गड-किल्ले


महाराष्ट्रातील गड-किल्ले

 Gad Kile

महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे?

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं आणि

या भूमंडळाचे ठायी , धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

हे समर्थ वचन सार्थ केले. दुर्ग म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? महाराष्ट्रात असे किती दुर्ग आहेत? ते कुठे आहेत? तिथे पोचायचे कसे? गड किल्ले कसे पहायचे?त्यांचे महत्त्व काय? आजची त्यांची स्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. त्यांची अभ्यासपूर्ण परंतु थोडक्यात माहिती प्रा. प्र.के. घाणेकर यांच्या सौजन्याने या विभागात दिलेली आहे. चला तर पाठीवर एक पिशवी, भक्कम बूट,बरोबर खाण्याचे काही पदार्थ आणि पाणी घेऊन गड-किल्ले सर करूयात!

किल्ला म्हणजे काय?

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. सुट्टीच्या वेळी या किल्ल्यांना भेट द्यायलाच हवी.

किल्ल्यांचे प्रकार

रामायण, महाभारत, अग्नीपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्नीपुराण,अथर्ववेद,वराहमिहिराची बृहत्संहिता , मनुस्मृती अशा जुन्या ग्रंथात किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळते. म्हणजे त्याही काळात आपल्या देशात किल्ले होतेच.

प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम्
तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम्
– देवज्ञविलास, लाला लक्ष्मीधर

लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील सर्वात उत्कृष्ट गिरिदुर्ग – म्हणजे डोंगरी किल्ला, त्यानंतर वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हरं म्हणजे एखाद्या गुहेचा उपयोग किल्ल्यासारखा करता आला तर तो तिस-या श्रेणीचा किल्ला मानला जातो. चौथ्या दर्जाचा किल्ला म्हणजे जलदुर्ग – पाण्यातला किल्ला. कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशातील किल्ला हा पाचव्या प्रतीचा तर मिश्रपध्दतीचा किल्ला म्हणजे सहाव्या प्रतीच किल्ला. संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट असेल तर तो सातव्या प्रकारचा किल्ला व एखादा नुसता कोट किंवा गढी हा आठव्या प्रकारचा किल्ला.

सर्वसाधारणपणे डोंगरावर असणारा गिरिदुर्ग, समुद्रात बेटावर असणारा जंजीरा किंवा जलदुर्ग, जमिनीवर असणारा भुईकोट किंवा स्थळदुर्ग असे किल्ले आपल्याला माहीत असतात.

किल्ल्यांचे महत्व
गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके. शत्रूशी लढण्यासाठी या किल्ल्यांचा आधार घेतला जाई. ज्याच्या हाती अधिक किल्ले तो राजा आपल्या प्रजेचे जास्त चांगले संरक्षण करू शकत असे अशी शिवाजी महाराजांच्या काळी परिस्थिती होती. आपल्या पूर्वजांनी प्राणांची बाजी लावून हे गड जिंकले व शत्रूंशी ते झुंजले. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी स्वसंरक्षणासाठी महत्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत.

आज महाराष्ट्रातील किल्ले पहायला गेले तर सगळी अवकळाच दिसते. चांगल्या परिस्थितीत असलेले तट, बुरूज आढळत नाहीत. याउलट उत्तरभारतातील किल्ले मात्र सुंदर बांधकामे, देखणी तटबंदी यांनी नटलेले दिसतात. जुलमी-परकीय आक्रमकांशी या किल्ल्यांच्या मूळ मालकांनी स्वाभिमानशून्य तडजोडी केल्यामुळे हे किल्ले शाबूत राहिले. याउलट स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले किल्ले कोणतीही तडजोड न करता झगडत राहिले. त्यामुळेच आजला ते किल्ले म्हणजे पडक्या वास्तू आहेत. असे असले तरी ते आपली स्फूर्तिस्थाने आहेत.

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश

महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच,इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या वंश – धर्माच्या सत्ताधीशांनी या देशात किल्ले बांधले.

महाराष्ट्रातील दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज – एक अतूट नाते

परक्या, धर्मांध, जुलमी सत्तांचा नंगानाच महाराष्ट्रभर चालला होता. रयतेला सुरक्षितपणे जगणे अशक्य झाले होते. पैसा-अडका, जमीन-जुमला, आया-बहिणींची अब्रू – सगळे धोक्यात आले होते. या जाचक पारतंत्र्यात शिवभास्कराचा उदय झाला आणि त्यांनी हा प्रदेश स्वतंत्र केला. त्यासाठी त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. पूर्वी बांधलेल्या किल्ल्यांपैकी काहींची डागडुजी केली, काहींची फेररचना केली तर राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी असे काही किल्ले त्यांनी पूर्णपणे नवीनच बांधले.

शिवाजीमहाराजांचे दुर्गबांधणीतले अभिनव प्रयोग

१. डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेशद्वाराशी येणारी मुख्य वाट

मध्ययुगात तोफा बंदुका असल्या तरी त्यांचा पल्ला कमी होता. त्यामुळे मुख्य लढाई डाव्या हाताला ढाल लटकावून अन् उजव्या हातातील तलवारीचे घाव घालून खेळली जाई. किल्ल्याकडे येताना तो डोंगर व ती तटबंदी उजवीकडे असेल तर वरून येणारे गोफण-गुंडे , दगड, भाले, बाण व बंदुकीच्या गोळया इत्यादी उजव्या हातातील तलवारीने अडवणे अशक्य होई व किल्ल्यावरच्या मराठयांना डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेश द्वाराकडे येणाऱ्या वाटेचा फायदा होई.

२. गोमुखी प्रवेशद्वारे

शिवनिर्मित किल्ल्यांचे वैशिष्टय म्हणजे किल्ल्याच्या महाद्वाराची गोमुखी बांधणी, प्रवेशद्वार दोन बुरुजांमध्ये लपवलेलं असल्याने शत्रूला सहजासहजी न दिसणे, प्रत्यक्ष प्रवेशद्वाराजवळ दोन बुरुजांची अरुंद खिंड व हत्तीला धडक देण्यासाठी थोडं मागे जाऊन, पळत येऊन, दारावर मुसंडी मारण्याएवढी जागा ऐन दाराशी नसणे.

३. तटबंदीची बांधणी

मालवण शेजारचा सिंधुदुर्ग हा बलाढय किल्ला बांधताना तटाचे चिरे शिसाचा उकळता रस ओतून बसविले होते.
थळवायशेत जवळच्या खांदेरीचा किल्ला ऐन समुद्रात मुरूडच्या जंजिऱ्यावरील सिद्दी अन् मुंबईकर लुच्च्या इंग्रजांच्या विरोधात उभारला. तटबंदी बाहेर समुद्राच्या लाटा आपटतात. त्यापासून संरक्षण आणि तटाशी कोणीही लगट करू नये म्हणून दगडांची रास तेथे ओतली.

मुरूडच्या जंजि-याशेजारी उभारलेल्या पद्मदुर्गाची बांधणी तर अशी पक्की की तेथे बांधलेल्या तटबंदीतील दगडी चिरे गेल्या तीनशे वर्षात लाटांच्या माऱ्याने झिजून गेले. पण चिऱ्यांमधील दरजांमधील चुना अजूनही शाबूत आहे.
शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना

‘रामचंद्रपंत अमात्य’ या शिवकालीन मुत्सद्याने शिवराजनीती सांगणारा ‘आज्ञापत्र’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना मोजक्या शब्दात परंतु चपखलपणे व स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

‘संपूर्ण राज्याचे सार ते दुग’. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय. प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देशच उध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे?….ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी.

….ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरंवशावर न रहाता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू नये……. राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले, ते देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून, पाडून गडाचे आहारी आणावा…. गडाची इमारत गरजेची करू नये. तट, बुरुज, चिलखत, पाहारे, पडकोट जेथे जेथे असावे, ते बरे मजबूत बांधावे. नाजूक जागे जे असतील ते सुरुंगादी प्रयत्ने करून अवजड करून, पक्की इमारत बांधून गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे. ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे…… किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून, एक-दोन-तीन दरवाजे तशाच चोरदिंडया करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेऊन , वरकड दरवाजे व दिंडया चिणून टाकाव्यात….गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्यात. त्या सर्व काळ चालू देऊ नयेत…. गडाची राख़ण म्हणजे कलारग्याची झाडी….. गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा… पाणी बहुत जतन राखावे… गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधो नये…तटोतटी केर कसपट किमपि पडो न द्यावे. ताकीद करून झाला केर गडाखाली टाकता, जागजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करावे…. तटास झाड वाढते ते वरचेवरी कापून काढावे. तटाचे व तटाखाली गवत जाळून गड नाहाणावा लागतो…. गडावरी झाडे जी असतील ती राखावी.

– प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या सौजन्याने