करमणूक लेख

आकाशवाणी – एक प्रभावी माध्यम

Aakashwani बर्‍याच वर्षापूर्वी जेव्हा दूरदर्शनचा फारसा प्रसार झाला नव्हता आणि दूरदर्शन किंवा रेडिओ घरी असणं ही एक चैनीची बाब मानली जात होती, त्या काळात अमीन सयानींच्या ‘बिनाका गीतमाला’ची आतुरतेने वाट बघणारे श्रोते होते. ‘भाईयों और बहनों ‘ अशा प्रस्तावनेतूनच श्रोत्यांच्या मनावर पकड निर्माण करणार्‍या ह्या आवाजाने खरं तर तेव्हा आर. जे. म्हणजे रेडिओ जॉकी किंवा निवेदकांविषयीची लोकांमध्ये निर्माण केलेली उत्सुकता आजच्या एफएम चॅनल्सच्या गर्दीतही कायम आहे. मधल्या काळात मात्र आकाशवाणीचे माध्यम काहीसे अडगळीत पडल्यासारखे झाले होते. पण विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात आगमन झालेल्या एफएममुळे रेडिओची आर्थिक आणि दर्जात्मक गणितेच बदलून गेली. आज आरजेंचा स्वतःचा असा श्रोतृवर्ग असतो, यामुळे आर.जे. बनण्यालाही एक वलय प्राप्त झाले आहे. या वलयामागचे त्यांचे कष्ट, या माध्यमाविषयीची त्यांची मतं, त्यांचा आरजे होण्यापर्यंतचा प्रवास याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना इच्छा असते. या चॅनल्सचे लोकप्रिय आर.जे. रश्मी, प्रियंवदा आणि मयुरेश हे ह्या त्रिकूटाशी मारलेल्या गप्पा.

एफ.एम चा मयुरेश म्हणतो की, सुरुवातीला एफएमवर एकटयाने कार्यक्रम सादर करायला द्यायचे नाहीत, दोघांनी कार्यक्रम सादर करायचा असा नियम असायचा. नवशिक्यांना सांभाळून घेणारा आणि त्या कामात तयार झालेला की-होस्ट असायचा. प्रियंवदा सांगते की, ऑडिशनचा एकूण प्रकार टेन्शन येण्यासारखा असतो. माझ्या हिंदीच्या पहिल्या ऑडिशनच्या वेळीही मी अगदी नीट स्क्रिप्ट लिहून, well arranged पहिला कार्यक्रम सादर केला होता. पण मी नॉर्थमध्ये वाढले त्यामुळे हिंदीचा कधी प्रश्न पडला नाही.

‘गाणी तुमची आमची’ आणि ‘झंकार’ हे संगीतावर आधारीत एफएम गोल्ड वरचे कार्यक्रम सादर करणारा मयुरेश पूर्वी ‘गुड मॉर्निंग भारत’ हा माहितीपर कार्यक्रम सादर करायचा. ‘माझा आवडणारा कार्यक्रम होता तो, आजही मला कोणी विचारलं की, ‘गुड मॉर्निंग भारत’ करशील का? मी लगेचच हो म्हणेन’, मयुरेश सहजच सांगून जातो.

Aakashwani नवीन गाण्यांवर आधारीत ‘धूम मचाले धूम’, पर्यटन स्थळांची माहिती पुरवणारा १ तासाचा एफएम गोल्ड वरचा ‘सफरनामा’, तर ‘परिचय’ हा सिनेमाशी संबंधित व्यक्तींवरील कार्यक्रमातून आपल्या घरात पोचणार्‍या प्रियंवदाला मात्र ‘ओल्डी-गोल्डी’ हा जुन्या गाण्यांवर आधारीत कार्यक्रम आजही करायला आवडेल. नूरजहाँ, शमशाद बेगम, गीता दत्त यांची जुनी गाणी ऐकायला मिळणारा कार्यक्रम म्हणून हा खूपच लोकप्रिय झाला होता. केवळ माऊथ पब्लिसिटीवर हा कार्यक्रम खूप लोकांपर्यंत पोचला.

पण रश्मी मात्र आपल्याला खास मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांतून भेटते. तिचे लोकगीत आणि चित्रपटगीतांवर आधारीत ‘स्वरमाला’, ‘सखी’, मिक्स गाण्यांचा ‘जीवनगाणी’, चित्रपट गीते सादर करणारा ‘रंगतसंगत’ आपण कान देऊन ऐकतो.

पूर्वीचे मुंबई ‘ब’ आता ‘अस्मिता’ नावाने आपल्यासमोर आले आहे. एफएम रेन्बो सुरू झालं ते ‘एफएम मेट्रो’ नावाने. देशातील पाच मेट्रोसिटीजमध्ये जाणारं एकुलतं एक चॅनेल म्हणून त्याला मेट्रो हे नाव दिलं होतं. एफएम रेन्बो हे एन्टरटेन्मेट पध्दतीचं आहे, पण एफएम गोल्ड हे infotainment पध्दतीचं आहे.

श्रोत्यांच्या प्रतिक्रियांविषयी विचारताच तिघांचही एकमत होतं की, खूप शिकायला मिळतं आणि बरंही वाटतं की, अरे आपलं कोणीतरी ऐकतंय. आपल्याला आलेलं पहिलं पत्र वाचूनही असाच आनंद होतो.

Aakashwani प्रियंवदा उत्साहात सांगते की, लोकं खूप सजेशन्स् देतात, काही वेळेस खूप चांगली गाणी लावली असं म्हणतात, तर काही वेळेस नापसंती दर्शवतात. एकदा राजश्री प्रोडक्शनवर कार्यक्रम करताना एका श्रोत्याचा फोन आला की, अहो तुम्ही अमुक एक गाणं लावलं नाही. ‘बर्‍याचशा गाण्यांची ओळख मला नव्याने झाली, गाण्यांची आवड होतीच, पण खूप गाणी माहिती असल्याचा माझा गैरसमजही दूर झाला,’ प्रियंवदा म्हणते. प्रतिक्रीये मुळे तुम्ही कामाप्रती जबाबदार होता. पूर्वी ‘यादों के झरोंकेसे’ हा कार्यक्रम आम्ही करायचो. सिनेमातील एखाद्या व्यक्तीची माहिती आणि त्याची गाणी असा तो कार्यक्रम असायचा. काही वेळेस फोन आल्यावर लोकं सांगायचे, तुम्ही ह्या व्यक्तीविषयी माहिती का देत नाही? तर एखादी व्यक्ती पूर्ण माहितीच लिहून पाठवायची. एकदा मी महेंद्र कपूरचं गाणं लावलं, पण ते गाणं लाईव्ह ट्रॅकचं होतं. लगेचच एका श्रोत्याचा फोन आला की, फिल्म ट्रॅक लावा. काहीवेळा अशी फजितीपण होते.

रश्मी म्हणते की, ‘स्वरमाला’ कार्यक्रमादरम्यान मी एक पोवाडा लावला होता. मुंबईहून एका महिलेनी फोन करून सांगितलं की, मला हा पोवाडा ऐकून खूप भरून आलंय. एकदा एका कुटुंबाचा फोन आला की, आमच्या घरी टिव्ही, टेपरेकॉर्डर नाही. आमच्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही हळदीचं गाणं लावू शकता का? माझ्याकडच्या लिस्टमध्ये मी बघितलं तर त्या प्रसंगासाठीचं एक गाणं होतं, मी तेच लावलं. तर एकदा ‘डायल-इन’ कार्यक्रमादरम्यान मी केदार शिंदेंची मुलाखत घेत होते. एका श्रोत्याचा फोन की, तुम्ही शाहीर साबळेंचे नातू आहात वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही दूरदर्शनवर कार्यक्रम का करत नाही? आमच्याकडे केबल नाही, आम्ही काय करायचं? असे प्रसंग ही वाटयाला येतात.

मयुरेश सांगतो की, आमच्या श्रोत्यांना खूप माहिती असते. ‘गुड मॉर्निंग भारत’ सादर करतानाचा प्रसंग आहे. भारताविषयीची माहिती असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. या कार्यक्रमासाठी एका श्रोत्याचा फोन आला की, तुम्ही ट्रेन्सविषयीची माहिती का देत नाही? श्रोत्यांकडूनही बरंच शिकायला मिळाल्याचं आणि त्यामुळे अनुभवात भरच पडत असल्याचं मयुरेश सांगतो.

मयुरेश आठवण सांगतो की, आमचे कार्यक्रम ऐकणार्‍या एक आजी मकरसंक्रांतीला तिळगुळांचा डब्बा घेऊन आकाशवाणीला हजर झाल्या. सर्वांना आमच्याविषयी विचारत होत्या. त्यांना नाही पण म्हणू शकत नाही आणि ते घेऊही शकत नाही, अशी विचित्र परिस्थिती झाली होती. पण असे काही प्रसंग कायमचे लक्षात राहतात. श्रोते जसं आमचं कौतुक करतात, तसं चूक झाल्यावर आम्हाला फोन करून कान उघडणीही करायला मागे-पुढे पाहत नाहीत.

रश्मी म्हणते की, काही वेळेला समोरचा श्रोता खूप आपुलकीने तुमच्याशी बोलत असतो. एकदा एका बाईचा फोन आला, की तुमचा ‘गाव’ हा विषय घेऊन केलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला आमचं गाव आठवलं. आम्ही इथे दोघंच असतो, मुलं परदेशात असतात. दिवसभर आमच्याकडे रेडिओ चालू असतो, आम्ही नेहमी तुमचे कार्यक्रम ऐकतो. तुम्ही सगळेजणं मला आमच्या मुलांसारखेच आहात. अशा वेळी काय करावं कधी-कधी सुचत नाही, असं रश्मी सांगते.

Aakashwani एक माध्यम म्हणून ह्याची बलस्थानं आणि कमकुवत स्थान यांची चर्चा करताना अतिशय स्ट्राँग माध्यम असल्याचं मयुरेशचं म्हणणं असतं. इथे फक्त आवाजावरूनच अंदाज बांधले जातात. वेगवेगळया मनःस्थितीतील श्रोते तुमच्यासमोर असतात, त्या सर्वांना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो. तुमच्या आवाजावरून तुमचं चित्र तयार केलं जातं.

प्रियंवदा म्हणते की, ऐकणा-या प्रत्येकाला हा आपल्याशीच बोलतोय, आपल्या मनातलंच बोलतोय असं वाटलं पाहिजे. जेवढा लिमिटेड टॉकटाईम तुम्हाला मिळतो, तो आपण फुकट न घालवता चार मोलाचे शब्द या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. रश्मी सांगते की, माध्यम म्हणून हे अतिशय सशक्त माध्यम आहे. एखाद्या समस्येवर जागृती निर्माण करण्यासाठीही हे प्रभावी ठरू शकते. अगदी दैनंदिन जीवनातील समस्या जसे, भुयारी मार्गाचा वापर. यांसारख्या विषयांवरही सामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण करता येऊ शकते. तुम्ही अतिशय मनोरंजनात्मक पध्दतीने, हसत-खेळत समाज प्रबोधन करू शकता.

तसंच समोरचे कुठल्या मूडमध्ये असतील सांगता येत नाही, अशावेळी तुम्ही जबाबदारीने वागणं अपेक्षित असतं. हे माध्यम तुम्ही कॅज्युअली घेऊ शकत नाही. एक व्यक्ती म्हणून तुमची मतं वेगळी असू शकतात पण जेव्हा on air असता तेव्हा तुम्ही liberal असलं पाहिजे. एवढंच कशाला २६ जुलै, २००५ च्या पूरपरिस्थितीदरम्यान फक्त एफएम द्वारे लोकांना माहिती मिळत होती. ट्रेन्स, बसेस, फोन बंद होते. अशावेळी काही माहिती मिळवण्यासाठीचे ते एकमेव साधन उपलब्ध होते. वारंवार तीच गाणी लावणं, विशेषतः एकाच गायकाचं गाणं लागोपाठ लावणं अशा गोष्टी आपण स्वतःहून टाळल्या पाहिजेत. फास्ट ट्रॅक नंतर स्लो ट्रॅक लावणं, नवख्या गाण्यानंतर एकदम पॉप्युलर गाणं लावणं असे काही नियम घालून घेतले तर कार्यक्रमातला वेगळेपणा आणि नवखेपणा टिकवून ठेवायला मदत होऊ शकते.

रश्मी मराठीवर्ल्डच्या वाचकांना सांगते की, धन्यवाद किंवा नमस्कार असे शब्द जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा सवयीने किंवा भिडेखातर का होईना समोरचा तुम्हाला धन्यवाद आणि नमस्कार म्हणतो. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण करता येऊ शकते. एखादी गोष्ट हॅमर केली की त्याची आवड निर्माण होते. प्रायव्हेट चॅनल्स गाणी जशी हॅमर करतात, त्याप्रमाणे आपणही एखादी गोष्ट हॅमर करू शकतो. भाषेचे संस्कार आपण रेडिओच्या माध्यमातूनही करू शकतो.