर खाण्यासाठी केलेली तांदुळाच्या उकडीची पोळी, पेढयाची पोळी हे पोळीचे महाराष्ट्रात प्रचलित असलेले व सुप्रसिध्द प्रकार. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची गरम भाकरी आणि त्यावर घरगुती लोण्याचा गोळा, झुणका-भाकरी, संक्रांतीच्या वेळी तीळ लावून केलेली भाकरी, लसूणचटणी आणि भाकरी हे मराठमोळया माणसांच्या जिभेला खवळायला लावणारे पदार्थ. हे चविष्ट आणि पोटभरीचे पदार्थ बनवायचे तरी कसे? त्यासाठीच पुढे दिलेल्या आहेत त्यांच्या पाककृती.

फुलके

phulke साहित्य – १ वाटी कणीक, २ चमचे मोहन, मीठ.

कृती – मीठ व तेल घालून कणीक भिजवावी. ती फार सैल किंवा फार घटृट नको, नंतर ती थोडी मुरू द्यावी. नंतर बेताचा पीठाचा गोळा घेऊन पातळ पोळी लाटावी. या पोळीची घडी घालू नये. नंतर ही फुलका पोळी तव्यावर टाकावी व लगेचच उलटवावी. उलटल्यानंतर जास्त वेळ तव्यावर राहू द्यावी. खालच्या बाजूने लाल डाग पडेपर्यंत भाजल्यावर निखार्‍यावर किंवा गॅसवर शेकावी. शेकतांना फुलक्याची कच्ची बाजू निखार्‍यावर येईल असा फुलका टाकावा. नंतर फुलक्याला तूप लावून ठेवावे.

गाकर

साहित्य – २ वाटया जाडसर कणीक, २ टेबलस्पून तेलाचे मोहन, मीठ, १ चमचा साखर, अर्धा चमचा सुंठपूड.

कृती – सर्व एकत्र करून पीठ भिजवावे. मोठया पुरीएवढे लाटावे व तव्यावर शेकावे. नंतर फुलक्याप्रमाणे विस्तवावर शेकावे. चहाबरोबर नाश्त्याला उपयोगी पडतात.

रोटली

rotli साहित्य – कणीक, तेल, मीठ, साय, दूध.

कृती – कणकेत तेलाचे मोहन व मीठ घालून एकत्र करावे. त्यात अर्धा वाटी साय घालावी. नंतर थोडे दूध व थोडे पाणी घालून पीठ भिजवावे, नंतर ह्या पीठाच्या लहान आकाराच्या पोळया कराव्या. तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्याव्या. नंतर कडेने तूप सोडावे.

पुरण पोळी

puran-poli साहित्य – १ किलो हरभर्‍याची डाळ, अर्धा किलो उत्तम गूळ, अर्धा किलो साखर, १०-१२ वेलदोडयांची पूड, थोडेसे केशर, पाव जायफळाची पूड, १ फूलपात्र रवा, १ फूलपात्र कणीक, २ फूलपात्री भरुन मैदा, १ वाटी तेल, चवीपुरते मीठ.

कृती – हरभर्‍याची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजत घालावी. शिजतांना त्यात थोडे तेल व हळद घालावी. डाळ चांगली शिजली की टोपलीत उपसून टाकावी. सर्व पाणी निथळले की डाळीत चिरलेला गूळ व साखर घालून डाळ पुन्हा गॅसवर शिजवावी. पूरण चांगले घटृट शिजले पाहिजे. डाव पुरणात न पडता उभा राहिला म्हणजे पुरण शिजले असे समजावे. नंतर शिजलेल्या डाळीत पाव चमचा मीठ, जायफळ, वेलदोडयाची पूड व केशर घालावे व रवा भिजत घालावा. नेतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवावे. नंतर त्यात थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी. साधारणपणे पोळीच्या कणकेपेक्षा ही कणीक सैलसर असते. नंतर ह्या कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळया लाटाव्यात. पोळी तव्यावर टाकताना लाटण्यावर गुंडाळून टाकावी व दोन्हीकडून लालसर डाग पडेपर्यंत भाजावी.

टीप – पूरणपोळी वाढताना त्यावर भरपूर साजूक तूप वाढतात. कहींना दूधाबरोबर पूरणपोळी खायला आवडते.

घडीची पोळी

ghadichi-poli साहित्य – २ वाटया कणीक, ४ चमचे तेलाचे मोहन, मीठ.

कृती – सर्व एकत्र करून पीठ भिजवावे. नंतर झाकून ठेवावे. कणीक मळून घ्यावी. लहान पोळी लाटून त्याला तेल लावावे. तेलावर थोडी पिठी लावावी, नंतर त्याची घडी घालावी, त्यावरही थोडे तेल पिठी घालून पुन्हा घडी घालावी. नंतर पीठीवर पोळी लाटावी. लाटतांना एकदा उलटून पुन्हा लाटावी. म्हणजे दोन्हीकडचे पदर सारखे लाटले जातील. तव्यावर पोळी टाकावी. नंतर सरकवून गोल फिरवावी व उलटावी. ती चांगली फुगली की तव्यावर कपडयाने कडा दाबाव्यात. पुन्हा उलटून दुसर्‍या बाजूने डाग पडले की काढावी. हलक्या हाताने उभी आपटावी म्हणजे वाफ बाहेर पडेल. नंतर पोळीला लगेच तूप लावावे.

सात पदरी पोळी

saatpadaripoli साहित्य – ३ वाटया कणीक, अर्धी वाटी तुपाचे मोहन, मीठ.

कृती – सर्व एकत्र करून पीठ भिजवावे. नंतर तासभर झाकून ठेवावे, नंतर त्याचे गोळे करून मोठी पोळी लाटावी. पोळीला वरून गरम तुप लावावे. नंतर त्याची गुडांळी करावी, ही गुडांळी हलक्या हाताने उभ्या बाजुने दाबावी व १५ मिनिटे बाजुला ठेवावी. अशा तर्‍हेने सर्व पोळया लाटून घ्या. नंतर ह्या दाबलेल्या गुडांळीची थोडी पिठी वापरून पुन्हा पोळी लाटा व तव्यावर शेकून घ्या. नंतर गॅसवर भाकरीप्रमाणे शेका व लगेच तूप लावा. दोन्ही हाताच्या तळव्यात धरून हळू थोपटल्यासारखे करा. त्याचे ४ तुकडे करून वाढा, तुकडे केल्यामुळे परद सुटलेले दिसतील.